पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थानातील बालोत्रा येथे सुमारे 1.06 लाख कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी


राजस्थानसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा; विमान वाहतूक, ऊर्जा आणि संपर्क सुविधांशी संबंधित विकास उपक्रमांमुळे पायाभूत सुविधांना बळ मिळेल, विकासाला वेग येईल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल : पंतप्रधान

कितीही मोठे आणि अनपेक्षित आव्हान समोर आले तरी नवा भारत आपल्या संकल्पांपासून मागे हटत नाही आणि प्रगतीची गतीही मंदावत नाही : पंतप्रधान

जोधपूर येथील नव्या विमानतळ टर्मिनलच्या उदघाटनामुळे मारवाड प्रदेशातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराला नवी चालना मिळेल : पंतप्रधान

21व्या शतकातील नव्या भारताचा दृढ संकल्प आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी या शतकातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटावर मात: पंतप्रधान

प्रत्येक स्तरावर घेतलेले योग्य निर्णय, संकटाचे अचूक मूल्यमापन, प्रभावी रणनीती, उपलब्ध संसाधनांचा संतुलित वापर, राजनैतिक सामर्थ्याचा सकारात्मक उपयोग यामुळे भारताची प्रत्येक संकटावर यशस्वी मात: पंतप्रधान

आज मी देशातील 140 कोटी नागरिकांचे आभार मानतो आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. या कठीण काळात त्यांनी ज्या खंबीरपणे देशाच्या पाठीशी उभे राहून अफवा, भीती आणि संभ्रम पसरवणाऱ्यांना तोंड दिले तसेच अस्थिरता निर्माण करण्याच्या कटकारस्थानांना हाणून पाडले, त्याच जनविश्वासाच्या बळावर देश पुढे वाटचाल करू शकला: पंतप्रधान

आता राजस्थान आणि हरियाणा सरकार शेखावटी भागाला पाणी पोहोचवण्यासाठी संयुक्तपणे काम करणार आहेत. यासंदर्भात दोन्ही राज्यांमध्ये नुकताच करारही झाला. या करारानुसार, हथनीकुंड बॅरेजमधून राजस्थानला पाणी आणले जाणार असून त्यासाठी भूमिगत पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा लाभ सीकर, चुरू, झुंझुनू तसेच शेजारील संपूर्ण शेखावटी प्रदेशातील नागरिकांना मिळेल: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 04 JUL 2026 4:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील बालोत्रा येथे सुमारे 1.06 लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी, या विकास प्रकल्पांमध्ये सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. रणरणत्या उन्हातही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान, या अभूतपूर्व गर्दीला सध्याच्या शासनावर जनतेने लावलेली विश्वासाची मोहोर, असे म्हणाले. "तुमच्या या अफाट पाठिंब्याबद्दल मी राजस्थानच्या मातीचा सदैव ऋणी राहीन. हे तुमचे प्रेम आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर असलेल्या अतूट विश्वासाची साक्ष देते," अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या भागाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करत पंतप्रधानांनी राज्यातील असंख्य शूरवीरांना आदरांजली वाहिली. देशाचा खरा स्वाभिमान हा स्वावलंबनाशी जोडलेला असतो, असे त्यांनी सांगितले. वैयक्तिक आत्मसन्मान आणि परकीय देशांवरील अवलंबित्व कमी करण्याची देशाची धोरणात्मक गरज यांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, "व्यक्तीचा स्वाभिमान असो वा देशाचा, तो तेव्हाच अबाधित राहू शकतो जेव्हा आपण पूर्णपणे आत्मनिर्भर असतो."

ऐतिहासिक 'राजस्थान रिफायनरी'  देशाला समर्पित करताना पंतप्रधानांनी, भारताच्या सर्वांगीण विकास आणि आर्थिक स्वावलंबनाच्या व्यापक ध्येयामधील तिच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. "ही अवाढव्य रिफायनरी हजारो लोकांसाठी रोजगाराचे एक कायमस्वरूपी साधन बनेल आणि या यशाबद्दल मी विशेषतः राजस्थानमधील तरुणांचे अभिनंदन करतो," असे ते म्हणाले.

प्रशासकीय कार्यसंस्कृतीतील अमूलाग्र बदलाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, आधीच्या सरकारांच्या काळात केवळ नावापुरत्या पायाभरण्या करून प्रकल्प वाऱ्यावर सोडण्याच्या पद्धतीची तुलना आजच्या सरकारच्या वेगवान आणि अथक कार्यशैलीशी केली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी याच प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या एका दुर्दैवी अपघाताची आठवण काढत, त्यांनी कामगारांच्या जिद्दीचे कौतुक केले; ज्यांच्यामुळे हा महाकाय पायाभूत सुविधा प्रकल्प अभूतपूर्व वेगाने पूर्ण होऊ शकला. "नवा भारत आपल्या दृढ संकल्पांपासून कधीही मागे हटत नाही आणि आव्हान कितीही मोठे किंवा अनपेक्षित असले, तरी आपला वेग कधीही मंदावू देत नाही," असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

राज्यातील जलद विकासकामांच्या टप्प्यांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. जोधपूरमधील नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन आणि दुर्गम भागातील विमान सेवा अधिक सक्षम करण्यासाठी 'उडान' (UDAN) योजनेच्या नवीन टप्प्याचा शुभारंभ त्यांनी अभिमानाने साजरा केला. विमान वाहतुकीतील या प्रगतीसोबतच, त्यांनी शेखावटी भागातील पाणीटंचाई लवकरच पूर्णपणे संपवण्याचे आश्वासन दिले आणि जयपूर मेट्रो नेटवर्कच्या मोठ्या विस्ताराची घोषणाही केली. "हे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प संपूर्ण मारवाड प्रदेशातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराला खऱ्या अर्थाने एक नवी गती देतील," असे पंतप्रधान म्हणाले.

युवा सक्षमीकरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेला चालना देण्यावर फार मोठ्या प्रमाणात भर दिला जात असल्याचे स्पष्ट करत, राजस्थानमधील सुमारे 54,000 तरुण उमेदवारांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे वितरित करण्याच्या उपक्रमाची  पंतप्रधानांनी अधिकृतपणे प्रशंसा केली. सार्वजनिक सेवेतील आपल्या महत्त्वपूर्ण कारकिर्दीची औपचारिक सुरुवात करत असलेल्या या तरुणांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. "आज ज्यांना नियुक्ती पत्रे मिळाली आहेत त्या सर्व तरुणांच्या अत्यंत उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो," असे उद्गार मोदी यांनी काढले.

भू-राजकीय लक्ष आता इतर गोष्टींवरून पश्चिम आशियातील विनाशकारी संघर्षांकडे केंद्रित झाल्याने निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे जगभरात कशा प्रकारे तीव्र पडसाद उमटत आहेत याचा पंतप्रधानांनी सविस्तर ऊहापोह केला. ही परिस्थिती 21 व्या शतकातील सर्वात गंभीर ऊर्जा संकट असल्याचे म्हणत, त्याचा मोठ्या विकसित राष्ट्रांनाही फटका बसला असून त्यांना इंधनाच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. "पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभर क्षोभ उसळला असून आज प्रमुख देशांनाही इंधन टंचाईला तोंड द्यावे लागत आहे," असे मोदी यांनी नमूद केले.

जागतिक स्तरावरील या निराशाजनक परिस्थितीच्या उलट या स्थितीचा सामना करण्यास देश भक्कम स्थितीत असल्याचे स्पष्ट करताना, देशाचे अचूक धोरणात्मक आकलन, साधन-संपत्तीचा संतुलित वापर आणि सक्रिय मुत्सद्देगिरी या गोष्टी अर्थव्यवस्थेचे या संकटापासून यशस्वीपणे रक्षण करण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जागतिक स्तरावर यामुळे जो हादरा बसला त्या तुलनेत आधुनिक भारतीयत्वाची अढळ इच्छाशक्ती अधिक प्रभावी ठरली असल्याचे त्यांनी नमूद केले. "भारताने प्रत्येक स्तरावर योग्य निर्णय घेतले, येणारे संकट वेळीच ओळखून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या मुत्सद्देगिरीच्या शक्तीचा सकारात्मक वापर केला," असे मोदी म्हणाले.

पश्चिम आशियातील संकटाच्या काळात जे अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचे काम करत होते त्यांचा पंतप्रधानांनी निषेध केला; त्याच वेळी, या परिस्थितीचे परिणाम सुयोग्यरित्या हाताळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पडद्यामागून दिवसरात्र केले गेलेले प्रयत्न आणि राजनैतिक पातळीवर अभूतपूर्व स्वरुपात संवेदनशीलतेने उचलण्यात आलेली पावले याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. "काही शक्ती अफवा पसरवण्यात गुंतलेल्या असताना संकटाची स्थिती हाताळण्यासाठी धोरणात्मक आणि राजनैतिक पातळीवर उचलण्यात आलेली संवेदनशील पावले ही सर्वार्थाने अभूतपूर्व होती," असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

आता टळलेले हे संकट केवढे प्रचंड होते हे स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले, संघर्ष सुरू होण्यापूर्वी भारत आपली एलपीजी पुरवठ्याची 60 टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण करत होता आणि त्यापैकी 90 टक्के पुरवठा हा प्रामुख्याने अत्यंत अस्थिर बनलेल्या आखाती भागातून होत होता. युद्धाच्या परिस्थितीमुळे या अत्यंत महत्त्वाच्या पुरवठा साखळ्या अचानक खंडित झाल्यामुळे देशात किती भयावह परिस्थिती उद्भवल्याने लोकांमध्ये कसे घबराटीचे वातावरण निर्माण होऊ शकले असते याचे भीषण चित्र त्यांनी रेखाटले. "युद्धाच्या परिस्थितीमुळे जर अत्यंत महत्त्वाचा इंधन पुरवठा जवळपास पूर्णपणे थांबला असता, तर आपल्या देशात किती भयंकर क्षोभ उसळला असता, याची तुम्ही सहज कल्पना करू शकता," असे मोदी म्हणाले.

अशा स्थितीत आणीबाणीने लागू केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देताना, मूलतः औद्योगिक कामांसाठी असलेला गॅसचा साठा थेट घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरकडे (एलपीजी) वळवण्यासाठी देशांतर्गत तेलशुद्धीकरण कारखान्यांच्या रचनेत कसे वेगाने बदल करण्यात आली याची पंतप्रधानांनी खुलासेवार माहिती दिली. केवळ सात दिवसांत करण्यात आलेल्या या धोरणात्मक बदलांमुळे देशपातळीवरील एलपीजी उत्पादन 35,000  मेट्रिक टनांवरून 54,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. "या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीआपल्या तेलशुद्धीकरण कारखान्यांवर लक्ष केंद्रित करून, ज्या कारखान्यांमध्ये पूर्वी कधीही एलपीजीचे उत्पादन केले नव्हते, ते कारखाने वेगाने तयार करण्यात आले," असेही मोदींनी सांगितले.

ग्राहकांच्या रक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वंकष व्यूहरचनेवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी पारंपारिक गॅस सिलिंडरची देशपातळीवरची प्रचंड मोठी मागणी कमी करण्यासाठी पीएनजी (पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू) जोडण्यांच्या वाटपात वेगाने केलेल्या वाढीची माहिती दिली. सरकारने अत्यंत कमी कालावधीत 11 लाखांहून अधिक घरे या पाईपलाईन नेटवर्कशी यशस्वीपणे जोडली असल्याचे त्यांनी नमूद केले. "स्वयंपाकाच्या गॅसची सर्व मागणी केवळ एलपीजीवरच अवलंबून असणार नाही, याची सरकारने विशेष काळजी घेतली," असेही मोदींनी स्पष्ट केले.

नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक संरक्षण पुरविण्यात आले हे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, बाजारपेठेच्या जाणकारांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडून 2,000 रुपयांवर पोहोचतील असा अंदाज वर्तवला होता; तरीही सरकारने हे दर 950 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवत 'उज्ज्वला' योजनेंतर्गत 650 रुपयांपेक्षा कमी दरात सिलिंडर उपलब्ध करून दिले. प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच व्यावसायिक गॅसचे दरही मोठ्या प्रमाणात कमी केले असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. "तत्परतेने या किमतींवर नियंत्रण आणण्याचा हा निर्णय हे घरगुती ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडू नये यासाठी आमचे सरकार किती संवेदनशीलतेने काम करत आहे याचे उदाहरण आहे," असे मोदी म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलच्या जागतिक किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरवरून 120 डॉलरपर्यंत पोहोचली होती. भारताकडे मोठ्या प्रमाणात देशांतर्गत तेलसाठे नसल्याची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्याने अनेक देशांना कठोर इंधन रेशनिंग लागू करावे लागले. “जगातील अनेक देशांमध्ये आयात मार्ग बंद झाल्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे कोटा पद्धतीने वितरण केले जात होते,” असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने केलेल्या आर्थिक तडजोडींवर भर देताना पंतप्रधानांनी सांगितले की, एप्रिल ते जून या कालावधीतच सरकारने 75,000 कोटी रुपयांहून अधिक तोटा स्वतः उचलला. अगदी दुर्गम भागातही अखंडित आणि परवडणारा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. “भारतामध्ये एकाही दिवशी अशी गंभीर टंचाई निर्माण होऊ दिली नाही आणि जनतेवर अतिरिक्त भार पडू दिला नाही,” असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

तीव्र पुरवठा संकटावर मात करण्याचे श्रेय भारताच्या सक्षम आणि सक्रिय परराष्ट्र धोरणाला देत पंतप्रधानांनी सांगितले की, भारताने आपला इंधन आयात आधार केवळ 25-26 देशांवरून वाढवून 40 हून अधिक देशांपर्यंत विस्तारला. या निर्णायक पावलातून आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्ट संदेश देण्यात आला, असे ते म्हणाले. “भारताने संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला की, आमच्यासाठी राष्ट्रीय हित आणि नागरिकांचे कल्याण हेच सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

या राष्ट्रीय सक्षमतेची मुळे मागील दशकातील दूरदर्शी धोरणनिर्मितीत असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी राजस्थान रिफायनरीच्या कामाचा उल्लेख केला. 2017 मध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर 2018 ते 2023 या कालावधीत पूर्वीच्या सरकारच्या असहकारामुळे हा प्रकल्प ठप्प राहिला होता. मात्र सध्याचे सरकार सत्तेत आल्यानंतर काम वेगाने पुढे गेले आणि आज हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. “सध्याचे सरकार सत्तेत आल्यानंतर कामाला गती मिळाली आणि आज आम्ही तो राष्ट्राला समर्पित करत आहोत,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

जागतिक औद्योगिक प्रगतीच्या संदर्भात बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, अमेरिकेत गेल्या 50 वर्षांत एकही नवीन रिफायनरी उभारली गेलेली नाही, तर युरोपची क्षमता कमी होत आहे. अशा परिस्थितीत भारताने जगातील चौथ्या क्रमांकाची रिफायनरी क्षमता निर्माण केली आहे. ही क्षमता आणखी वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “याच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारताने शतकातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाशी यशस्वीपणे सामना केला आणि त्यातून पूर्णपणे सावरला,” असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

कृषी क्षेत्रातील आव्हानांवर बोलताना पंतप्रधानांनी युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या खत टंचाईचा उल्लेख केला. जागतिक स्तरावर युरियाची किंमत प्रति पोते 3,000 रुपयांपेक्षा जास्त झाली होती. या संकटावर मात करण्यासाठी सरकारने बहुआयामी उपाययोजना केल्या. लाखो कोटी रुपयांच्या अनुदानाद्वारे शेतकऱ्यांना केवळ 300 रुपयांत युरिया उपलब्ध करून देण्यात आला. पर्यायी जागतिक पुरवठा मार्ग सुनिश्चित करण्यासाठी दूतावासांना सक्रिय करण्यात आले आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात आले. साठेबाजी आणि काळाबाजाराविरोधात कठोर कारवाईही करण्यात आली. “मोठ्या प्रमाणातील अनुदान आणि पर्यायी पुरवठा साखळ्यांद्वारे आम्ही शेतकऱ्यांना अत्यल्प किमतीत अत्यावश्यक युरिया उपलब्ध करून दिला,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, वाढत्या परिचालन खर्चापासून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी आपत्कालीन पत हमी योजनेचा पुढील टप्पा लागू करण्यात आला. सरकारकडून 100 टक्के हमीसह बँकांकडून अतिरिक्त 20 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे लघु आणि कुटीर उद्योगांना आर्थिक संकटापासून संरक्षण मिळाले. “अशा अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक हस्तक्षेपांमुळे आज आपले लहान आणि मोठे उद्योग पूर्णपणे सुरक्षित वाटत आहेत,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारताच्या 140 कोटी नागरिकांप्रति अपार कृतज्ञता प्रकट करत, 'देशाच्या सामूहिक स्थैर्याचे श्रेय- सरकार आणि जनता यांच्यातील परस्पर विश्वासाला आहे', असे पंतप्रधान म्हणाले. देशात भय पसरवणाऱ्या कपटी कारस्थानांचा पराभव करून कसोटीच्या काळात खंबीर राहण्याबद्दल त्यांनी जनतेचे कौतुक केले. यातून अंतिमतः, भारताच्या अपयशाचे भाकीत करण्यासाठी टपून बसलेल्या घटकांच्या उत्साहावर विरजण पडले, असे त्यांनी सांगितले. "आत्यंतिक चिवट अशा आपल्या नागरिकांचा अढळ विश्वास आणि उत्तुंग क्षमता यांच्या बळावरच देश यशस्वी वाटचाल करत आहे." असा अभिप्राय मोदी यांनी दिला.

पायाभूत सुविधांमधील मोठी प्रगती आणि पारिस्थितिकीय दायित्व यांची सांगड घालत, पंतप्रधानांनी खेजरीचे रोप लावताना त्यांना वाटलेला गाढ अभिमान शब्दांत मांडला आणि वाळवंटीकरण रोखण्यात त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. नवीकरणक्षम ऊर्जेकडे वेगाने होत चाललेले संक्रमण स्पष्ट करत त्यांनी जागतिक दर्जाच्या सौर-वाटिकांची निर्मिती, पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत 1.5 लाखपेक्षा अधिक घरांचे काम, आणि पीएम कुसुम योजनेतून स्थानिक शेतकऱ्यांना 65,000 पेक्षा अधिक सौर पंपांचे वाटप- हे मुद्दे अधोरेखित केले. "हे रोप लावण्यातून आपली प्रमुख कार्यसंस्कृती दिसून येते आणि प्रगतीची नवी शिखरे पादाक्रान्त करतानाच आपण पर्यावरणाचे काटेकोर रक्षण केले पाहिजे याला आपण प्राधान्य देतो हे सिद्ध होते", असे मोदी यांनी नमूद केले.

दीर्घकाळापासून सुरु असलेल्या पाणीतंट्यांवरील ऐतिहासिक तोडग्यांकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी, राजस्थानच्या तीव्र पाणीटंचाईकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पूर्वीच्या प्रशासकांवर कडाडून टीका केली आणि त्याच्या तुलनेत विद्यमान अधिकारीवर्गाचा सहयोगात्मक असा 'राष्ट्र प्रथम' हा दृष्टिकोन त्यांनी अधोरेखित केला. नर्मदामैयेचे पाणी राजस्थानातील खेड्यांना उपलब्ध करून देऊन गुजरातने इतिहासात घालून दिलेल्या उदाहरणाचा त्यांनी उल्लेख केला. "सर्वात कठीण प्रश्नांवरही जेव्हा निर्मळ हेतूने तोडगे शोधले जातात तेव्हा निश्चितपणे उत्तरे मिळण्यात यश येते", असे प्रतिपादन त्यांनी केले.

राजस्थान आणि हरयाणा सरकारांदरम्यान 34,000 कोटी रुपये मूल्याचा ऐतिहासिक करार झाल्याचे घोषित करत पंतप्रधानांनी, हाथनीकुंड धरणाकडून भूमिगत वाहिनी टाकण्याच्या योजनेचे तपशील सांगितले. या अभूतपूर्व अशा परस्पर सहमतीमुळे सिकार, चुरु, झुनझुनू आणि संपूर्ण शेखावती प्रदेश यांना जीवनदायी पाणी मिळू शकणार आहे, यावर त्यांनी भर दिला. "आत दोन्ही राज्यांमध्ये भाजपा सरकार असल्याने, पहिल्यांदाच परस्पर-सहमतीने यशस्वीपणे तोडगे निघत आहेत," असे निरीक्षणही मोदींनी नोंदवले.

पाण्याच्या क्षेत्रातील आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांबद्दल विस्ताराने बोलताना पंतप्रधानांनी-- यमुनेच्या खोऱ्याच्या वरच्या भागातील रेणुका, लखवार, आणि किशाऊ धरणे तसेच गावखेड्यांमध्ये नळाने पाणी देणारा रामजल सेतू प्रकल्प पूर्ण झाल्यावर होणारे परिवर्तनात्मक फायदे अधोरेखित केले. त्याखेरीज, देशभरात 25 लाखांपेक्षा अधिक आणि राजस्थानात 1.25 लाख शोषखड्डे निर्माण करून भूजल पातळी उल्लेखनीय प्रमाणात उंचावणाऱ्या 'जलसंचय जनभागीदारी' मोहिमेचे घवघवीत यश त्यांनी समाधानाने मांडले. या प्रचंड सहयोगात्मक प्रयत्नांच्या माध्यमातून अमूल्य अशा पाण्याचे पद्धतशीर मार्गांनी संवर्धन होत आहे, आणि प्रदेशातील भूजल पातळीत स्थिर वाढ होत आहे" असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

देशाच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या केंद्रस्थानी राजस्थानच असल्याचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांनी, नवीन जोधपूर विमानतळ आणि जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन यांचा उल्लेख करत, भावी प्रगतीचे प्रधान उत्प्रेरक असल्याचे सांगितले. या दुसऱ्या टप्प्यामुळे जयपूरच्या एकूण नेटवर्कचा विस्तार 50 किलोमीटरपलीकडे होईल, पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गिका विना-अडथळा जोडल्या जातील, आणि त्याद्वारे स्थानिक लोकांची आणि पर्यटकांची उत्तम सोय होईल- याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. "आज राजस्थानात किती वेगाने आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, आणि अगदी नवे विक्रम रचले जात आहेत" असा अभिप्राय त्यांनी नोंदवला.

प्रचंड विस्तारत चाललेले वाहतुकीचे जाळे आणि ऊर्जाप्रकल्प ही राज्याच्या संक्रमणाची फक्त सुरुवात आहे, असे सांगून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना जनतेला आश्वस्त केले. विद्यमान नेतृत्वात राज्यासाठी अत्यंत समृद्ध अशा नव्या भविष्याची निर्मिती करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी जनतेचे सातत्यपूर्ण पाठबळ मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. "आमच्या सरकारला तुमच्या सातत्यपूर्ण आशीर्वादांच्या साथीने, आपण एकत्रितपणे राजस्थानसाठी उज्ज्वल भविष्याची निर्मिती करू याची मला पूर्ण खात्री आहे" असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/मंजिरी गानू/गजेंद्र देवडा/जाई वैशंपायन/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2281131) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil