ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा: सरकारी खरेदीदरात 13 टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल 2,125 रुपये दर निश्चित

Posted On: 04 JUL 2026 12:47PM by PIB Mumbai

 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि सरकारचा 'किंमत स्थिरीकरण राखीव साठा' मजबूत व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कांदा खरेदीदरात 13 टक्क्यांची वाढ केली आहे. आता हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. हे सुधारित दर आज म्हणजेच 4 जुलै 2026 पासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात 307.37 लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी (2024-25) हे उत्पादन 307.67 लाख मेट्रिक टन झाले होते, म्हणजेच यंदाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या आसपासच आहे. या अंदाजानुसार देशात कांद्याची उपलब्धता पुरेशी असून कोणतीही चिंता नाही. मात्र, दरवर्षीप्रमाणे या हंगामात कांद्याचे भाव थोडे वाढण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये कांद्याचा साठा पुरेसा असून, बाजारात टंचाई निर्माण होईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

देशभरातील बाजारांमध्ये दररोज 50,000 मेट्रिक टनांपेक्षा जास्त कांद्याची आवक होत आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्रातून 30,000 मेट्रिक टनांहून अधिक आवक होत असून, सरासरी घाऊक भाव 18 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. चांगल्या दर्जाचा कांदा सध्या साठवणुकीत असून, आवक कमी असण्याच्या काळात तो बाजारात आणला जाईल. सध्या देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो आहे.

मान्सूनचे आगमन लांबल्याने आणि काही भागांत नेहमीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे, व्यापाऱ्यांच्या एका वर्गाकडून तेजीच्या अपेक्षेने कांदा खरेदी केली जात आहे. परंतु, प्रमुख ग्राहक बाजारपेठांमध्ये सध्याच्या दरांवर कांद्याला फारशी मागणी नाही. असे असले तरी नाशिक आणि मध्य प्रदेशच्या काही भागांतील उत्पादन केंद्रांवर भविष्यात भाव वाढतील या अपेक्षेने साठेबाजी होताना दिसत आहे. ही तेजी बाजारातील प्रत्यक्ष मागणीमुळे नसून केवळ वाढीव दरांच्या अपेक्षेवर आधारलेली आहे.

देशातून कांदा निर्यात सुरळीत सुरू असून, जून 2026 मध्ये सुमारे 1.50 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत निर्यातीचा वेग थोडा मंदावण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आखाती देश, श्रीलंका आणि पूर्वेकडील देशांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा नवा कांदा अत्यंत कमी दरात उपलब्ध झाला आहे.

महाराष्ट्रातील नाशिक भागात खरीप कांद्याची पेरणी सुमारे 15 दिवस लांबली आहे, तर दुसरीकडे कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि चल्लकेरे पट्ट्यात खरिपाची पेरणी जवळपास 60 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2281038) अभ्यागत कक्ष : 115