पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचा इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा

प्रविष्टि तिथि: 03 JUL 2026 8:42PM by PIB Mumbai

 

इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष माननीय प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान  नरेंद्र मोदी 6-8 जुलै, 2026 दरम्यान इंडोनेशियाला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचा हा इंडोनेशियाचा चौथा दौरा असेल, तर मे 2018 मध्ये भारत-इंडोनेशिया संबंध 'सर्वंकष धोरणात्मक भागीदारी' च्या  पातळीवर पोहोचल्यानंतरची ही त्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट असेल. या दौऱ्यात पंतप्रधान,अध्यक्ष प्रबोवो यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि या भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतील. जकार्ता येथे पंतप्रधान, भारतीय समुदायाच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करतील. भारत आणि इंडोनेशियामध्ये ऐतिहासिक आणि जिव्हाळ्याचे परस्पर संबंध आहेत. हेच विशेष ऋणानुबंध जपत, पंतप्रधान इंडोनेशियातील युनेस्कोचे एक प्रमुख जागतिक वारसा स्थळ असलेल्या योग्याकर्ता येथील प्रंबनन मंदिर परिसराला भेट देतील.

इंडोनेशियानंतर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान 8-10 जुलै, 2026 दरम्यान मेलबर्नला भेट देतील. मेलबर्नमध्ये पंतप्रधान, पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच, ते ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर जनरल सॅम मॉस्टिन यांचीही भेट घेतील. आपल्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान 'भारत-ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम'मध्ये सहभागी होतील. येथे ते दोन्ही देशांतील आघाडीच्या व्यावसायिक नेत्यांना संबोधित करतील. याशिवाय, पंतप्रधान भारतीय समुदायाच्या एका मोठ्या मेळाव्यालाही संबोधित करतील. हा समुदाय भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा एक मजबूत आधारस्तंभ आहे.

मेलबर्नहून, न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान 10-11 जुलै, 2026 दरम्यान ऑकलंडच्या शासकीय दौऱ्यावर  जातील. गेल्या चार दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. ऑकलंडमध्ये पंतप्रधान, पंतप्रधान लक्सन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि उभय देशांमधील सर्वांगीण संबंधांचा आढावा घेतील. गेल्या दोन वर्षांत, विशेषतः व्यापार-वाणिज्य आणि संरक्षण क्षेत्रात या संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. ऑकलंडमध्ये असताना पंतप्रधान नामांकित व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशीही संवाद साधतील. भारत-न्यूझीलंडमधील दृढ लोकसंबंध अधोरेखित करत, पंतप्रधान या दौऱ्यात भारतीय समुदायाच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करतील.

***

शैलेश पाटील/आशुतोष सावे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2280934) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam