कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तोतापुरी आंबा क्षेत्राचे सर्वसमावेशक मूल्यांकन करण्यासाठी आणि संपूर्ण मूल्य साखळीचे परीक्षण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे निर्देश

प्रविष्टि तिथि: 03 JUL 2026 4:09PM by PIB Mumbai


आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी योग्य उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत एक उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी नुकत्याच आपल्या आंध्र प्रदेश दौऱ्यादरम्यान तोतापुरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या संवादादरम्यान शेतकऱ्यांनी  त्यांना  सांगितले की, प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर लागवड केल्या जाणाऱ्या तोतापुरी आंब्याच्या दरात गेल्या काही महिन्यांत लक्षणीय घट झाली आहे. आंब्याच्या किमतीत  सातत्याने घसरण झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला असून, राज्यातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रकरणाची त्वरित दखल घेत, चौहान यांनी 'आयसीएआर'ला तोतापुरी आंबा क्षेत्राचे सर्वसमावेशक मूल्यांकन करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. आंब्याची लागवड आणि प्रक्रिया, ते  विपणन, देशांतर्गत व्यापार आणि निर्यात, या संपूर्ण मूल्य साखळीची तपासणी करून, शेतकऱ्यांचा परतावा सुधारण्यासाठी आणि या क्षेत्राला शाश्वत आधारावर बळकट करण्यासाठी योग्य उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे.
तोतापुरी आंबा उत्पादकांचे उत्पन्न आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे चौहान यांनी यावेळी सांगितले. आंबा उत्पादकांना शाश्वत आधार देण्यासाठी, मूल्य साखळी बळकट करण्यासाठी आणि या क्षेत्रात मूल्यवर्धन, निर्यात, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी समितीच्या शिफारशींच्या आधारावर योग्य उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280798) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Telugu , Kannada