PIB Backgrounder
मानस : अंमली पदार्थांविरोधात एक डिजिटल सुरक्षा कवच
नशा मुक्त भारतासाठी नागरिकांना सक्षम करणारी राष्ट्रीय अंमली पदार्थ हेल्पलाइन
प्रविष्टि तिथि:
02 JUL 2026 2:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जुलै 2026
मानसः नागरिकांना अधिकार देणारी एक रचना

अंमली पदार्थांचे सेवन आणि त्यांची तस्करी या बाबी प्रमुख सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्या असल्याचे केंद्र सरकारने लक्षात घेतले आहे. या समस्या केवळ व्यक्तीपुरत्या मर्यादित न राहता कुटुंबे, समुदाय आणि सार्वजनिक सुरक्षेवरही परिणाम करतात. नागरिकांचा सहभाग अधिक बळकट करण्यासाठी आणि मदत सेवांची उपलब्धता सुधारण्यासाठी, अंमली पदार्थांशी संबंधित घडामोडींची माहिती देणे आणि मदत मिळवणे यासाठी एक सुलभ व गोपनीय मंच असण्याची गरज सरकारने ओळखली.
या गरजेची पूर्तता करण्यासाठी, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) मार्गदर्शनाखाली डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या सहकार्याने 18 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय अंमली पदार्थ हेल्पलाइन 'मानस' (मादक पदार्थ निषेध आसूचना केंद्र) सुरू करण्यात आली. एक सुरक्षित आणि तंत्रज्ञानावर आधारित मंच म्हणून विकसित करण्यात आलेली 'मानस' हेल्पलाइन नागरिकांना कोणत्याही वेळी अंमली पदार्थांशी संबंधित घडामोडींची माहिती देण्याची, समुपदेशन मिळवण्याची आणि पुनर्वसनविषयक मदत मिळवण्याची सोय उपलब्ध करून देते.
डिजिटल इंडियाचा दृष्टिकोन आणि 'नशा मुक्त भारत'चे अभियान यांना 'मानस' एकत्र आणते. या मंचावरील सेवा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 1933, अधिकृत पोर्टल, ईमेल आणि उमंग ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. विविध माध्यमांद्वारे मदत उपलब्ध करून देणारी, 'मानस' हेल्पलाईन अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्धच्या लढ्यात बघ्याची भूमिका न घेता सक्रियपणे सहभागी होण्यासाठी नागरिकांचे सक्षमीकरण करते.
|
तुम्हाला माहित आहे का?
भारतातील अंमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रमाणावरील पहिल्या सर्वसमावेशक अहवालाने (2019) या समस्येची खरी व्याप्ती समोर आणली.
- सुमारे 16 कोटी लोक अल्कोहोल म्हणजेच मद्य प्राशन करतात, त्यांच्यापैकी 5.7 कोटींहून अधिक लोकांना या समस्येची तीव्र झळ पोहोचलेली आहे.
- 3.1 कोटी लोक गांजा, 2.26 कोटी लोक ओपिओइड्स ( अफूसारखी अंमली औषधे), आणि सुमारे 1.18 कोटी लोक गुंगी आणणाऱ्या औषधांचा (सेडेटिव्ह्ज) वापर करतात.
- साधारणपणे 2.8 कोटी लोक एकट्या ओपिओइड्सवर अवलंबून आहेत, ज्यामध्ये सुमारे 28 लाख लोकांना तातडीच्या उपचारांची गरज आहे.
|

'मानस' कोणत्या सेवा पुरवते?
'मानस'ची रचना नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली असून, यामध्ये माहिती देणे, समुपदेशन आणि जनजागृती या गोष्टी एकाच संरचनेत एकत्र आणल्या आहेत.

- नागरिक आपली ओळख उघड न करता अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, बेकायदेशीर शेती आणि संबंधित घडामोडींची अत्यंत गोपनीयतेने माहिती देऊ शकतात.
- व्यसनाने प्रभावित झालेले लोक समुपदेशन आणि मदत मिळवू शकतात; यासाठी येणारे कॉल्स सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या 14446 या हेल्पलाइनवर वर्ग केले जातात.
- 1933 ही हेल्पलाइन, वेब पोर्टल आणि उमंग ऍप्लिकेशनच्या माध्यमातून या सेवा कोणत्याही वेळी उपलब्ध राहतात, ज्यामुळे देशभरात याची पोहोच सुनिश्चित होते.
- डिजिटल तिकीट निर्मिती आणि वर्कफ्लो व्यवस्थापनामुळे संबंधित यंत्रणांसोबत माहितीचे जलद आदानप्रदान करणे शक्य होते, ज्यामुळे समन्वय आणि प्रतिसाद देण्याच्या वेळेत सुधारणा होते.
- याची पोहोच अधिक वाढवण्यासाठी बहुभाषिक कॉल सपोर्ट, स्मार्ट आयव्हीआरएस (Smart IVRS), चॅटबॉट एकत्रीकरण आणि प्रादेशिक भाषांमधील मदत यांसारखी सर्वसमावेशक वैशिष्ट्ये विकसित केली जात आहेत.
|
मी अंमली पदार्थांचे व्यसन असलेल्या व्यक्तीला कशा प्रकारे मदत करू शकतो/शकते?
अंमली पदार्थांचा पुरवठा आणि मागणीच्या या दुष्टचक्रात व्यसनी व्यक्ती ही एक बळी असते. तिच्याकडे योग्य दृष्टीकोनाने पाहिले पाहिजे आणि जवळच्या सरकारी व्यसनमुक्ती केंद्रात व्यावसायिक व वैद्यकीय मदत घेण्यासाठी तिला प्रवृत्त केले पाहिजे. तसेच तिला समुपदेशन आणि उपचार घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
|
परिणाम: लोकांमध्ये सातत्याने वाढणारा विश्वास

सुरुवातीपासूनच, 'मानस' (MANAS) प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोच वाढवली, सार्वजनिक सेवांची यंत्रणा मजबूत केली आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमधला परस्पर समन्वय देखील वाढवला. या प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना अंमली पदार्थांशी संबंधित कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती सुरक्षित माध्यमांद्वारे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने देणे शक्य झाले आहे. तसेच, नागरिक आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांमधील माहितीची देवाणघेवाण वाढल्यामुळे अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापराला आळा घालण्यासाठीची कारवाई अधिक गतिमान झाली आहे.
यासोबतच, देशभरात समुपदेशन, पुनर्वसन आणि जनजागृतीपर सेवांचा लाभ घेणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. व्यावसायिक समुपदेशनाचा वाढत्या वापरामुळे, व्यसनाधीनतेच्या समस्येवर मदत मागण्यासाठी आता नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. ऑनलाईन माध्यमांद्वारे चालवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमांमुळे अंमली पदार्थ विरोधी मोहिमांमध्ये सर्वसामान्य जनता आणि विशेषतः तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. संपूर्णपणे डिजिटल पद्धतीचा अवलंब केल्यामुळे या प्लॅटफॉर्मचे कामकाज आणि सेवा वितरण यात उत्तम ताळमेळ निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना जोडून घेत, हा प्लॅटफॉर्म 'नशामुक्त भारत' हे व्यापक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
'मानस' (MANAS) 'डिजिटल इंडिया'चे आश्वासन कसे पूर्ण करते

नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि सार्वजनिक सेवांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा केला जाऊ शकतो, याचे 'मानस' हे एक प्रत्यक्ष उदाहरण आहे. हे व्यासपीठ 'डिजिटल इंडिया' मोहिमेचे उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक मार्गांनी पुढे नेते:
- 'मानस' 24 तास अविरत कार्यरत असून, भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून याच्याशी संपर्क साधता येऊ शकतो.
- यात नागरीकांची माहिती थेट सरकारी कार्यलयापर्यंत जाते. त्यामुळे लोक केवळ शासकीय सेवांचे मूक लाभार्थी न राहता, प्रशासनामध्ये सक्रिय भागीदार बनतात.
- पूर्णपणे डिजिटल कार्यपद्धतीमुळे प्रत्येक तक्रार नोंदवली जाते, तीचा पाठपुरावा केला जातो आणि ती सोडवली जाऊ शकते, ज्यामुळे कामात गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व येते.
- हा प्लॅटफॉर्म सर्वसामान्य जनतेला अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या 30 प्रादेशिक विभागांशी आणि 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलाशी थेट जोडतो.
- हे पोर्टल पूर्णपणे एकात्मिक, सुरक्षित आणि दोन भाषांमध्ये उपलब्ध असणारे प्लॅटफॉर्म म्हणून डिझाइन केले गेले आहे.
- देशभरातील किशोरवयीन मुले आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे पोर्टल 'मायजीओव्ही' (MyGov) च्या माध्यमातून विविध जनजागृती मोहिमा राबवते, ज्यामध्ये प्रश्नमंजुषा, पोस्टर्स स्पर्धा आणि रील्स बनवण्याच्या स्पर्धांचा समावेश आहे.
- सर्व माहिती डिजिटल स्वरूपात गोळा होत असल्यामुळे, त्या डेटाचा सखोल अभ्यास करून अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या पद्धती आणि प्रवृत्ती समजून घेणे सोपे जाते. यामुळे सुरक्षा यंत्रणांना नेमकी समस्या कुठे वाढत आहे हे शोधण्यात आणि त्यानुसार पुढील कारवाईचे नियोजन करण्यात मदत होते.
'नशामुक्त भारत' उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल
डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेचा वापर नागरिकांचे संरक्षण आणि सामाजिक कल्याणासाठी कसा प्रभावीपणे केला जाऊ शकतो, याचे 'मानस' (MANAS) हे एक उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञान, लोकसहभाग, समुपदेशन, डेटा विश्लेषण आणि सुरक्षित माहितीची देवाणघेवाण या सर्वांची योग्य सांगड घालत हे प्लॅटफॉर्म प्रत्येक कॉल आणि प्रत्येक तक्रारीवर लक्ष ठेऊन, एका सुरक्षित, निरोगी आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. जसाजसा याचा विस्तार वाढून तांत्रिक साधने अधिक प्रगत होत आहेत, तसतसे 'मानस' हे डिजिटल असूनही मानवी संवेनशीलता जपणाऱ्या सुशासनाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून समोर येत आहे.
संदर्भ
Ministry of Home Affairs
Click here to see pdf
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
(रिलीज़ आईडी: 2280271)
आगंतुक पटल : 17