वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर अमेरिकेतील फॅन्सी फूड शो 2026 मध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग, इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन


इंडिया पॅव्हेलियनमध्ये भारतीय आंब्यांच्या सहा उत्कृष्ट निर्यातक्षम जातींचे प्रदर्शन

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2026 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जून 2026

 

उत्तर अमेरिकेतील सर्वांत महत्त्वाचे आणि अग्रगण्य 'स्पेशॅलिटी फूड प्रदर्शन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'समर फॅन्सी फूड 2026' मध्ये भारताने यंदा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग नोंदवला आहे. येथील 'इंडिया पॅव्हेलियन'  अर्थात भारतीय दालनाचे उद्घाटन न्यू यॉर्कमधील भारताचे महावाणिज्य दूत बिनय श्रीकांत प्रधान आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ, लेखक व 'टाईम 100' सन्मानप्राप्त शेफ विकास खन्ना यांच्या हस्ते 28 जून 2026 रोजी 'जेकब के. जॅविट्स कन्व्हेन्शन सेंटर' येथे करण्यात आले. या दालनाच्या माध्यमातून भारतातील शेकडो खाद्यपदार्थ ब्रँड्स, निर्यातदार आणि या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्यांना एकाच छताखाली आणण्यात आले आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण' (APEDA) आणि 'इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन' (ITPO) यांच्या संयुक्त विद्यमाने हे 'इंडिया पॅव्हेलियन' साकारण्यात आले आहे. भारतीय खाद्यपदार्थांना जगभरातून मिळणारी वाढती मागणी लक्षात घेऊन, भारताच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उद्योगाची समृद्धी, विविधता आणि उच्च दर्जा यांचे जागतिक प्रदर्शन हे दालन घडवून आणत आहे; ज्याचा थेट फायदा जगभरातून आलेल्या खरेदीदारांना, किरकोळ विक्रेत्यांना आणि वितरकांना होत आहे.

'समर फॅन्सी फूड शो'मधील भारताच्या या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनात वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील निर्यातदारांचा सहभाग लाभला आहे. यामध्ये बासमती तांदूळ, मसाले, खाण्यासाठी तयार असलेले अन्नपदार्थ (रेडी-टू-इट), पेये, सेंद्रीय उत्पादने, गोठवलेले अन्न (फ्रोझन फूड्स), स्नॅक्स आणि मूल्यवर्धित कृषी उत्पादनांचा समावेश आहे. या सर्वसमावेशक सादरीकरणामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारा अन्न निर्यातदार देश म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

या संपूर्ण दालनातील मुख्य आकर्षण ठरत आहे ते म्हणजे भारतीय आंब्याचे प्रदर्शन. यामध्ये भारताच्या अत्यंत उच्च दर्जाच्या निर्यातक्षम अशा सहा प्रमुख आंब्यांच्या जाती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत; सोबतच आंब्यापासून तयार केलेल्या नवनवीन आणि कल्पक खाद्यपदार्थांची मेजवानी देखील अनुभवायला मिळत आहे.

हे दालन म्हणजे 'एक मैलाचा दगड ठरवणारा उपक्रम असून, यामुळे अमेरिकेतील भारताची अन्न निर्यात आणि ब्रँडची ओळख अधिक मजबूत होईल, असे न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्य दूत बिनय श्रीकांत प्रधान यांनी  यावेळी बोलताना नमूद केले. 'समर फॅन्सी फूड शो'मधील 'इंडिया पॅव्हेलियन' हा अमेरिकन बाजारपेठेत आपला विस्तार करू इच्छिणाऱ्या भारतीय ब्रँड्ससाठी एक मानदंड ठरवणारा उपक्रम आहे आणि तो भारतीय अन्न उद्योगाचा आत्मविश्वास, क्षमता व उच्च दर्जा दर्शवतो, असेही ते पुढे म्हणाले.

अपेडा'चे (APEDA) अध्यक्ष अभिषेक देव यांनी 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचे स्वागत केले. या प्रदर्शनातील भारताच्या ऐतिहासिक सहभागाचे आणि जागतिक अन्न निर्यातीतील भारताच्या वाढत्या नेतृत्वाचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. 70 हून अधिक भारतीय प्रदर्शकांचा हा सहभाग भारतीय निर्यातदारांचा दांडगा आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रीमियम बाजारपेठेतील ग्राहक भारतीय उत्पादनांवर टाकत असलेला वाढता विश्वास अधोरेखित करतो, असे अभिषेक देव म्हणाले.

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279242) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Urdu