वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सातत्यपूर्ण व्यावसायिक सहभागाद्वारे भारत-यूके सीएटीए द्वारे निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे उद्योगांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2026 6:16PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी लंडनमध्ये भारत-यूके, प्रगतीतील भागीदार या व्यावसायिक संमेलनाचे नेतृत्व केले. त्यांनी भारतीय कंपन्यांना आवाहन केले की, भारत-यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार -सीईटीए द्वारे निर्माण होणाऱ्या संधींचे रूपांतर शाश्वत व्यावसायिक वाढीमध्ये करण्यासाठी उद्योगांनी यूकेमधील आपल्या समकक्षांबरोबरचे सहकार्य अधिक दृढ करावे.
या संमेलनाला दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली, त्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक बळकट करण्यासाठी सीईटीए चे एक परिवर्तनकारी चौकट म्हणून स्वागत केले. दीर्घकालीन गुंतवणूक, तंत्रज्ञान भागीदारी, नवोन्मेष, लवचिक पुरवठा साखळ्या आणि भारत व युनायटेड किंगडम यांच्यातील सखोल आर्थिक सहकार्य यांना चालना देण्याची या कराराची क्षमता यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अधोरेखित करण्यात आली.
या चर्चेत सीईटीए च्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. उद्योग प्रतिनिधींनी या कराराबाबत - विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये एमएसएमई मध्ये अधिक जागरूकता निर्माण करणे, नियामक प्रक्रिया व प्रमाणन गरजा सुलभ करणे, उद्योग-ते-उद्योग भागीदारी बळकट करणे आणि प्रतिभावान मनुष्यबळाच्या अधिक सुलभ हालचाली सुनिश्चित करणे या गोष्टींवर भर दिला, जेणेकरून व्यवसायांना या करारातून निर्माण होणाऱ्या संधींचा पूर्ण लाभ घेता येईल.
संमेलना दरम्यान, आरोग्यसेवा, प्रगत उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सेवा आणि ग्राहक वस्तू या क्षेत्रांतील गोलमेज चर्चांतून पुढे आलेल्या शिफारशी उद्योग प्रतिनिधींनी सादर केल्या. या शिफारशींमध्ये नवोन्मेष, गुंतवणूक आणि मजबूत व्यावसायिक भागीदारीद्वारे द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला.
संमेलना नंतर, पियुष गोयल यांनी भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळासोबतच्या संवादात्मक सत्राच्या माध्यमातून युनायटेड किंगडममधील दोन दिवसांच्या व्यावसायिक दौऱ्याची सांगता केली. शिष्टमंडळाच्या सदस्यांनी त्यांच्या भेटीगाठींमधून आलेले महत्त्वाचे अनुभव, संभाव्य भागीदारांशी झालेली चर्चा आणि विविध क्षेत्रांत ओळखल्या गेलेल्या व्यावसायिक संधींची माहिती दिली.
या भेटींनी भारत-यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामागील मजबूत संधीला पुन्हा एकदा बळ मिळाले आणि या कराराचे रूपांतर प्रत्यक्ष व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये करण्यासाठी दोन्ही सरकारे व उद्योग क्षेत्राची सामायिक कटिबद्धता अधोरेखित झाली.
***
सुषमा काणे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2278519)
आगंतुक पटल : 7