वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
अपेडाच्या मदतीने मध्य प्रदेशातील जीआय मानांकन प्राप्त 'रिवा सुंदरजा' आंब्यांची संयुक्त अरब अमिरातीला पहिली व्यावसायिक निर्यात
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2026 10:27AM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडाने) जी आय मानांकन मिळवलेल्या 'रीवा सुंदरजा' आंब्यांची पहिली व्यावसायिक निर्यात मध्य प्रदेशातून संयुक्त अरब अमिरातीला करण्यात मदत केली. यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताच्या अद्वितीय कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अपेडाने या उत्कृष्ट दर्जाच्या आंब्याच्या जातीसाठी निर्यात संपर्क प्रस्थापित करण्याकरिता मध्य प्रदेश सरकारचा फलोत्पादन विभाग, निर्यातदार, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) पॅकिंग हाऊस चालक आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांच्यासोबत जवळून काम केले आहे. या समन्वित प्रयत्नांमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक खरेदीदार मिळाला, ज्यामुळे प्रसिद्ध 'रीवा सुंदरजा' आंब्याच्या आंतरराष्ट्रीय विपणनाचा मार्ग मोकळा झाला.
मे. सॉल्ट रेंज फूड्स प्रा. लि. यांनी 26 जून 2026 रोजी जीआय-टॅग असलेल्या एक मेट्रिक टन रीवा सुंदरजा आंब्यांची पहिली व्यावसायिक निर्यात खेप संयुक्त अरब अमिरातीला पाठवली. ही महत्त्वपूर्ण खेप रीवा सुंदरजा आंब्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे आणि आगामी हंगामात नियमित निर्यातीचा मार्ग प्रशस्त करेल अशी अपेक्षा आहे.
निर्यात होणाऱ्या मालामध्ये मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील गोविंदगड येथील मे. सोंधा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि प्रगतिशील शेतकरी सोनू गुप्ता यांच्याकडून खरेदी केलेल्या, जीआय-टॅग असलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या रीवा सुंदरजा आंब्यांचा समावेश होता. या आंब्यांची काढणी विहित गुणवत्ता मानकांनुसार करण्यात आली होती आणि उत्तर प्रदेशातील भदोही येथील त्रिसागर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अपेडा-सुविधाप्राप्त पॅक हाऊसमध्ये त्यांची प्रतवारी, वर्गीकरण आणि निर्यात-दर्जाचे पॅकेजिंग करण्यात आले. निर्यात पॅकेजिंग आणि वनस्पती आरोग्यविषयक आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर ही खेप संयुक्त अरब अमिरातीला पुढील हवाई मार्गाने पाठवण्यासाठी वाराणसी विमानतळावर नेण्यात आली.
व्यावसायिक निर्यातीमुळे रीवा भागातील आंबा उत्पादकांना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक बाजारात रीवा सुंदरजा आंब्याचा प्रचलित बाजारभाव अंदाजे ₹100 ते ₹110 प्रति किलोग्राम असताना, निर्यातदाराने हा माल ₹150 प्रति किलोग्राम दराने खरेदी केला. प्रति किलोग्राम ₹40 ते ₹50 चा हा अधिकचा भाव शेतकऱ्यांना थेट लाभ देतो आणि उत्पादकांना निर्यात-केंद्रित मूल्य साखळीमध्ये समाविष्ट करण्याचे आर्थिक फायदे यातून दिसून येतात. या उपक्रमामुळे अधिक शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन आणि काढणीनंतरच्या पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळण्याची, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये त्यांची पोहोच वाढण्याची अपेक्षा आहे.
या यशस्वी निर्यातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रदेश-विशिष्ट कृषी उत्पादनांना एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जी आय मानांकन नोंदणीचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. आपल्या विलक्षण गोडव्यासाठी, समृद्ध सुगंधासाठी, तंतुहीन गरासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रीवा सुंदरजा आंब्यामध्ये मोठी निर्यातक्षमता आहे. या व्यावसायिक निर्यातीमुळे या देशी जातीची जागतिक ओळख वाढण्याची त्याचबरोबर मध्य प्रदेशला उच्च दर्जाच्या आंब्यांच्या निर्यातीचे एक उदयोन्मुख केंद्र म्हणून स्थापित होण्याची अपेक्षा आहे.
या महत्त्वपूर्ण कामगिरीचे औचित्य साधून 26 जून 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीला जीआय-टॅग असलेल्या रीवा सुंदरजा आंब्यांच्या पहिल्या व्यावसायिक निर्यात खेपेसाठीऔपचारिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मध्य प्रदेशातून कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या अपेडाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे . हे अपेडा, मध्य प्रदेश सरकारचा फलोत्पादन विभाग, निर्यातदार, शेतकरी उत्पादक संघटना, पॅक हाऊस चालक व शेतकरी यांच्यातील यशस्वी सहकार्याचे प्रतीक आहे.
निर्यात पायाभूत सुविधा बळकट करून, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांचे पालन सुनिश्चित करून, बाजारपेठेशी संबंध विकसित करून तसेच जागतिक बाजारपेठांमध्ये भारताच्या कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन जीआय-टॅग असलेल्या आणि मूल्यवर्धित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यात अपेडा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रीवा सुंदरजा आंब्यांच्या व्यावसायिक निर्यातीच्या यशस्वी प्रारंभाने भारतातील जीआय उत्पादनांसाठी नवीन संधी निर्माण होण्याची, कृषी निर्यात परिसंस्थेला बळकटी मिळण्याची आणि रीवा परिसरातील आंबा उत्पादकांच्या शाश्वत उत्पन्न वाढीस हातभार लागण्याची अपेक्षा आहे.
***
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2278408)
आगंतुक पटल : 22