वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-यूके सीईटीए आणि डीसीसी च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर,केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 25 ते 27 जून दरम्यान युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2026 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 25 ते 27 जून 2026 या कालावधीत युनायटेड किंगडम मधील लंडन येथे अधिकृत भेट देतील.
भारत-यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीए), तसेच त्याला पूरक असलेला दुहेरी योगदान करार (डीसीसी) 15 जुलै 2026 रोजी अमलात येत असून, या पार्श्वभूमीवर गोयल यांचा हा दौरा आहे.
या दौऱ्यादरम्यान, गोयल, युनायटेड किंगडमच्या व्यापार आणि उद्योग विभागाचे मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) पीटर काईल यांच्याबरोबर उच्च-स्तरीय द्विपक्षीय बैठक घेतील. दोन्ही देशांमधील करारांच्या अंमलबजावणीच्या आणि आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.
सीईटीए आणि डीसीसीची सुरळीत अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी नियामक आराखडा आखणे, सीमापार सीमाशुल्क समन्वय सुव्यवस्थित करणे आणि प्रशासकीय यंत्रणेला अंतिम रूप देणे यावर द्विपक्षीय चर्चेत भर असेल. यावेळी दोन्ही बाजू सीईटीए अंतर्गत शुल्क उदारीकरणाबाबत वचनबद्धतेच्या अंमलबजावणीसाठीच्या तयारीचा आढावा घेतील, यामुळे युनायटेड किंगडममध्ये भारतीय निर्यातीसाठी बाजारपेठ प्रवेशाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील. चर्चेमध्ये दुहेरी योगदान कराराच्या कार्यान्वयन आराखड्याचाही समावेश असेल, यामुळे पात्र अस्थायी कामगारांसाठी दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदानाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एक सुव्यवस्थित यंत्रणा स्थापित होईल आणि त्याद्वारे परस्परांमध्ये व्यावसायिक आणि व्यवसायांच्या अधिक वाहतुकीला समर्थन मिळेल.
दोन्ही बाजू प्रमुख सेवा क्षेत्रांमधील परस्पर बाजारपेठ प्रवेशाच्या वचनबद्धतेची अंमलबजावणी करण्याबाबत पुढील चर्चा करतील आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतील. हा करार देशांतर्गत आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्याबरोबरच, द्विपक्षीय व्यापारासाठी पारदर्शक, नियम-आधारित चौकटीला प्रोत्साहन देत जागतिक आर्थिक संधींचा विस्तार करण्यासाठी विकसित भारत संकल्पने अंतर्गत सुरू असलेले प्रयत्न प्रतिबिंबित करतो.
या दौऱ्याचा एक भाग म्हणून, भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील व्यापारी भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी गोयल उद्योग क्षेत्रातील दिग्गज, गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट प्रतिनिधींबरोबरच्या ' गव्हर्नमेंट टू बिझनेस' (G2B) स्वरूपाच्या विविध बैठकांमध्ये सहभागी होतील. ते इंडिया ग्लोबल फोरम (आयजीएफ) च्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील, यावेळी ते "कॅपिटल, इनोव्हेशन अँड द यूके-इंडिया मोमेंट" या संकल्पनेवर आपले विचार मांडतील. भारत-यूके सीईटीए च्या आगामी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यवसायांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर या सत्रात विशेष भर दिला जाईल.
गोयल एचएसबीसी (ग्लोबल ट्रेड सोल्युशन्स) आणि रोल्स रॉयससह आघाडीच्या जागतिक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधतील. यामध्ये धोरणात्मक गुंतवणूक, औद्योगिक सहयोग आणि भारतातील उत्पादन भागीदारीचा विस्तार यावर चर्चा होईल.
यूके-इंडिया बिझनेस कौन्सिल (यूकेआयबीसी) द्वारे आयोजित केलेल्या व्यावसायिक पूर्ण सत्रात आणि संवादात्मक मेजवानी कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी भारत-ब्रिटन आर्थिक भागीदारी अंतर्गत व्यापार, गुंतवणूक आणि व्यवसाय सहकार्याच्या संधींवर चर्चा करण्यासाठी टाटा, टीसीएस, एचएसबीसी, प्रुडेन्शियल, डी बीअर्स आणि बेकर मॅकेन्झी यासह आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सी-सूट कार्यकारी अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येतील.
संस्थात्मक गुंतवणूकदार आणि जागतिक उद्योग क्षेत्रातील दिग्गज यांच्याशी संवाद अधिक दृढ करण्यासाठी, गोयल 'आशिया हाऊस'तर्फे आयोजित एका विशेष गोलमेज चर्चेचे नेतृत्व करतील. मॉर्गन, स्टँडर्ड चार्टर्ड, लॉईड्स, मॉर्गन स्टॅन्ले आणि अरूप यासह आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय आणि औद्योगिक संस्थांचे वरिष्ठ अधिकारी भारताची औद्योगिक स्पर्धात्मकता, गुंतवणुकीची स्थिती आणि जागतिक पुरवठा साखळ्यांशी जोडणी, या विषयावरील चर्चेत भाग घेतील.
हा व्यापार आणि गुंतवणूक कार्यक्रम, भारतातून आलेल्या उद्योग क्षेत्रातील शिष्टमंडळाबरोबरच्या विशेष संवादाने तसेच ब्रिटिश-भारतीय व्यावसायिक समुदाय आणि GEDU सारख्या जागतिक शिक्षण समूहांच्या प्रतिनिधींबरोबरच्या भेटीगाठींनी संपन्न होईल.
जागतिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची भारताची वचनबद्धता या भेटीमुळे अधोरेखित होते. यामुळे भारत-यूके यांच्यातील आर्थिक सहकार्याचा विस्तार आणि 2030 पर्यंत 120 अब्ज अमेरिकन डॉलर्स द्विपक्षीय व्यापाराचे उद्दिष्ट गाठणे, या सामायिक ध्येयाच्या पूर्ततेला हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277591)
आगंतुक पटल : 9