पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक शिखर परिषद 2026 ला केले संबोधित
भारत ही केवळ सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था नव्हे तर ती विश्वासार्ह अर्थव्यवस्था देखील आहे: पंतप्रधान
उदयोन्मुख शक्ती असण्यासोबतच, भारत ही एक विश्वसनीय ताकद देखील आहे: पंतप्रधान
भारतासाठी, राष्ट्र प्रथम हे सर्वोच्च मार्गदर्शक तत्व आहे: पंतप्रधान
भारतात माओवादी दहशतवाद आता शेवटच्या घटका मोजत आहे: पंतप्रधान
देशाच्या मानसिकतेमध्ये “हे काम कधीच करता येणार नाही” कडून “हे काम होऊन जाईल” असा झालेला बदल ही भारताची सर्वात मोठी कामगिरी आहे: पंतप्रधान
सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांना सक्षम करत आहे: पंतप्रधान
140 कोटी भारतीयांचे सामुहिक प्रयत्न विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करतील: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2026 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रिपब्लिक शिखर परिषदेला संबोधित केले. या परिषदेतील सहभागींना अभिवादन करत, पंतप्रधानांनी जग वेगवान आणि महत्त्वपूर्ण घडामोडींचे साक्षीदार ठरत असतानाच्या काळात, “महान शक्ती भारत: राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर आधारित चर्चेचे यजमानपद भूषवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी अधोरेखित करत सांगितले की, गेल्या दशकात भारताने मिळवलेले यश आणि विश्वासार्ह जागतिक ताकद म्हणून भारताचा झालेला उदय यासाठी “राष्ट्र प्रथम”ची भावना हे मार्गदर्शक तत्व ठरले आहे. भारत ही प्रदीर्घ ऐतिहासिक स्मृती असलेली आणि प्रगती तसेच प्रतिकूलता अशा दोन्हींकडून धडे घेण्याची अद्वितीय क्षमता असलेली नागरी संस्कृती आहे असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले. ते म्हणाले की, आज घेण्यात येत असलेले निर्णय आणि कृती आगामी शतकांमधील देशाच्या भविष्याचा पाया घालत आहेत. “जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था होण्यासोबतच आपला देश एक विश्वासार्ह आणि खात्रीलायक भागीदार म्हणून उदयाला आला आहे. भारताचा उदय विश्वास, स्थैर्य आणि व्यापक जागतिक हिताप्रती बांधिलकीच्या पायावर झाला आहे,” त्यांनी नमूद केले.
अलीकडेच झालेल्या जी7 शिखर परिषदेतील सहभागाचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की जगभरातील नेते भारताच्या “राष्ट्र प्रथम” च्या तत्वाप्रती अविचल कटिबद्धतेला मान्यता देत आहेत. ते पुढे म्हणाले की देश विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असताना या मार्गदर्शक तत्वज्ञानाने देशाची धोरणे, प्राधान्यक्रम आणि आकांक्षांना आकार दिला आहे.
सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या सेवाकाळावर प्रकाश टाकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीला प्रोत्साहन आणि स्थानिक उत्पादनांसाठीची मोहीम अशा प्रमुख राष्ट्रीय उपक्रमांना यश मिळाले कारण नागरिकांनी ‘राष्ट्र प्रथम’च्या भावनेचा मनापासून स्वीकार केला. या दृष्टिकोनाचा आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागांवर झालेला परिवर्तनशील प्रभाव अधोरेखित करत, पंतप्रधान म्हणाले, “एकेकाळी हिंसा आणि अपुऱ्या विकासाने कुंठीत झालेल्या भागांमध्ये अभूतपूर्व प्रगती होताना दिसत आहे. गेल्या दशकभरात, त्या प्रभावित भागांमध्ये 12,000 किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते, 9500 मोबाईल टॉवर्स, बँकिंग सुविधा, टपाल कार्यालये आणि संपर्क सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे.”
सुरक्षेसाठीचे दृढ निश्चयी प्रयत्न आणि वेगवान विकास यांच्या एकत्रित परिणामांमुळे गेल्या काही दशकांमध्ये हजारो बळी घेणारा माओवादी दशहतवाद आता शेवटच्या घटका मोजत आहे असे निरीक्षण मोदी यांनी व्यक्त केले. “बस्तर ऑलिम्पिक्सचे वाढते यश हा येथील युवकांच्या आकांक्षा आणि प्रतिभा यांनी या क्षेत्राशी एकेकाळी जोडल्या गेलेल्या भीती आणि अनिश्चिततेची जागा घेतली असल्याचा सबळ पुरावा आहे,” त्यांनी निर्देश केला.
आकांक्षित भारताच्या उदयावर अधिक भर देत, पंतप्रधान मोदी म्हणाले की आपला देश निराशावादाच्या युगाकडून आत्मविश्वास आणि संधींच्या युगाकडे वळला आहे. “बदल शक्य आहे” हा विश्वास भारताची एक सर्वात मोठी ताकद बनला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. “आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स कार्यक्रमाने आपल्या देशाच्या काही सर्वात कमी विकसित भागांचे विकासाच्या प्रेरक शक्तींमध्ये रुपांतर घडवून आणले आहे. या प्रयत्नांनी लाखो नागरिकांचे जीवनमान सुधारण्यात तसेच त्यांच्यासाठी संधींचा विस्तार करण्यात लक्षणीय योगदान दिले आहे,” मोदी यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान म्हणाले की, विकासाचे लाभ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या पलीकडे विस्तारले असून ते संपूर्ण समाजाला समृद्ध करण्यात योगदान देतात. “अलीकडच्या काही वर्षांमध्ये दारिद्यरेषेच्या बाहेर पडलेल्या सुमारे 25 कोटी लोकांसह, मोठ्या प्रमाणात निओ-मध्यम वर्गाचा उदय यांनी आर्थिक व्यवहार बळकट झाले आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध संधीचा विस्तार झाला आहे. दारिद्र्य निर्मुलन हे केवळ कल्याणकारी उद्दिष्ट नसून विकास, आकांक्षा आणि सामाजिक गतिशीलता यांना चालना देणारे उत्प्रेरक देखील आहे,” त्यांनी नमूद केले.
गेल्या दशकभरात मध्यमवर्गावर सरकारने केंद्रित केलेले लक्ष अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनमानातील सुलभतेत वाढ करण्याला सरकारचे अत्यंत प्राधान्य राहिले आहे. रेंगाळलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा संदर्भ देत ते म्हणाले की, प्रलंबित निवासी प्रकल्पांच्या पूर्ततेला चालना देण्यासाठी 25,000 कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे देशभरातील गृहखरेदीकर्त्यांना हजारो घरांचे वितरण करण्यात येणार आहे. “गृहखरेदीसाठी परवडण्याजोग्या दरात वित्तपुरवठ्याची उपलब्धता, डिजिटल सेवा आणि सुधारित नागरी पायाभूत सुविधा यांनी नागरिकांच्या जीवनाचा दर्जा उंचावला आहे. किफायतशीर आणि मध्यम-उत्पन्न गटांसाठी गृहनिर्माण निधीविषयक (एसडब्ल्यूएएमआयएच) विशेष खिडकी सुविधेने रेंगाळलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून गृहखरेदीकर्त्यांना ते वितरीत करण्यासाठी मदत केली आहे,” पंतप्रधान म्हणाले.
गेल्या दशकभरात भारताच्या वाहतूक आणि संपर्क जोडणीविषयक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय विस्तार घडून आला आहे असे सांगत पंतप्रधान म्हणाले, “मेट्रो रेल्वेचे जाळे दररोज एक कोटीपेक्षा जास्त प्रवाशांना सेवा देत आहे तर, वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत रेल्वे गाड्या देशभरातील संपर्क अधिक बळकट करत आहेत. रस्ते, महामार्ग आणि विमानतळांच्या विस्तारित जाळ्याने गतिशीलता सुधारली आहे आणि शहरी तसेच उदयोन्मुख विकास केंद्रे अशा दोन्हींमध्ये नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण केल्या आहेत,” निरीक्षण नोंदवत पंतप्रधान म्हणाले.
करविषयक सुधारणांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी करदात्यांच्या व्यययोग्य उत्पन्नात वाढ आणि नियमपालनाच्या ओझ्यात कपात करण्याच्या उद्देशाने केलेल्या उपाययोजना अधोरेखित केल्या. चेहेराविरहित प्रक्रिया आणि ऑनलाईन फाईलिंग यंत्रणांसह सुलभीकृत आणि तंत्रज्ञान-सक्षम कर प्रशासनामुळे करदात्यांची सोय आणि पारदर्शकता यामध्ये वाढ झाली आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले.
परवडण्याजोग्या दरात औषधे उपलब्ध करून देणाऱ्या जनौषधी केंद्रांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून कुटुंबांच्या वैद्यकीय बाबींवरील खर्चामध्ये कपात करण्याचे तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचे सरकारने प्रयत्न देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या उपक्रमांनी आरोग्यसेवा उपलब्ध होण्याच्या सुलभतेत सुधारणा व्हायला मदत केली असून लाखो कुटुंबांना स्वतःच्या खिशातून करावा लागणारा वैद्यकीय खर्च कमी झाला आहे.
मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांविषयी बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, करातून दिलासा देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांनी कर-मुक्त उत्पन्नाची मर्यादा लक्षणीय प्रमाणात वाढवली असून नागरिकांना खर्च करण्यासाठी अधिक उत्पन्न हातात शिल्लक राहू लागले. पंतप्रधानांनी ऑनलाईन फायलिंग प्रणाली तसेच चेहेराविरहित मूल्यांकन यंत्रणांसह तंत्रज्ञान-सक्षम सुधारणांच्या माध्यमातून कर प्रशासनात आणलेली सुलभता अधोरेखित करत या सुधारणांमुळे नियमपालनाचे ओझे कमी होऊन एकंदर प्रक्रियेत पारदर्शकता सुधारली असे मत व्यक्त केले.
नागरिकांच्या बदलत्या आकांक्षांच्या संदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारताच्या विकासविषयक प्रवासाने वाढत्या अपेक्षांची संस्कृती निर्माण केली आहे, ज्यामुळे नागरिक उत्तम पायाभूत सुविधा, वेगवान सेवा आणि उच्च राहणीमानाची मागणी करत आहेत. या आकांक्षा म्हणजे देशाच्या भविष्यावरच्या विश्वासाचे सकारात्मक चिन्ह आणि देशाची प्रगती शक्य आहे यावर असलेल्या नागरिकांच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.”
पंतप्रधान म्हणाले की भारतातील तरुण, उद्योजक, नवोन्मेषकर्ते आणि स्टार्ट अप्स वेगाने बदलत्या जागतिक वातावरणात उदयाला येत असलेल्या संधींचा वापर करून घेण्यात अग्रस्थानी आहेत. ‘राष्ट्र प्रथम’च्या भावनेसह सुधारणा, नवोन्मेष तसेच नागरिक-केंद्री प्रशासन यांच्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. वेगाने विकसित होणाऱ्या भारताच्या आकांक्षा आणि सततची नकारात्मकता आणि विरोधाने भरलेला राजकीय चर्चेचा एक प्रवाह यांच्यातील तफावत मोदी यांनी स्पष्टपणे दाखवून दिली. नागरिक उत्तम पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संपर्क व्यवस्था आणि संधींची अधिकाधिक प्रमाणात मागणी करत असताना काही गट विकासात्मक उपक्रमांना विरोध करतात मात्र तरीही त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची मागणी करतात. देशाच्या उभारणीत संरचनात्मक सहभागाचे महत्त्व अधिक ठळकपणे सांगत पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना, विशेषतः तरुणांना, भारताच्या विकासविषयक उद्दिष्टांवर तसेच ‘राष्ट्र प्रथम’च्या तत्वावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
भाषण संपवताना, पंतप्रधानांनी सांगितले की संपूर्ण जग सध्या पारंपरिक व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि त्याच वेळी विकास आणि नवोन्मेष यांसाठी नव्या संधी निर्माण करणाऱ्या अभूतपूर्व उलथापालथीचा अनुभव घेत आहे. या संधींचा वापर करून घेऊन देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचे आवाहन त्यांनी भारताचा तरुण वर्ग, उद्योजक, नवोन्मेषकर्ते तसेच स्टार्ट अप उद्योगांना केले. “या परिवर्तनात्मक प्रवासात सरकार जनतेसोबत ठामपणे उभे आहे. आपला देश वेगवान विकासाच्या मार्गावर घोडदौड करत आहे आणि हा वेग यापुढे आणखी वाढत जाईल,” ग्वाही देत मोदी म्हणाले. सामुहिक प्रयत्न आणि 1.4 अब्ज भारतीयांच्या आकांक्षा यातून विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
* * *
नितीन फुल्लुके/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277140)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada