राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित सामूहिक योग प्रात्यक्षिकात घेतला सहभाग
योग हे व्यक्तीला स्वतःशी, समाजाला निसर्गाशी आणि मानवतेला विशाल वैश्विक चेतनेशी जोडणारे एक शक्तिशाली माध्यम आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2026 12:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 जून 2026) मध्य प्रदेशातील जबलपूर येथे आयोजित सामूहिक योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरातील योग साधकांना शुभेच्छा दिल्या. आज आपण भारताच्या अशा महान परंपरेचा उत्सव साजरा करत आहोत ज्या परंपरेने मानवतेला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवला आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. योग ही जागतिक समुदायाला भारताच्या सांस्कृतिक वारशाने दिलेली एक अमूल्य देणगी आहे, असेही त्यांनी सांगितले.

योग म्हणजे व्यक्तीला स्वतःशी, समाजाला निसर्गाशी आणि मानवतेला विशाल वैश्विक चेतनेशी जोडणारे एक शक्तिशाली माध्यम आहे, असे त्या म्हणाल्या. आज जग अनेक आव्हानांना तोंड देत असताना योग मानवतेला शांती, संतुलन, सुसंवाद आणि सामूहिक कल्याणाचा मार्ग दाखवू शकतो, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या पुढाकारामुळे 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित केला. त्या घोषणेमुळे जागतिक कल्याणासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून योगाचे महत्त्व अधोरेखित झाले, हे त्यांनी नमूद केले. आज, अनेक देशांमधील लाखो लोक योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना, 'निरोगी वार्धक्यासाठी योग', समाजातील ज्येष्ठ नागरिकांना निरोगी, सक्रिय, आत्मनिर्भर आणि सन्मानाने जीवन जगण्यात योगाच्या भूमिकेवर प्रकाश टाकते, असे त्यांनी सांगितले. आपण आज स्विकारलेली जीवनशैली आपल्या भविष्यातील आरोग्य आणि कल्याणाचा पाया रचते, हे त्यांनी स्पष्ट केले. योग व्यक्तींना वाढत्या वयातही सक्रिय आणि स्वावलंबी राहण्यास मदत करतो. त्याचबरोबर, तो मानसिक शांती आणि भावनिक संतुलन वाढवतो, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

भारत सरकार योग शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून योगाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने काम करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जगभरातील अनेक संस्था लोकांना योगाभ्यासाचा स्वीकारण्यासाठी प्रेरित करत आहेत, हे पाहून आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. योग-संबंधित संस्थांच्या समर्पित प्रयत्नांमुळे योग प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा आधारस्तंभ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी लोकांना योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले. योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवल्याने निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंबे, निरोगी समाज, निरोगी राष्ट्र आणि निरोगी जग निर्माण करण्याच्या उदात्त ध्येयात प्रत्येकजण योगदान देऊ शकेल, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
* * *
नितीन फुल्लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2276502)
आगंतुक पटल : 7