कलाकार आणि चित्रपटनिर्माते असल्यामुळे आपल्याला तंत्रज्ञान आणि कलात्मकता यात समतोल साधण्याची गरज : चित्रपट निर्मात्या ध्वनी देसाई
19 व्या मिफ्फ महोत्सवात ॲनिमेशन चित्रपट निर्मात्यांनी कथाकथन, सर्जनशीलता आणि या माध्यमाचे भविष्य याविषयी मांडला दृष्टिकोण
मुंबई, 20 जून 2026
“तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाऊन शिंपले गोळा करू शकता, वाळूचे किल्ले बनवू शकता, किंवा कदाचित एखाद्याला तिथे 'निर्वाण'ही प्राप्त होऊ शकते, हे सर्वकाही तुम्ही त्या अनुभवातून काय मिळवता, यावर अवलंबून असते.” असे चित्रपट निर्मात्या ध्वनी देसाई यांनी19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2026 मध्ये कथाकथन, सर्जनशीलता आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन या विषयावरील एका रंजक चर्चासत्रात सांगितले. विविध कलात्मक परंपरांमधील ॲनिमेशन चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणणाऱ्या या सत्रात, कल्पनांचे चित्रपटांत कसे रूपांतर होते आणि प्रेक्षक त्यातून कसा अर्थबोध करून घेतात, यावर चर्चा झाली.
एका झेन बुद्धिस्ट कथेचा आधार घेत, प्रेक्षक चित्रपटांचा अनुभव कशा वेगवेगळ्या प्रकारे घेतात, यावर देसाई यांनी विचार मांडले. “तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाऊन शिंपले गोळा करू शकता, वाळूचे किल्ले बनवू शकता, किंवा कदाचित एखाद्याला तिथे 'निर्वाण'ही प्राप्त होऊ शकते, हे सर्वकाही तुम्ही त्या अनुभवातून काय मिळवता, यावर अवलंबून असते,” असे त्या म्हणाल्या. चित्रपट बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रेक्षकांसाठी वेगवेगळा अर्थ कसा व्यक्त करू शकतात, हेच या रूपकातून अधोरेखित झाले.

अॅनिमेशन चित्रपट निर्माते रायमंड क्रुम यांनीही असाच दृष्टिकोन मांडला. प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांचा आपापल्या पद्धतीने अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य घेतात, या गोष्टीचा त्यांना आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले. "प्रत्येक संस्कृतीचा चित्रपट समजून घेण्याचा स्वतःचा मार्ग असतो आणि मला ते स्वातंत्र्य आवडते," असे ते म्हणाले. प्रेक्षकांना कोणत्याही एकाच अर्थाकडे नेण्याऐवजी, आपल्याला अशा भावना आणि अनुभवांभोवती कथा रचायला आवडतात, ज्या जगभरातल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना समजतील, आणि त्यांना आपापल्या परीने त्याचा अर्थ लावण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले.
आपल्या सर्जनशील प्रक्रियेची एक झलक देताना, रायमंड यांनी सांगितले की, त्यांच्या अनेक कल्पना थेट भिंतींवर काढलेल्या रेखाटनांमधून सुरू होतात. "माझ्या कल्पनांना मुक्तपणे प्रवाहित होऊ देण्यासाठी मी भिंतींवर चित्र काढतो," असे ते म्हणाले. ही रेखाचित्रे अनेकदा प्रदर्शने आणि चित्रपट या दोन्हींचा सुरुवातीचा बिंदू ठरतात. हालचाल हा त्यांच्या कलात्मक कार्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्यांची रेखाटने अनेकदा ऊर्जा, लय आणि गती टिपण्यासाठी तयार केलेली असतात, हे त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चेत, गेल्या काही वर्षांत ॲनिमेशनमध्ये कसे बदल झाले आहेत, याचाही मागोवा घेण्यात आला. दोन्ही वक्त्यांनी हे मान्य केले की, या माध्यमात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असून आज ते केवळ मनोरंजनाचे साधन नसून गंभीर कलात्मक अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम म्हणून मान्यता मिळवत आहे. त्याच बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेची त्यांनी दखल घेतली.

चित्रपट निर्माते रायमंड यांनी नृत्य करणाऱ्या एका जोडप्यावर आधारित त्यांच्या चित्रपटामागील गूढ अर्थ देखील उलगडून सांगितला. जरी चित्रपटाची कथा प्रवासाभोवती फिरत असली, तरी तो खऱ्या अर्थाने प्रवासाच्या अनुभवाबद्दल आहे, असे ते म्हणाले. "प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे. तो रोमांचक अनुभव असायला हवा," असे ते म्हणाले. त्यांनी भौतिक प्रवासाची तुलना जीवनाच्या व्यापक प्रवास अशी करत या संकल्पनेचा अधिक सखोल अर्थ स्पष्ट केला.
या सत्राने प्रेक्षकांना ॲनिमेशन चित्रपट निर्मात्यांच्या सर्जनशील विचारांची जवळून ओळख करून दिली, तसेच वैयक्तिक अनुभव, कल्पना आणि नवीन तंत्रज्ञान त्यांच्या कथांवर कसा प्रभाव टाकतात याची झलक दाखवली. या सत्राने हे देखील अधोरेखित केले की ॲनिमेशन म्हणजे केवळ हालचाल करणारी चित्रे नसून, प्रेक्षकांच्या मनात चित्रपट संपल्यानंतरही दीर्घकाळ जिवंत राहतील असे अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
Release ID:
2275848
| Visitor Counter:
50