MIFF banner

मिफ्फ 2026 मध्ये सदाबहार क्लासिक 'अॅलिस इन वंडरलँड' चित्रपटाचा विशेष खेळ: स्वप्नांच्या दुनियेतला जादुई प्रवास

मुंबई, 20 जून 2026

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2026 मधील 'ॲलिस इन वंडरलँड' या अजरामर ॲनिमेटेड क्लासिक चित्रपटाच्या विशेष खेळाने, या वैविध्यपूर्ण कार्यक्रमामध्ये जुन्या आठवणी, कल्पनारम्यता, आणि विस्मयाचे रंग भरले. या स्क्रीनिंगमुळे महोत्सवातील प्रेक्षकांना ही अत्यंत लोकप्रिय आणि उत्कृष्ट कलाकृती मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची दुर्मिळ संधी मिळाली. लुईस कॅरोल यांच्या 'अ‍ॅलिस अ‍ॅडव्हेंचर्स इन वंडरलँड' या अत्यंत गाजलेल्या कादंबरीवर आधारित, या चित्रपटाचं दिग्दर्शन विल्फ्रेड जॅक्सन, क्लाइड गेरोनिमी आणि हॅमिल्टन लुस्के या द्रष्ट्या  दिग्दर्शक त्रयीने केलं आहे. अ‍ॅनिमेशन क्षेत्रात एक सदाबहार उत्कृष्ट कलाकृती म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट, कालातीत साहित्याचं रूपांतर एका जिवंत, रंगतदार आणि मनोरंजक दृश्यात्मक अनुभवात कसं केलं जाऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण आहे.

एक तेजस्वी आणि संगीतमय स्वप्ननगरी

लुईस कॅरोल यांची मूळ साहित्यकृती जरी त्यांचा चातुर्यपूर्ण शब्दखेळ, विलक्षण पात्र आणि तात्त्विक छटांसाठी प्रसिद्ध आहे, तरी त्याचं ॲनिमेटेड रूपांतर रंगीबेरंगी दृश्य, जिवंत कथाकथन आणि अविस्मरणीय संगीतामधून वंडरलँडला जिवंत करतं.

हा चित्रपट अ‍ॅलिस नावाच्या एका जिज्ञासू लहान मुलीचा प्रवास दाखवतो, जी बोलणारी फुलं, खोडकर चेशायर मांजर, नेहमीच उशीर होणारा पांढरा ससा, आणि अत्यंत आव्हानात्मक असलेल्या क्वीन ऑफ हार्ट्सची वस्ती असलेल्या एका अद्भुत जगात विलक्षण साहसी सफरीवर निघते. या प्रवासात अ‍ॅलिसच्या भेटीला अशा काही अविस्मरणीय व्यक्तिरेखा आणि अनुभव येतात, जे वास्तव आणि कल्पनाशक्ती यांच्यातली सीमारेषा पुसट करतात. या चित्रपटाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे, त्याचं मंत्रमुग्ध करणारं संगीत. 'द अनबर्थडे साँग' आणि 'गोल्डन आफ्टरनून' यांसारखी लोकप्रिय गाणी कथानकात सहजपणे गुंफली आहेत, जी वंडरलँडचा खेळकर भाव टिपतात, आणि त्याचं रूपांतर संस्मरणीय संगीतमय क्षणांमध्ये करतात.

सात दशकांहून अधिक काळच्या जादुई प्रवासाचा उत्सव

प्रदर्शनाला सत्तर वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही, 'ॲलिस इन वंडरलँड' जगभरातील प्रेक्षकांना मोहित करत आहे. या चित्रपटाचं अविरत टिकून राहिलेलं आकर्षण म्हणजे, कल्पकता, जिज्ञासा आणि स्वप्नांचा अर्थ लागण्यासाठी ते तर्कावर आधारित असण्याची गरज नसते, या विचाराचा उत्सव आहे.

कल्पक अ‍ॅनिमेशन, सजीव व्यक्तिरेखा आणि अद्भूत निसर्गदृश्यांच्या जोरावर, हा चित्रपट आजही एक अजरामर कलाकृती ठरला आहे, जो लहान मुलांबरोबरच प्रौढ प्रेक्षकांच्याही मनाला भिडतो. या चित्रपटाचं मिफ्फ 2026 मधील प्रदर्शन, हे ॲनिमेटेड कथाकथनाची चिरंतन ताकद आणि वास्तवा पलीकडच्या जगाचा शोध घेण्याच्या सार्वत्रिक आनंदाची जाणीव करून देतं.  

ऑस्कर-विजेत्या लघुपटांचे खेळ आणि प्रख्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांच्या 'मास्टरक्लासेस'सारख्या महोत्सवातील इतर प्रमुख कार्यक्रमांच्या बरोबर, 'ॲलिस इन वंडरलँड' या चित्रपटाच्या खेळाने, मिफ्फ 2026 चा वैविध्यपूर्ण कार्यक्रम अधिक समृद्ध केला, ज्यामध्ये चित्रपटाची जादू, सर्जनशीलता आणि चिरस्थायी आकर्षण याचा उत्सव साजरा झाला.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275786   |   Visitor Counter: 13