पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओदिशा राज्य सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा : पंतप्रधान

पहाडपूर गाव आता सौर गाव म्हणून वेगाने विकसित केले जाईल, यामुळे या गावातील  प्रत्येक घरात सौर ऊर्जेची सुनिश्चिती होईल : पंतप्रधान

भारताच्या पूर्वेकडील भागाच्या विकासाच्या माध्यमातून संपूर्ण भारताचा विकास करणे हाच केंद्र सरकारचा दृष्टिकोन : पंतप्रधान

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी केंद्र सरकार आदिवासी युवा वर्गाला शिक्षण आणि रोजगाराच्या संधींशी जोडत आहे : पंतप्रधान

आदिवासी मुलांना अभ्यासासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी देशभरात सुमारे 500 एकलव्य आदर्श  शाळा उघडण्यात आल्या  : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2026 4:31PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या पवित्र उपवनांत, तसेच हो जाहेरा कौशल्य केंद्रात  आणि पहाडपूर शाळेत जाऊन प्रार्थना केली. यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला. ओदिशा राज्य सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विकास रा धारा, ओदिशा सारा अशी या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
यानिमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशाच्या जनतेला शुभेच्छाही दिल्या. राज्यात नुकताच  राजा हा सण साजरा झाला, तर मयूरभंजमधील प्रसिद्ध बारीपाडा रथयात्रेसह भगवान जगन्नाथाच्या पवित्र रथयात्रेची तयारी सुरू आहे, आणि त्यामुळे आज संपूर्ण राज्य उत्सवाच्या आनंदाने भारलेले आहे असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी ओदिशामधील भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. या डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकासाच्या वाटचालीला गती मिळाली आहे, यासोबतच विविध कल्याणकारी योजना, गुंतवणूक, औद्योगिक वाढ आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जीवनमानात परिवर्तन घडवून आणले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी संथाली भाषेसाठी ओल चिकी लिपी निर्माण करणारे पंडित रघुनाथ मुर्मू, डॉ. दमयंती बेश्रा आणि  चरण हेंब्रम यांच्यासह ओडिशातील अनेक विभूतींना आदरांजली वाहिली. संथाली भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धन व जतनासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांनी भारतीय राज्यघटना संथाली भाषेत सादर करण्यात आल्याचे नमूद केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना  मोदी यांनी मयूरभंजच्या मातीतून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत त्यांचा झालेला प्रवास हा ओदिशा आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. सार्वजनिक सेवेसाठी त्यांचे समर्पण, नम्रता आणि राष्ट्रनिर्माणाप्रति  बांधिलकी यांचे त्यांनी कौतुक केले. राष्ट्रपतींसोबत केलेल्या पहाडपूर भेटीचा उल्लेख करत , त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “राष्ट्रपती मुर्मू यांची प्रेरणादायी उपस्थिती विशेषतः आदिवासी, वंचित आणि उपेक्षित समाजातील मुलांमध्ये आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करत आहे”, असे   मोदी यांनी अधोरेखित केले.
एका महत्त्वपूर्ण घोषणेत पंतप्रधान मोदी यांनी पहाडपूर गावाचा सौरग्राम म्हणून विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे गावातील प्रत्येक घरात सौरऊर्जेची निर्मिती सुनिश्चित केली जाईल. ओडिशातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराचा संदर्भ देत त्यांनी पहाडपूर हे देशासाठी आदर्श सौरऊर्जेवर आधारित गाव म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखालील ओडिशा सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी राज्यात विविध क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती होत असल्याचे नमूद केले. “पूर्व भारताच्या विकासातून भारताचा  विकास ” या केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करत त्यांनी “पूर्वोदय” धोरणामुळे पूर्वेकडील राज्यांची प्रचंड क्षमता उलगडली जात असल्याचे सांगितले. “रेल्वे पायाभूत सुविधा, महामार्ग, आर्थिक कॉरिडॉर, बंदरे, ऊर्जा, सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा आणि आधुनिक उद्योगांमध्ये विक्रमी गुंतवणुकीद्वारे केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रितपणे या सामर्थ्यांचा पूर्ण उपयोग करण्यासाठी कार्यरत आहेत”, असे   मोदी यांनी अधोरेखित केले. “सुमारे ₹47,000 कोटींच्या परिवर्तनकारी प्रकल्पांमुळे ओडिशातील जनतेसाठी संपर्क व्यवस्था, सार्वजनिक सेवा, आर्थिक संधी आणि जीवनमानात मोठी सुधारणा होईल. पूर्व भारतातील विकास आणि समृद्धीचे प्रवेशद्वार म्हणून ओडिशा उदयास येत असून, विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका असेल”, असे  मोदी यांनी सांगितले.

सरकार ओदिशाच्या विपुल संसाधनांचे विकास आणि समृद्धीच्या संधींमध्ये रूपांतर करत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. ओदिशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे आणि राज्यभरात औद्योगिक विकासाला चालना देणे हे उद्देश असलेल्या 'उत्कर्ष ओदिशा' सारख्या उपक्रमांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “या उपक्रमांतर्गत, ओदिशाला सुमारे 20 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, तर 3.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अनेक मोठे प्रकल्प सध्या कार्यान्वित होत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून उद्योग-स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत”, असेही ते म्हणाले.

ऊर्जा क्षेत्रात 6,0000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जात आहे, तर 'समृद्ध शहर योजने'द्वारे शहरी विकासाला गती दिली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. येत्या काही वर्षांत या उपक्रमाचे महत्त्वपूर्ण परिणाम दिसू लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुहेरी इंजिन सरकारच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की, शासन थेट लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात भटकावे लागणार नाही. परिणामी युवक, महिला, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा अधिक प्रभावीपणे पूर्ण होत आहेत.
पंतप्रधानांनी ओदिशा सरकारच्या अनेक प्रमुख कल्याणकारी उपक्रमांवर प्रकाश टाकला. यात शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल 3,100 रुपये दराने धान खरेदी, सुभद्रा योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक महिलांना आर्थिक सहाय्य, आरोग्यसेवेचा विस्तार करण्यासाठी आयुष्मान भारतची अंमलबजावणी, माधो सिंग हात खर्चा योजनेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना पाठिंबा आणि भाविकांच्या भावना लक्षात घेत श्री जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे पुन्हा उघडणे या उपक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रदेशात नुकत्याच राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. 'स्वच्छतेतून स्वागत' हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे, असे ते म्हणाले.
आदिवासी कल्याणाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी आदिवासी प्रदेशांशी असलेल्या आपल्या दीर्घ संबंधांचे स्मरण केले. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समुदायांसाठी केलेल्या अनेक वर्षांच्या सेवेचा त्यांनी गौरव केला. “ऐतिहासिकदृष्ट्या आदिवासी भाग मूलभूत सेवा आणि पायाभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत, म्हणूनच आदिवासी विकास हे आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत, आदिवासी गावांमध्ये राहणीमान सुधारण्यासाठी आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि गृहनिर्माण संबंधित विभाग समन्वयाने काम करत आहेत”, हे त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी झालेल्या सखोल चर्चेतूनच 'पीएम जनमन' (PM JANMAN) मोहिमेची संकल्पना आकाराला आली आहे. ही मोहीम प्रामुख्याने 'अतिसंवेदनशील आणि वंचित आदिवासी समूहांच्या' कल्याणासाठी आखण्यात आली असून, शासनाच्या सर्व योजना व सेवा थेट या दुर्गम आणि वंचित आदिवासी बांधवांच्या दारापर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षण आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. आज देशभरात जवळपास 500 'एकलव्य मॉडेल निवासी शाळा' सुरू झाल्या असून, आणखी सुमारे 750 शाळांना मंजुरी देण्यात आली, याशिवाय, 1.5 कोटींहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर पातळीवर शेकडो कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.  यासोबतच, मयूरभंज जिल्ह्यात आणखी एका नवीन 'जवाहर नवोदय विद्यालया'च्या स्थापनेला मंजुरी देण्यात आल्याची घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.
आदिवासी समुदायांच्या आरोग्यापुढील आव्हानांवर बोलताना पंतप्रधानांनी 'सिकलसेल ॲनिमिया' सारख्या आजारांचा उल्लेख केला, जे दुर्गम भागांत मोठ्या चिंतेचा विषय बनले आहेत. शासनाने या आजाराविरुद्ध देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. यादरम्यान चार कोटींहून अधिक आरोग्य कार्डांचे वाटप करण्यात आले असून, लाखो आदिवासी लाभार्थ्यांना मोफत उपचारांची सुविधा मिळावी म्हणून 'आयुष्मान कार्ड' देखील देण्यात आले आहेत. यासोबतच, 'जल जीवन मिशन'च्या माध्यमातून आदिवासी भागांसह देशभरातील घराघरांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवले जात असल्याचे मोदी यांनी सांगितले.
भविष्यातील वाटचालीचा वेध घेताना पंतप्रधानांनी, 2036 मध्ये साजरी होणारी ओडिशा राज्याच्या स्थापनेची शताब्दी आणि 2047 मधील भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, या दोन महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख केला. ओडिशाच्या आणि भारताच्या आकांक्षा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एक सशक्त ओडिशा थेट एका सशक्त भारताच्या उभारणीत योगदान देईल, असे ते  म्हणाले. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय योग दिनाची' आठवण करून देत मोदी यांनी, ओडिशाचा उल्लेख ज्ञान आणि योग परंपरेशी सखोल नातं असणारी भूमी असा केला. त्यांनी भारतभरातील आणि जगभरातील जनतेला योग दिन कार्यक्रमात  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि योगचा जीवनपद्धती म्हणून अंगीकार करण्याचे आवाहन केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान मोदी यांनी, या कार्यक्रमादरम्यान उद्घाटन आणि पायाभरणी झालेल्या विविध विकास प्रकल्पांबद्दल ओडिशातील जनतेचे अभिनंदन केले. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कर्मभूमीत येण्याची आणि मयूरभंजच्या जनतेशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपतींचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानले.

***

सुषमा काणे/तुषार पवार/हेमांगी कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2275707) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Gujarati , Odia , Odia , Telugu , Kannada , Malayalam