सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते फेडेरिको ॲतेहोर्तुआ यांनी मिफ्फ 2026 मध्ये चित्रपट संकलनातील सुप्त सामर्थ्याचा घेतला वेध
चित्रपट म्हणजे संबंधांची गुंफण - फेडेरिको ॲतेहोर्तुआ
मुंबई, 19 जून 2026
सुप्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक फेडेरिको ॲतेहोर्तुआ आर्टिगा यांनी आज मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) 2026 मध्ये चित्रपटाच्या मांडणीचे तत्वज्ञान: गुंफण उलगडताना ('दि फिलॉसॉफी ऑफ मॉन्टाज: अनव्हिलिंग दि फोल्ड्स') या विषयावर अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण उद्बोधन केले.
Q4QS.jpeg)
या परस्पर संवाद सत्राने प्रेक्षकांचा चित्रपट संकलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. 'पिरोटेक्निया' आणि 'फॉरेन्सिक्स' यांसारख्या प्रशंसनीय आणि पुरस्कारप्राप्त माहितीपटांच्या दिग्दर्शनातील आपल्या समृद्ध अनुभवाचा आधार घेत, फेडेरिको यांनी सांगितले की चित्रपट संकलन, ज्याला पारंपारिक भाषेत 'मॉन्टाज' म्हटले जाते, ही केवळ व्हिडिओ आणि ध्वनीमध्ये काटछाट करण्याच्या एका साध्या तांत्रिक प्रक्रियेपलीकडे खूप काहीतरी आहे. खरेतर, ही अधिक अर्थपूर्ण कृती आहे जी इतिहास आणि खुद्द वास्तवाचे आपणांस कसे आकलन होते, याची आकृती चितारते.
IRGZ.jpeg)
जुने, अभिजात चित्रपट हे प्रामुख्याने 'कार्य-कारण भाव' या कठोर तर्कशास्त्रावर आधारित असायचे, जिथे प्रत्येक क्रियेमागे एक अपेक्षित प्रतिक्रिया असायची. मात्र, दुसऱ्या महायुद्धापश्चात वास्तविक जगातील आघातांनंतर चित्रपटात बदल झाला. चित्रपट निर्मात्यांनी परिपूर्ण नायकांऐवजी सामान्य जन आणि अमूर्त कथांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, असे या उद्बोधना दरम्यान त्यांनी स्पष्ट केले.
या बदलामुळे चित्रपट संकलन पूर्णपणे मुक्त झाले. ज्याप्रमाणे चित्रकला वास्तववादी व्यक्तिचित्रांकडून जॅक्सन पोलॉकच्या चित्रांसारख्या मुक्त आणि अमूर्त कलेकडे उत्क्रांत झाली, त्याचप्रमाणे आधुनिक चित्रपट संकलन काव्यात्मक, स्वप्नवत झाले असून कठोर नियमांपासून पूर्णपणे मुक्त झाले आहे. पडद्यावरील एखादे दृश्य केवळ त्यात काय दिसते, यामुळे प्रभावी ठरत नाही; तर त्याचे खरे सामर्थ्य हे विविध दृश्ये, ध्वनी आणि कल्पना यांच्यात संकलक निर्माण करत असलेल्या अनपेक्षित, खोल आणि गुंतागुंतीच्या संबंधांमधून येते असे ते पुढे म्हणाले. चित्रपट म्हणजे परस्पर संबंधांची गुंफण आहे, असे फेडेरिको यांनी सांगितले.
या उद्बोधन वर्गाने युवा भारतीय चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि चित्रपट प्रेमींना संकलन कलेकडे एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा दिली.

* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संदेश नाईक/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2275457
| Visitor Counter:
7