MIFF banner

मिफ्फ 2026 मध्ये छायाचित्रण आणि शास्त्रीय संगीतक्षेत्रातील दिग्गजांना आदरांजली


श्रद्धांजली विभागात सुप्रसिद्ध फोटोग्राफर रघु राय आणि मृदंगम वादक पालघाट रघु यांना आदरांजली वाहणाऱ्या माहितीपटांचे सादरीकरण

मुंबई, 19 जून 2026

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, होमेज अर्थात श्रद्धांजली  विभागात दोन माहितीपटांचे प्रदर्शन करण्यात आले. रघु राय: हियरिंग थ्रू द आईज आणि ताल अँड रीदम– मृदंगम प्लेड बाय पालघाट रघु या माहितीपटांच्या माध्यमातून छायाचित्रण, चित्रपट आणि भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.

सुवेंदु चटर्जी दिग्दर्शित रघु राय: हियरिंग थ्रू द आईज, हा माहितीपट भारतातील ख्यातनाम छायाचित्रकार रघु राय यांच्या जीवनाचा आणि कार्याचा वेध घेतो. छायाचित्रे आणि त्यांच्या वैयक्तिक आठवणींच्या माध्यमातून हा चित्रपट त्यांच्या सर्जनशील प्रवासाची, तसेच त्यांच्या दृष्टिकोनाला आकार देणाऱ्या अनुभवांची प्रभावी मांडणी करतो.

1977  मध्ये जगप्रसिद्ध छायाचित्रकार हेनरी -ब्रेसन यांनी रघु राय यांची मॅग्नम फोटोज या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार संघटनेत सदस्यत्वासाठी शिफारस केली होती.

हा माहितीपट रघु राय यांच्या ‘दर्शन’ या संकल्पनेचा शोध घेतो. त्यांच्या मते, दर्शन म्हणजे विषयाशी निर्माण होणारा भावनिक आणि आध्यात्मिक संबंध होय. छायाचित्रण हे केवळ प्रतिमा टिपण्याचे माध्यम नसून, माणसे आणि त्यांच्या भावना समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे, असे ते मानत.

या माहितीपटात रघु राय यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच मदर तेरेसा यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची त्यांची प्रसिद्ध छायाचित्रेही सादर करण्यात आली आहेत. याशिवाय गणेश विसर्जन, ताज महाल आणि नागा साधू यांसारख्या दैनंदिन जीवनाशी आणि भारतीय सांस्कृतिक परंपरांशी निगडित विषयांवरील त्यांच्या छायाचित्रांचाही समावेश आहे.

या माहितीपटात रघु राय यांची कन्या आणि चित्रपट निर्माती अवनी  राय हिचाही सहभाग आहे. तिच्या दृष्टिकोनातून कॅमेऱ्यामागील व्यक्ती म्हणून रघु राय यांचे व्यक्तिमत्त्व उलगडते आणि दोन पिढ्यांतील प्रतिमा निर्मात्यांमधील एक अर्थपूर्ण संवाद घडतो.

सर्जनशीलतेविषयी विचार व्यक्त करताना रघु राय म्हणत की, प्रेम हा कलात्मक अभिव्यक्तीला जोडून ठेवणारा मूलभूत धागा आहे. त्यांच्या मते, छायाचित्राने स्वतःच आपली कथा सांगितली पाहिजे. रघु राय युवा छायाचित्रकारांना स्वतःचा स्वतंत्र आवाज, दृष्टीकोन आणि अभिव्यक्तीची शैली शोधण्याचे आवाहन करतात.

आज प्रदर्शित करण्यात आलेला दुसरा चित्रपट ताल अँड रीदम– मृदंगम प्लेड बाय पालघाट रघु हा होता. हा माहितीपट फिल्म्स डिव्हिजन ने  निर्मित केला असून, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक  श्याम बेनेगल  यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. हा माहितीपट मृदंगम या कर्नाटकी संगीतातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाच्या तालवाद्यांपैकी एका वाद्याचा सखोल परिचय करून देतो.

ख्यातनाम तालवादक पालघाट रघु यांच्यावरच्या या चित्रपटात भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘ताल’ (लयचक्र) आणि ‘लय’ (रिदम) या संकल्पना सविस्तरपणे उलगडून सांगितल्या जातात. प्रात्यक्षिके आणि संगीत सादरीकरणांच्या माध्यमातून हा माहितीपट प्रेक्षकांना ठेका, तालचक्र, मात्रांची रचना आणि उत्स्फूर्त रचना यांची ओळख करून देतो.

मृदंगमसाठी बोटांची हालचाल यासह  वाजविण्यातले तंत्रही या माहितीपटातून दिसून येते.या वाद्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी  शिस्त,सराव आणि सर्जनशीलता यांचे महत्वही यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.

संगीतशास्त्राच्या विविध पैलूंचा वेध घेण्याबरोबरच हा माहितीपट ज्ञानाच्या मौखिक परंपरेलाही विशेष अधोरेखित करतो. गुरुंकडून शिष्यांकडे पिढ्यान्‌पिढ्या हस्तांतरित होत आलेल्या ज्ञानपरंपरेचे महत्त्व तो प्रभावीपणे मांडतो. भारताच्या शास्त्रीय संगीत परंपरेला टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गुरु-शिष्य नाते या चित्रपटातून प्रतिबिंबित होते.

होमेज विभागात प्रदर्शित करण्यात आलेल्या या दोन्ही माहितीपटांमुळे प्रेक्षकांना आपल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे जीवन, कार्य आणि योगदान यांचा जवळून परिचय करून घेण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर भारताच्या समृद्ध कलात्मक आणि सांस्कृतिक वारशाविषयीची त्यांची जाण अधिक समृद्ध झाली. 

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275305   |   Visitor Counter: 14