वारशाकडून आशेकडे :19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांनी टिपली भारताची विविध रूपे
चित्रपट संस्थांमधील युवा चित्रपटकर्मींनी मिफ्फमध्ये संस्कृती, समाज आणि बदलांच्या कथांमधून रेखाटली भारतात दडलेल्या विश्वाची वैविध्यपूर्ण रुपे
मुंबई, 18 जून 2026
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्ग (मिफ्फ ) इमर्जिंग व्हॉइसेस : फिल्म स्कूल एडिशन या विभागाचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जगाकडे युवा चित्रपटकर्मींच्या दृष्टीकोनातून पाहण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. या विभागात फ्रान्स आणि जर्मनीमधील प्रसिद्ध चित्रपट संस्थांच्या चित्रपटांसोबतच, ईशान्य भारतासह देशभरातील विविध चित्रपट संस्थांमधील 27 चित्रपटांच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व चित्रपटांतून एकत्रितपणे भारतातील लोक, संस्कृती आणि अनुभवांची समृद्ध विविधतेची प्रचिती येते. हे चित्रपट अस्मिता, संस्कृती, कुटुंब, सामाजिक प्रश्न, आशा, संघर्ष करण्याची वृत्ती आणि मानवी नातेसंबंध अशा व्यापक विषयांचा वेध घेतात. यंदाच्या महोत्सवात या चित्रपटांचे खेळ सातत्याने दाखवले जात आहेत.
या विभागात पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेद्वारा (FTII) निर्मित चार चित्रपट, कोलकातातील सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेद्वारा (SRFTI) निर्मित तीन चित्रपट, तामिळनाडूतील तामीळनाडू ऑरोव्हिल फिल्म इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित चार चित्रपट, कटक इथल्या बिजू पटनायक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेद्वारा निर्मित एक चित्रपट, आसाम मधील डॉ. भूपेन हजारिका प्रादेशिक शासकीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेद्वारा निर्मित दोन चित्रपट, अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय डिझाईन संस्थेद्वारा निर्मित तीन चित्रपट, कर्नाटकातील आरव्ही युनिव्हर्सिटीद्वारा निर्मित चार चित्रपट, रोहतक इथल्या दादा लक्ष्मीचंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ परफॉर्मिंग अँड व्हिज्युअल आर्ट्सद्वारे निर्मित तीन चित्रपट, आणि मुंबईतील व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलद्वारा निर्मित तीन चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट एकत्रितपणे देशातील विविध प्रदेश आणि कथात्मक मांडणीच्या परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट आहेत.
यातील काही प्रमुख चित्रपटांमधून स्थानिक परंपरा, संस्कृती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्ञानाचे जतन करण्याच्या महत्त्वावर भर दिला गेला आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा इन सर्च ऑफ स्टोन या चित्रपटातून लोकांच्या प्राचीन वास्तू आणि स्थळांशी असलेल्या नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तसेच अशा वस्तू आणि स्थळांच्या संरक्षणासंबंधीचा प्रश्नही चित्रपटातून आपल्यासमोर मांडला गेला आहे. कोलकातातील सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या ब्लॅक क्ले (Khiew Ramew) या चित्रपटातून पारंपारिक हस्तकलेचे विश्व उलगडत, भविष्यासाठी ती जतन करण्यासंंधीच्या मूल्यावर भर दिला गेला आहे.
काही चित्रपटांमधून दैनंदिन जीवनातील आव्हानांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोलकातातील सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेद्वाराच निर्मित दुर्जोग या आणखी एका चित्रपटात आर्थिक अडचणी कशा प्रकारे लोकांना कठीण परिस्थितीमध्ये आणि अवघड परिस्थितीत ढकलतात याचे चित्रण केलेले आहे. द लास्ट हर्ड - मोईशाल या चित्रपटातून नैसर्गिक आपत्तीनंतर लोक आपले जीवन पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करत असतानाच उद्भवणारी हानी आणि त्यांच्या अस्तित्वाचा संघर्षाची कथा मांडलेली आहे.

कुटुंब आणि वैयक्तिक नातेसंबंध हे देखील काही चित्रपटांचे मध्यवर्ती विषय आहेत. “केप ऑफ गुड होप हा चित्रपटात आपल्याला प्रियजनांची काळजी घेतानाच्या जबाबदाऱ्या आणि या जबाबदाऱ्यांचा कुटुंबांवर कसा परिणाम होतो याचे चित्रण दिसते. नागालँडमधील, अ व्हिज्युअल पोएम एक्सप्लोअर्स लव्ह या चित्रपटातून प्रेम, आठवणी आणि लोकांचे त्यांच्या मातृभूमीशी असलेल्या घट्ट नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिसतो.
एल-अर्न - ताल-मेल या चित्रपटातून आपल्याला युवा वर्गाची स्वप्ने आणि त्यांचा संघर्षाची प्रचिती येते. युवा संगीतकारांच्या जीवनाचे चित्रण असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला कठीण काळातही कला कशारितीने आत्मविश्वास, उद्देश आणि आशा निर्माण करू शकते याचे चित्रण पाहायला मिळते.
एकत्रितपणे विचार करता इमर्जिंग व्हॉइसेस : फिल्म स्कूल... एडिशन या विभागातील चित्रपट भारताच्या आणि जगाच्या विविध भागांतील कथा आपल्यासमोर मांडतात. स्थानिक समुदाय आणि वास्तविक जगण्यातील अनुभवांमध्ये रुजलेले हे चित्रपट युवा चित्रपटकर्मींची सर्जनशीलता ठळकपणे आपल्यासमोर आणतात आणि त्याचवेळी लोक, संस्कृती तसेच समाजाविषयीची चिंतनशील आणि अंतर्मुख करणारी अनूभूती आपल्याला देतात.

* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2274832
| Visitor Counter:
6