MIFF banner

मिफ्फ 2026 मध्ये, युवा फ्रेंच चित्रपटनिर्मात्यांनी मांडला ताज्या दमाचा जागतिक दृष्टिकोन


युवा चित्रपट निर्मात्यांसाठी मिफ्फ ही मोठी संधी, फ्रेंच दिग्दर्शिका फायेझे करिमपूर यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई, 18 जून 2026

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2026 मध्ये, ‘ला फेमिस’ या  फ्रांसच्या  नामवंत राष्ट्रीय चित्रपट संस्थेमधल्या सात चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्‍यात आले. या उपक्रमाव्दारे  सिनेमाक्षेत्रातील जगभरातल्या उदयोन्मुख सिनेनिर्मात्यांच्या प्रतिभेचा गौरव करण्यात येत आहे. हे चित्रपट, “उदयोन्मुख प्रतिभा : फिल्म स्कूल एडिशन’ या विशेष विभागात दाखवण्यात येत असून, त्यातून महोत्सवातील  प्रेक्षकांना, नव्या पिढीच्या चित्रपटनिर्मात्यांची सर्जक दृष्टी आणि कलेची चुणूक दिसली.

यामध्‍ये 17 जून रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटांमधून, ‘ला फेमिस’, या जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या संस्थेची वैविध्यपूर्णता, नावीन्य  आणि कलात्मकता प्रेक्षकांना जाणवली.  यात, फायेझे करिमपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या, ‘द अवेकनिंग’ या आठ मिनिटांच्या लघुपटाचा समावेश होता.

चित्रपटाची कथा एका मुलाभोवती फिरते. शाळेतील वार्षिक कार्यक्रमात रंगमंचावर सादरीकरण करण्याची वेळ जवळ आली असताना त्याला अचानक भीती जाणवू लागते आणि घाबरून तो आपला पोशाख खराब करतो, आणि मग चूक झाल्याचे लक्षात आल्यावर, ती सुधारण्यासाठी तो तिथून पळून जातो. मात्र हा अनुभवच हळूहळू त्याला त्याचा आत्मविश्वास मिळवून देतो आणि त्याला स्वतःचा शोध लागतो, शेवटी तो पुन्हा रंगमंचावर जाण्यासाठी सज्ज होतो.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी फायेझे करिमपूर यांचा, एनएफडीसीचे अधिकारी आणि चित्रपट महोत्सवाचे आर्टिस्टिक डायरेक्टर पंकज सक्सेना  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना, फायेझे यांनी सांगितले, की त्यांच्या सारख्या नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी, मिफ्फ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणे ही खूप मोठी संधी आहे. फ्रांसमधल्या युवा चित्रपट निर्मात्यांना एक मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मिफ्फ च्या आयोजकांचे आभार मानले.

या चित्रपटांमधे, ‘बाउल कट’ (Bowl Cut) या तमारा व्हिटटोझ यांनी दिग्दर्शित केलेल्या, विनोदी धाटणीच्या लघुपटाचाही समावेश होता. लहान मुलांचा जिद्दी स्वभाव आणि मोठ्यांमधील मतभेदांमुळे निर्माण होणाऱ्या भावनिक परिणामांना मुले कशा प्रकारे सामोरे जातात, याचे हलक्याफुलक्या विनोदी शैलीतील चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

‘मॅक्स’  हा 15 मिनिटांचा अॅनिमेशनपट, एमिलियन पिचोन यांनी दिग्दर्शित केला असून, बालसुलभ कुतूहलाला गूढता आणि थराराची जोड देणारी कथा त्यात साकारण्यात आली आहे. तर, ‘माय इंटरनेट कंट्रीसाईड’  हा 24 मिनिटांचा लघुपट, लिली बेलबेझ यांनी दिग्दर्शित केला आहे. एकाकीपणा, मैत्री आणि डिजिटल युगातील मानवी नातेसंबंध यांचा संवेदनशील आणि विचारप्रवर्तक वेध घेणारा हा चित्रपट, आधुनिक जीवनातील बदलत्या सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण करतो.

या विभागात, “नॉट टू डाय अलोन” या टॉमी बोलेट आणि व्हॅलेंतिन नोएल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आपली स्वतःची ओळख आणि सामाजिक जडणघडण यांच्यातील  व्दंव्द यांचा विचारप्रवर्तक वेध घेण्यात आला आहे. तसेच ‘साईन्स फ्रॉम बिलो’  हा अॅनिमेशनपट  मॉउडे युलिझ यांनी दिग्दर्शित केला आहे. ऐकू येणाऱ्या लोकांच्या जगात बहिरेपणाचा  अनुभव हा चित्रपट प्रेक्षकांसमोर अत्यंत संवेदनशीलतेने उलगडतो. पाण्याखालील शांततेचे रूपक वापरत हा चित्रपट ‘ऐकण्याच्या’ एका वेगळ्याच अनुभवाची जाणीव करून देतो आणि संवेदनांच्या जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतो. याशिवाय, ‘स्टिल वॉटर्स’  या ज्यूलिएट गौडिन दिग्दर्शित चित्रपटात लुसिल नावाच्या परिचारिकेची कथा मांडण्यात आली आहे. रुग्णसेवेशी निगडित आपल्या व्यावसायिक पद्धतींना नव्याने आकार देण्याचा तिचा प्रयत्न, तसेच त्या प्रक्रियेत दडलेली मानवी नात्यांतील गुंतागुंत याचा या चित्रपटात वेध घेण्यात आला आहे.

या सर्व चित्रपटांना सिनेरासिक, विद्यार्थी आणि चित्रपट व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसद मिळाला. त्यानंतर, फ्रांसच्या युवा चित्रपट निर्मात्यांचा प्रत्यक्ष सहभाग, हा अनुभव अधिकच चैतन्यमय करणारा ठरला. यातून भारतीय चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि प्रेक्षकांनाही, त्यांच्याशी अर्थपूर्ण संवाद साधण्याची संधी मिळाली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2274783   |   Visitor Counter: 22