MIFF banner

एकोणिसाव्या मिफ्फ मध्ये आयोजित दुसऱ्या वेव्ह्ज डॉक बाजारची यशस्वी सांगता


19 देशातून 155 प्रवेशिका, 100 पेक्षा अधिक बिझनेस- टू-बिझनेस बैठका आणि विविध प्रकल्पांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे माहितीपट निर्मात्यांसाठी जागतिक नेटवर्किंगच्या संधीमध्ये वाढ

मुंबई, 18 जून 2026

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्फ मध्ये आयोजित दुसऱ्या वेव्हज डॉक बाजार 2026 ची यशस्वी सांगता झाली असून, त्यातून माहितीपट निर्मात्यांना एक महत्वाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यातली या डॉक बाजारची भूमिका अधिक ठळकपणे समोर आली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, ते जगभरातील मार्गदर्शक, निर्माते, वितरक, प्रसारक आणि उद्योग जगतातले इतर व्यावसायिक अशा सर्वांशी जोडले जाऊ शकतात.

तीन दिवस चाललेल्या या उपक्रमात इच्छुकांकडून प्रकल्प सादर करण्यात आले. त्याशिवाय नेटवर्किंग सत्रे आणि उद्योगक्षेत्राशी संवादाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामुळे निवडलेल्या चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या प्रकल्पांचा विकास, पोस्ट-प्रॉडक्शन आणि वितरणासाठी आवश्यक पाठबळ व सहकार्य मिळविण्याची संधी प्राप्त झाली.

सांगता समारंभात उत्तम माहितीपटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रसाद लॅब्सचे महाव्यवस्थापक, नितीन पिंगळे यांच्यामार्फत दिला जाणारा, प्रसाद लॅब्स पुरस्कार, पिंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यांनी निवडक प्रकल्पांना पोस्ट-प्रॉडक्शन सहाय्य देऊन उत्कृष्ट प्रकल्पांचा गौरव केला.

प्रसाद लॅब्स पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कारांतर्गत निवडलेल्या प्रकल्पांना चेन्नई इथल्या प्रसाद लॅब्स मध्ये 50 तासांपर्यंत मोफत 4K डिजिटल इंटरमिजिएट (DI) सेवा देण्यात आली. या मदतीमुळे, संबंधित प्रकल्पांना पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण पाठबळ मिळणार आहे.

पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :

  • विजेता: ऑन ए गुड नोट
    • दिग्दर्शक: करिश्मा राव
    • निर्माता:  विश्वेश प्रसाद
  • विजेता: इट टेक्स ए व्हिलेज
    • दिग्दर्शक: इंद्रजित मोरे
    • संपादक: आकांक्षा काल्हे

त्याशिवाय, आयआयसीटी पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार, आयआयसीटी म्हणजेच, भारतीय सर्जक तंत्रज्ञान संस्थेचे संचालक,  सतीश नारायणन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माहितीपट निर्मितीतील उत्कृष्टतेची दखल घेत, हा पुरस्कार दिला जात असून, त्यातून, काही निवडक प्रकल्पांचा पोस्ट प्रॉडक्शन विकास करण्यासाठी पाठबळ दिले जाणार आहे.

या अंतर्गत, 4K डिजिटल इंटरमिजिएट (DI) च्या 50 तासांच्या सेवांवर 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. ह्या पुरस्कारांचे मानकरी ठरले:

  • विजेता:  अॅडयू दिल्ली.
    • दिग्दर्शक: नंदन सक्सेना आणि कविता बहल
  • विजेता: दो चार दिन
    • दिग्दर्शक: सान्या आनंद
    • निर्माती: नव्या बजाज

रीबॉर्न इंडिया फिल्म्स पुरस्कराचे वितरण  राहुल अग्रवालआणि रोहित अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्काराचा उद्देश निवडक प्रकल्पांना व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी वितरणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या अंतर्गत सुमारे ७ लाख रुपये मूल्याचे वितरण सहाय्य तसेच 10  चित्रपटगृहांच्या पडद्यांवर  चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळू शकेल

या पुरस्काराचा मानकरी प्रकल्प होता: ऑन अ गुड नोट

  • दिग्दर्शक: करिश्मा राव
  • निर्माता: विश्वेश प्रसाद

यंदा पहिल्यांदाच, एनएफडीसीने माहितीपट आणि लघुपट यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची तीन रोख रकमेची बक्षिसे ठेवली होती. एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, प्रकाश मगदूम यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.  

पुरस्कार प्राप्त प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत : 

  • कांचोक अँड हिज मेनी मून्स
    • दिग्दर्शक व संपादक: अशोक मिणा
  • द गर्ल बिनिथ द सन
    • दिग्दर्शिका: मधुरिमा मईती 
  • तुकडे कडो प्रतिभी
    • दिग्दर्शिका: अस्मिता पाल
    • निर्माती: अरुणिमा चौथरी

या सांगता समारंभात, प्रकाश मगदूम यांनी सांगितले, की विविध श्रेणींमध्ये 150 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्याने वेव्ह्ज डॉक बाजारला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, माहितीपट निर्मात्यांसाठी समर्पित व्यासपीठ आवश्यक असल्याचेच निदर्शक आहे.  एनएफडीसी अशा उपक्रमांना अधिक प्रोत्साहन आणि पाठबळ देत राहील आणि माहितीपट इतर बिगर-कथानक चित्रपट क्षेत्रातील नवोदित प्रतिभांना सातत्याने पाठबळ देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या व्यासपीठाला माहितीपट क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक आणि व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. 19 देशांमधून 35 भाषांतील एकूण 155 प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यापैकी 12  प्रकल्पांची  सादरीकरण आणि मार्केट उपक्रमांसाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान 100 हून अधिक बिझनेस टू बिझनेस (B2B) बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकींमुळे सह-निर्मिती, निधी उभारणे आणि वितरण भागीदारी यांसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाल्या.

आयआयसीटी पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार विजेत्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी संबंधित X हॅंडल पाहता येईल.

 

दुसऱ्या वेव्ह्ज डॉक बाजारचा समारोप अर्थपूर्ण आणि प्रभावी माहितीपट कथनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या तसेच उदयोन्मुख प्रकल्पांना जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या वचनबद्धतेसह झाला.

 

* * *

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/राधिका अघोर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2274769   |   Visitor Counter: 20