लडाखपासून जगापर्यंत: ख्यातनाम चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृतीतून मिफ्फ 2026 मध्ये साकारले समावेशक सिनेमाचे सामर्थ्य
चित्रपट हे माध्यम जगातील प्रत्येक मुलाचा आवाज बनायला हवे - श्वेता परख आणि जितेंद्र मिश्रा यांचे प्रतिपादन
मुंबई, 17 जून 2026
मुंबईत आयोजित 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2026 च्या निमित्ताने पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आज चित्रपट या माध्यमाच्या समज जोपासण्याच्या, विविधतेचा उत्सव साजरा करण्याच्या आणि दुर्लक्षित आवाजाला व्यासपीठ मिळवून देण्याच्या परिवर्तनकारी सामर्थ्यावर प्रकाश टाकण्यात आला.
'नायाब – थ्रू द टीचर्स लेन्स' (Naayab – Through the Teacher’s Lens) हा माहितीपट आणि 'सोना और सोनम के सपने' (Little Big Dreams) या लघुपटाचे दिग्दर्शक, शिक्षणतज्ज्ञ आणि निर्मात्यांनी, प्रत्येक मुलासाठी चित्रपट हे सक्षमीकरणाचे माध्यम ठरायला हवे, अशी भूमिका मांडली.
S8D9.jpeg)
या चर्चासत्रात चित्रपट निर्मात्या श्वेता परख, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रकल्प मार्गदर्शक स्वाती पोपट वत्स, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि प्रकल्प मार्गदर्शक पथिक वत्स आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते जितेंद्र मिश्रा यांनी आपले विचार मांडले. पॅनेल सदस्यांनी या चित्रपटांच्या निर्मितीबाबतचा आपला दृष्टीकोन मांडला, आणि मुलांमध्ये समावेशकता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवण्यात असलेल्या कथाकथनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
तळागाळातील जगाचे दर्शन घडवणाऱ्या कथाकथनाचे महत्त्व सांगताना, 'नायाब – थ्रू द टीचर्स लेन्स' या चित्रपटाच्या दिग्दर्शक श्वेता परख यांनी, मुलांनी पडद्यावर स्वतःच्या वास्तवाचे प्रतिबिंब पाहणे किती गरजेचे आहे, यावर भर दिला. स्थानिक संस्कृतींमध्ये रुजलेल्या कथा मुलांना त्यांची ओळख, परंपरा आणि समुदायांशी जोडले जायला सहाय्य करतात, असे निरीक्षण नोंदवून, या कथा स्व-अभिव्यक्ती आणि संवादासाठी अर्थपूर्ण अवकाशही निर्माण करतात, असे त्यांनी सांगितले.

समावेशकतेचे महत्त्व अधोरेखित करताना स्वाती पोपट वत्स म्हणाल्या की समाजाने ‘लेबल’ पलीकडे जाणे आवश्यक आहे आणि सर्व मुलांच्या सामायिक आकांक्षा, भावना आणि क्षमता ओळखणे आवश्यक आहे. 'सोना और सोनम के सपने' (लिटल बिग ड्रीम्स) च्या नायिकेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ही तरुण मुलगी केवळ शिक्षण किंवा स्वातंत्र्याचा पाठपुरावा करत नव्हती, तर ती ‘आयुष्याचा पाठलाग करत होती’. या शब्दांनी चित्रपटाचा गहन मानवी आणि आकांक्षा जागवणारा संदेश टिपला आहे, असे त्या म्हणाल्या.
चित्रपट निर्माते आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते पथिक वत्स यांनी एक शक्तिशाली शैक्षणिक साधन म्हणून असलेल्या चित्रपटाच्या भूमिकेवर भर दिला. चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यापलीकडेही महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले. चित्रपट हे व्यावहारिक शिक्षणाचे एक माध्यम असल्याचे सांगत ते म्हणाले की, चित्रपट तदानुभूती जागृत करू शकतो, व्यापक दृष्टिकोन विकसित करू शकतो आणि सामाजिक विचारसरणी देखील घडवू शकतो.
'सोना और सोनम के सपने' (लिटल बिग ड्रीम्स) या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रवासाची माहिती देताना, राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते जितेंद्र मिश्रा यांनी स्थानिक कथांच्या वाढत्या जागतिक आकर्षणावर प्रकाश टाकला. या चित्रपटाच्या निर्मितीत मुलांनी स्वतः सक्रियपणे सहभाग घेतला होता. त्यांनी केवळ कलाकार म्हणूनच नव्हे, तर कथाकार आणि निर्माते म्हणूनही योगदान दिल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

स्थानिक संस्कृतीत रुजलेल्या कथांमध्ये जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडण्याची शक्ती असते, असे निरीक्षण मिश्रा यांनी नोंदवले. कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांकडून आमंत्रणे मिळाली आहेत. येत्या काही महिन्यांत हा चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रदर्शित होणार आहे.
या चर्चेतून दोन्ही चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित होणारी एक समान विचारसरणी अधोरेखित झाली: मर्यादांऐवजी शक्यतांवर लक्ष केंद्रित करणे. विशेष गरजा असलेल्या मुलांना त्यांच्या क्षमता, कौशल्यांसोबतच कुटुंब, शाळा आणि समाजासाठी ते देत असलेल्या योगदानाबद्दल ओळखले गेले पाहिजे, यावर मान्यवरांनी भर दिला. या मुलांची ओळख केवळ एखाद्या लेबलने किंवा काल्पनिक मर्यादांनी मर्यादित ठेवता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बालचित्रपटांनी पारंपरिक मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशकता, सामंजस्य आणि सकारात्मक सामाजिक बदलासाठी एक उत्प्रेरक बनले पाहिजे, यावर पत्रकार परिषदेचा समारोप करताना पॅनेल सदस्यांनी भर दिला.

19व्या मिफ विषयी
19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.
- या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या.
- महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते.
- जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
- चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.
प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026! कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2274278
| Visitor Counter:
14