शब्द तुमचे मन घडवतात, जीवन अभिनयाला जन्म देते : मिफ्फमधील मास्टरक्लासमध्ये फॅब्रिस कॅली यांनी उलगडले स्टॅनिस्लाव्स्की यांच्या नाट्यशास्त्राचे सिद्धांत
उत्कृष्ट अभिनयासाठी जीवनाला अगदी जवळून समजून घ्या : फॅब्रिस कॅली यांनी उलगडला निरीक्षणापासून ते अस्सल सादरीकरणापर्यंतचा स्टॅनिस्लाव्स्की यांचा प्रवास
मुंबई, 17 जून 2026
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रेंच रंगभूमी तज्ज्ञ फॅब्रिस कॅली यांचे एक अंतर्मुख करणारे मास्टर क्लासचे सत्र पार पडले. फ्रेंच रंगभूमी तज्ज्ञ फॅब्रिस कॅली यांनी विख्यात नाट्य विचारवंत कॉन्स्टँटिन स्टॅनिस्लाव्स्की यांनी मांडलेल्या विचारांच्या आधारे जीवन, शब्द आणि अभिनय यांच्यामधील गहिऱ्या नात्याचा वेध घेतला. अभिनय हा मानवी जीवनातली संपूर्ण समृद्धी पुन्हा उभी करण्याचा एक प्रयत्न आहे. या प्रयत्नांदरम्याच मानवी अनुभवांच्या विविध टप्प्यांअंतर्गत भावना नैसर्गिकरित्या जन्माला येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
A2E6.JPG)
उत्कृष्ट अभिनयासाठी जीवनाला खूपच जवळून समजून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. स्टॅनिस्लाव्स्की यांचा दृष्टिकोन हा मानवी वर्तनाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याचे विश्लेषण आणि मानवी प्रवृत्तीच्या गहिऱ्या आकलनावर आधारलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टॅनिस्लाव्स्की यांच्या कौशल्यांबद्दलची मांडणीही कॅली यांनी केली. वास्तववादी दृश्ये साकारण्याची स्टॅनिस्लाव्स्की यांची क्षमता त्यांनी उलगडून सांगितली . स्टॅनिस्लाव्स्की हे जीवनाचा तपशिलवार अभ्यास करत, विविध परिस्थितींचे अगदी लहान लहान घटकांमध्ये वर्गीकरण करत आणि त्याआधारे दृश्ये उभी करत, अशी माहिती त्यांनी दिली.
स्टॅनिस्लाव्स्की यांना अँटन चेकॉव्ह यांच्या रूपाने नाट्य क्षेत्रातला एक आदर्श भागीदार मिळाला होता अशी माहिती त्यांनी दिली. चेकॉव्ह यांचे लेखन हे विविध परिस्थितींवर आणि जीवन ज्या तरलतेने उलगडत जाते, त्यावर आधारित असायचे, असे त्यांनी सांगितले.
शब्दच आपल्या आकलनाला आकार देत असतात, त्यामुळेच वास्तववादी दृश्य साकारण्यासाठी समृद्ध शब्दसंग्रहाची आवश्यकता असते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. ग्रीनलँडमध्ये बर्फ या शब्दासाठी अनेक प्रतिशब्द उपलब्ध असल्याचे उदाहरणही त्यांनी दिले. आपले मन जगाचे जसे आकलन करत असते, त्याच रितीने भाषेचाही विस्तार होत असतो, शब्द तुमचे मन घडवतात, असे ते म्हणाले.
4WCV.JPG)
त्याच वेळी, अभिनय केवळ शब्दांवरच अवलंबून असू शकत नाही, ही बाबही त्यांनी मांडली. अस्सल सादरीकरण हे आपले अस्तित्व, निरीक्षण, प्रतिसाद आणि सहभागातून उभे राहते. स्टॅनिस्लाव्स्की यांनी अभिनयाच्या प्रक्रियेत अधिक गहिरेपणा आणि बारकावे आणले आणि रंगभूमीची व्याख्याच कशारितीने बदलून टाकली याबद्दलचे विवेचनही त्यांनी केले.
यावेळी कॅली यांनी एका प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सादरीकरणाच्या प्रक्रियेतील सक्रिय निरीक्षण आणि सक्रिय सहभाग या घटकांचे महत्त्वही उलगडून सांगितले. अभिनयाचा पाया हा नैसर्गिकरित्या दैनंदिन जगण्यातच अस्तित्वात असतो असे मत व्यक्त करत त्यांनी सत्राचा समारोप केला. प्रत्यक्ष जीवनात आपण सर्वजण परिपूर्ण अभिनेते आहोत, असे ते म्हणाले.
8O6T.JPG)
फॅब्रिस कॅली हे डिमॅंन ले प्रिंटेंप्स (Demain le Printemps) या स्टॅनिस्लाव्स्की यांच्या पद्धतीवर आधारित फ्रँको-बेलारुसियन सोव्हिएत नाट्यशाळेचे कलात्मक दिग्दर्शक आहेत. यासोबतच ते बेलारूसमधील तेआत्रो या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक संघटनेचे कलात्मक दिग्दर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचे काम हे रशियन / सोव्हिएत नाट्य परंपरा आणि कॉन्स्टँटिन स्टॅनिस्लाव्स्की यांच्या वारशाशी दृढपणाने जोडलेले आहे. कॉन्स्टँटिन स्टॅनिस्लाव्स्की हे रशियन नाट्य तज्ज्ञ असून, त्यांनी अभिनेत्यांचे प्रशिक्षण, पूर्वतयारी आणि तालमीसाठी स्टॅनिस्लाव्स्की पद्धती म्हणून नावाजलेली एक अत्यंत प्रभावी संकल्पना विकसित केली. त्यांच्या या पद्धतीने 20 व्या शतकातील सादरीकरणात क्रांती घडवून आणली. 1898 मध्ये स्थापन झालेल्या ऐतिहासिक मॉस्को आर्ट थिएटरचे ते सह संस्थापक होते. त्यांच्या भावनिक सत्य, मानसशास्त्रीय वास्तववाद आणि अनुभूतीआधारीत पूर्वतयारी या सिद्धांतांनी मेथड ॲक्टिंगसह आधुनिक अभिनय तंत्राचा पाया रचला आहे.
Click here to access the press releases and high-quality photos of daily events at MIFF.
19व्या मिफ विषयी
19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.
- या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या.
- महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते.
- जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
- चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.
प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026! कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2274076
| Visitor Counter:
33