सिनेमाच्या कल्पनेपासून ते पटकथेपर्यंतचा दीर्घ, एकाकी मात्र सुंदर प्रवास, पटकथालेखक बिप्लव गोस्वामी यांनी उलगडला, 19 व्या मिफ्फ मध्ये
लिखाणाचा फॉर्म्युला एकच- स्वतःवर विश्वास ठेवणे! – लापता लेडीज च्या लेखकांनी मांडले मत
मुंबई, 16 जून 2026
एक क्षणिक विचार एखादी संपूर्ण पटकथा कशी बनू शकतो? एखादी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेस्तोवर, कितीही वर्षे लोटली, तरी, एखादा लेखक, त्या कथेला आपल्या मनात जिवंत कसे ठेवतो? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे, पटकथा लेखक, संकलक आणि दिग्दर्शक, पटकथालेखक बिप्लव गोस्वामी यांनी आज आपल्या, “कल्पनेपासून ते रुपरेषेपर्यंत : एका दृश्याची निर्मितीकथा” या विषयावरील कार्यशाळेत दिली. 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, आज ह्या कार्यशाळा मालिकेची सुरुवात झाली.
लापता लेडीज, या सुप्रसिद्ध आणि भारताच्या ऑस्कर 2025 साठीच्या चित्रपटाचे लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिप्लव गोस्वामी यांनी या कार्यशाळेत सहभागी असलेल्यांना, कधी अत्यंत गोंधळाच्या, तर कधी अत्यंत खाजगी तसेच आपले सर्वस्व मागणाऱ्या या कथाकथन प्रक्रियेची सफर घडवली.
onJune16,2026.N7WY.JPG)
“कथा लिहिण्याचा कुठलाही एक फॉर्म्युला नाही” असे त्यांनी या कार्यशाळेत वारंवार सांगितले. बिप्लव गोस्वामी यांच्यासाठी, प्रत्येक कथेची सुरुवात, वेगळ्या पद्धतीने होते. कधीकधी ती मूळ आपल्याच मनात जन्म घेते, तर कधी निरीक्षणातून, तर कधी एखादा विचार, घटना, कथेला जन्म देतो. “लेखक म्हणून आम्ही सतत शोध घेत असतो. कधीकधी आम्हाला कल्पना हवी असते, तर कधी कथा आपसूक जन्माला येते, त्याचा काही एक ठरलेला मार्ग नाही.” असे त्यांनी सांगितले.
सर्जनशील प्रक्रियेशी निगडित भावनिक आव्हानांविषयीही गोस्वामी यांनी मनमोकळेपणाने सांगितले एखाद्या प्रकल्पाला निर्माता मिळेल याची कोणतीही खात्री नसतानाही लेखन सुरू ठेवणे हे लेखकासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
"तुमच्याकडे चांगली कथा असू शकते, पण निर्माता नसेल, तर तुम्हाला निराश वाटणं स्वाभाविक आहे, मात्र, जर तुमचं सिनेमावर खरोखर प्रेम असेल, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत लेखन सुरू ठेवता."असे ते म्हणाले. "मी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही दृष्टिकोनांतून एकाच वेळी विचार करून लेखन करतो. माझ्यासाठी निर्माता नसला तरी मी लिहितच राहीन."असेही त्यांनी पुढे सांगितले.
सिनेमा हा तुमचं सर्वस्व व्यापून टाकणारा ध्यास आहे, पॅशन आहे, असे सांगत, त्यासाठी तुमच्यात एक वेड असावं लागतं, असे गोस्वामी म्हणाले.
onJune16,2026.(2)4QRS.JPG)
“सिनेमा काही सर्वांसाठी नाही, तुम्हाला त्याचं वेड असावंच लागतं, त्याची भूक असावी लागते, कधी कधी तुम्ही बाहेरच्या जगात विसराळू किंवा निर्बुद्ध असल्यासारखे वागता, कारण तुमच्या मनांत सतत कथा सुरू असतात. तरच, ह्या प्रक्रियेतून तुम्ही तरुन जाता”
कथाकथनाची प्रक्रिया शंका, संघर्ष तर कधी थकवा अशा दीर्घ प्रवासातून जाते, असे बिप्लब गोस्वामी म्हणाले. "आपण काहीतरी निर्माण करण्याच्या इच्छेने सुरुवात करतो. मग प्रवासाच्या मधोमध कुठेतरी थकवा येतो. कधी कधी आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण कथा घडण्यासाठी वेळ लागतो. त्या कथांसोबत तुम्हाला जगावे लागते."
त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास याचेच एक मार्मिक उदाहरण ठरला. ही कथा त्यांनी 2024 साली नोंदवली होती, असे गोस्वामी यांनी सांगितले. त्यावेळी त्यात केवळ 22 दृश्ये होती, असेही ते म्हणाले. , "यानंतर आयुष्याचे वास्तव समोर आले. आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठी मला अनेक गोष्टी कराव्या लागल्या. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत जग बदलले होते. पण मला तीच कथा सांगायची होती. खरे आव्हान हे होते की कालची कथा आजच्या प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवायची?”
ही प्रक्रिया अत्यंत कठीण आणि वेदनादायक असल्याचे सांगत, ते म्हणाले, "त्या काळात, रात्रंदिवस तुम्ही त्या कथेचाच विचार करत असता. काय लिहावे? प्रेक्षकांना काय भावेल? सतत एक दडपण असते. पण अखेरीस तुम्हाला मार्ग सापडतो." निर्मिती सुरू होण्यापूर्वीच पटकथेच्या दृश्यात्मक कल्पना करण्यासंबंधीचे (व्हिज्युअलायझिंग) सत्र हे या कार्यशाळेतील सर्वात लक्षवेधक सत्र ठरले. या सत्रात गोस्वामी यांनी लेखकांना स्वतःच्या चित्रपटाचे पहिले प्रेक्षक बनण्यासाठी प्रोत्साहन दिले. जेव्हा मी लिहितो, तेव्हा मी एका काल्पनिक पडद्यावर चित्रपट पाहत असतो. मी त्याचा पहिला प्रेक्षक बनतो. त्यानंतर प्रेक्षक तो कसा पाहतील, याचा मी विचार करतो. मी मानसिकदृष्ट्या एडिटिंग टेबलला देखील भेट देतो आणि दृश्यांची मांडणी कशी केली आहे ते पाहतो. या प्रक्रियेमुळे आपल्याला अनेक दृष्टिकोनातून चित्रपट समजून घेण्यास मदत होते, हा स्वानुभव त्यांनी उपस्थितांसोबत सामायिक केला.
onJune16,2026.(1)BSHE.JPG)
चित्रपट संपादनाच्या पार्श्वभूमीने गोस्वामी यांच्या लेखन प्रक्रियेवर लक्षणीय प्रभाव पडला आहे. यावेळी गोस्वामी यांनी सहकार्याचे महत्त्व देखील उलगडून सांगितले. सिनेमा हे कधीही एका व्यक्तीचे काम नसते याचे स्मरण त्यांनी भावी चित्रपटकर्त्यांना करून दिले.
चित्रपट हे एक सामूहिक माध्यम आहे, असे ते म्हणाले. लेखकांनी इतर विभागांचे कामही समजून घेणे आवश्यक असते. एकदा तुम्ही काहीतरी लिहिल्यानंतर, तुम्हाला त्यापासून स्वतःला वेगळे करावे लागेल. जर तुम्ही ताठर झालात आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही कल्पना केल्याप्रमाणेच राहिली पाहिजे असा आग्रह धरला, तर तुम्हाला अडचणी येतील. इतर विभागांचे स्वतःचे दृष्टिकोन असतील आणि ते असायलाच हवेत, ही बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
यावेळी उपस्थितांनी गोस्वामी यांना पटकथेचे सिद्धांत आणि कथात्मक मांडणीची काही सूत्रे असतात का याबद्दलही विचारले. त्यावर गोस्वामी यांनी ठरलेल्या साच्याबद्दल नापसंती व्यक्त केली. आपण सिद्धांतांवर लक्ष केंद्रित करत नाही, आपण केवळ कथेवर लक्ष केंद्रित करतो, असे ते म्हणाले. सिनेमा म्हणजे अंतिमतः कथाकथनासारखे आहे. कधीकधी एखादी आश्चर्यकारक घटना कथेला गती देते, तर कधीकधी दुसरीच घटना गती मिळवून देणारी असू शकते. प्रत्येक कथा स्वतःची लय शोधून काढते, असे त्यांनी नमूद केले.
अनेक लेखकांकडे जेव्हा एखादी चांगली कल्पना असते, परंतु तिचे संपूर्ण पटकथेत रूपांतर करताना त्यांना संघर्ष करावा लागतो, तेव्हा ते अनेकदा चिंताग्रस्त होतात असे वैयक्तिक मतही त्यांनी व्यक्त केले. तुम्ही कसे लिहित आहात याची जास्त काळजी करू नका, तुम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात यावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला त्यांनी दिला. कधीकधी आपण एका ओळीने सुरुवात करतो, मग त्याचा गोषवारा मांडतो, मग दृश्ये समोर येतात. इतर वेळी, आपण सुरुवातीपासूनच दृश्यामागून दृश्ये लिहित जातो. म्हणजेच विशिष्ट असा कोणताही नियम नसतो, हा अनुभवही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
onJune16,2026.(3)QK3H.JPG)
सातत्य हे या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे असते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आधी स्वतःवर विश्वास ठेवा, मग तुमच्यासाठी जी पद्धत योग्य असेल त्या पद्धतीने लिहीत राहा. नंतर, जेव्हा तुम्ही ते व्यावसायिकपणे सादर कराल, तेव्हा तुम्ही या उद्योग क्षेत्राच्या मानकांनुसार त्याची पुनर्मांडणी करू शकता, असा सल्ला त्यांनी दिला.
केवळ शॉर्टकट किंवा तांत्रिक क्लृप्त्यांच्या जोरावर लेखनावर प्रभुत्व मिळवता येते, या कल्पनेलाही गोस्वामी यांनी आव्हान दिले. लेखनासाठी कोणतेही जवळचा मार्ग नाही, लेखन करणे हे कठीण काम आहे. तुम्ही तंत्र शिकू शकता, पण ते तंत्र तुम्हाला आपोआपच चांगले लेखक बनवणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
त्याऐवजी निरीक्षणाची सवय लावण्याचे आवाहन त्यांनी सहभागींना केले. लोकांचे निरीक्षण करा, समाजाचे निरीक्षण करा. लोकांचे हावभाव, नातेसंबंध आणि परिस्थितींचे निरीक्षण करा. तीच निरीक्षणे पुढे तुमची पात्रे आणि तुमच्या कथा बनतात, असे त्यांनी सांगितले.
या सत्राच्या माध्यमातून भावी लेखकांना कथनात्मक मांडणी प्रक्रियेतला संघर्ष, पात्रांची भूमिका आणि दृश्यांची मांडणी याबद्दलचे व्यावहारिक ज्ञान मिळाले. यासोबतच प्रत्येक पटकथा आपला स्वतःचा मार्ग शोधून काढते, याचे स्मरणही या सत्राने त्यांना करून दिले.
उदयोन्मुख कथात्मक मांडणीकार आणि चित्रपट रसिकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात गोस्वामी दिलेला संदेश साधा पण कमालीचा प्रभाव सोडणारा ठरला : कथेवर विश्वास ठेवा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिहीत राहा.
बिप्लव गोस्वामी हे कोलकाता इथल्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे चित्रपट संपादन पदवीधर आहेत. बिप्लव गोस्वामी सध्या आगरतळा येथीलइथल्या त्रिपुरा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत
19व्या मिफ विषयी
19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.
- या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या.
- महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते.
- जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
- चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.
प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026! कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2273760
| Visitor Counter:
23