रेल्वे मंत्रालय
महत्त्वाच्या कोळसा कॉरिडॉरची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने दिली 755 कोटी रुपयांच्या चांपा-कोरबा तिसऱ्या रेल्वे मार्गिका प्रकल्पाला मंजुरी
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2026 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2026
भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या चांपा -कोरबा तिसऱ्या रेल्वे मार्गिका प्रकल्पाला (42 किलोमीटर) मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 755 कोटी रुपये इतका आहे. देशातील कोळशाने समृद्ध असलेल्या प्रदेशांमधील रेल्वेची वाहतूक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने कैंद्र सरकारने टाकलेले हे एक मोठे पाऊल ठरले आहे.
या प्रकल्पांतर्गत चांपा आणि कोरबा दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका उभारली जाणार आहे. याआधीच मंजूरी दिलेल्या मडवारानी-सरगबुंदिया विभागा व्यतिरिक्त ही मार्गिका असणार आहे. मालवाहतुकीला बळकटी देणे आणि देशाची वाढती ऊर्जेची गरज पूर्ण करणे या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या मिशन 3000 एमटी (दशलक्ष टन) आणि हाय-डेन्सिटी नेटवर्क कॉरिडॉर उपक्रमांतर्गत या मार्गिकेची निश्चिती केली गेली आहे.
देशाची उर्जा राजधानी म्हणून ओळखले जाणारे कोरबा हे शहर मोठ्या प्रमाणावर औष्णिक उर्जेचे केंद्र आहे. हे देशातील सर्वात महत्त्वाच्या कोळसा वाहतूक केंद्रांपैकी एक मानले जाते. चांपा-कोरबा हा विभाग साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड आणि महानदी कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या कोळसा खाणींना राष्ट्रीय रेल्वेच्या जाळ्यासोबत आणि मुंबई-हावडा हाय डेन्सिटी कॉरिडोअरशी जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
सध्या या विभागातून दररोज सुमारे प्रवासी रेल्वे गाड्यांच्या 10 जोड्या आणि सुमारे मालगाड्यांच्या 55 जोड्या चालवल्या जातात. या प्रदेशातील साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड आणि महानदी कोलफील्ड्स लिमिटेडची एकत्रित कोळसा उत्पादन क्षमता सध्या वर्षाला सुमारे 247 दशलक्ष टन इतकी आहे. येत्या काही वर्षांत ही क्षमता जवळपास 450 दशलक्ष टनांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. यामुळे आगामी काळात या मार्गावर अतिरिक्त 200 दशलक्ष टन कोळशाची वाहतूक वाढणार आहे.
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2273754)
आगंतुक पटल : 18