एआय सर्जनशीलतेचे भवितव्य आहे का? 19 व्या मिफ्फ च्या ओपन फोरममध्ये चित्रपटात एआयचा जबाबदारीने वापर करण्यावर भर
कृत्रिम बुद्धिमत्ता, सर्जनशीलतेसाठी पूरक साधन, मात्र ते सर्जकतेची जागा घेऊ शकत नाही” मिफ्फच्या ओपन फोरममध्ये मान्यवरांनी व्यक्त केली मते
मुंबई, 16 जून 2026
मुंबईत सुरू असलेल्या 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, भारतीय माहितीपट निर्माते संघटना, आयडीपीए ने, “एआय सर्जनशीलतेचे भवितव्य आहे का?” या संकल्पनेवर आधारित ओपन फोरम म्हणजेच खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात, फायरफ्लाय क्रिएटिव्ह स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापक पी. सी सनथ, एसएमपीटीईचे अध्यक्ष उज्ज्वल निरगुडकर, अधिवक्ता हेतल देसाई सोलिया आणि चित्रपट निर्माते तसेच फॅनबॉय पिक्चर्सचे दिग्दर्शक सुबोध मेनन सहभागी झाले होते. त्यांनी चित्रपट निर्मिती आणि आशय निर्मितीत, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, संधी आणि आव्हाने या विषयावर आपली मते मांडली.
या चर्चासत्रात सर्जनशील क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. चर्चासत्रातील तज्ज्ञांनी कथाकथन, चित्रपट निर्मिती प्रक्रिया आणि चित्रपटसृष्टीच्या भविष्यात एआयमुळे होणाऱ्या बदलांवर आपली मते मांडली. एआयमध्ये या उद्योगात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची मोठी क्षमता असल्याचे मान्य करूनही, मानवी सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि भावनिक बुद्धिमत्ता हेच प्रभावी कथाकथनाचे केंद्रबिंदू राहतील, असे वक्त्यांनी अधोरेखित केले.

सिनेमाच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर बोलतांना उज्ज्वल निरगुडकर यांनी, एआय ही चित्रपट निर्मितीतील स्वाभाविक तंत्रज्ञान प्रगती आहे, असा मुद्दा मांडला. प्रत्यक्ष निर्मितीनंतरची कामे, जसे की ध्वनी सुधारणा, रंगसंगती सुधारणा, दृश्य अधिक परिणामकारक बनवणे आणि चित्रपट जतन करणे अशा सगळ्या कामात, एआयची भूमिका वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आज एआय साधने अत्यंत झपाट्याने विकसित होत असली, तरीही, त्यांचा दर्जा तपासून, त्यांचा पूर्ण वापर करण्यासाठी चित्रपट उद्योगाला वेळ लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
चित्रपट निर्माते आणि फॅनबॉय पिक्चर्सचे संचालक सुबोध मेनन यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता आशय निर्माण करू शकते आणि कल्पनांच्या मंथन प्रक्रियेत मदत करू शकते; मात्र कथाकथनाचा गाभा हा मूलतः मानवीच असतो.
त्यांनी एआयचे वर्णन कल्पना निर्माण करणे, त्यांची पडताळणी करणे आणि सर्जनशील प्रक्रियेला दिशा देणे यासाठी उपयुक्त साधन म्हणून केले. त्यांच्या मते, चित्रपट निर्मात्यांसाठी एआयची समज विकसित करणे दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचे ठरणार आहे, कारण हे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून चित्रपट आणि माध्यम क्षेत्रात त्याचा वापर वाढत आहे.
एआय, सर्जनशीलतेची जागा घेणारे तंत्रज्ञान नसून निर्मात्यांच्या कल्पनाशक्तीला पूरक ठरणारे साधन आहे. असेही त्यांनी नमूद केले.
एआयमुळे, दृश्याचा दर्जा, ध्वनीविषयक गुणवत्ता, आणि प्रेक्षकांना येणारा अनुभव सुधारून कथन अधिक प्रभावी करता येऊ शकते, असे मत फायरफ्लाय क्रिएटिव्ह स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक पी. सी .सनथ यांनी यावेळी व्यक्त केले. सध्याचा प्रयोगशील काळ लक्षात घेऊन, सर्जक समुदायाने, एआयमधील संधी बघून, त्यांचा वापर करायला शिकावे. एआयवर पूर्णपणे अवलंबून न राहता , त्याच्यातल्या क्षमता तपासून, त्यांचा वापर करावा.

अधिवक्ता, हेतल देसाई सोलिया यांनी, एआयमुळे निर्माण झालेल्या आशयाशी संबंधित कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला. यासाठी वैध एआय डेटाचा उपयोग करण्याचे महत्त्व आणि सर्जक कामांमध्ये पुरेसा मानवी हस्तक्षेप असेल, याची खात्री करणे, यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. स्वामित्व मालकी हक्क, मानवी सर्जकांकडे सुरक्षित असतो, असे सांगत, चित्रपट निर्मात्यांनी एआयचा वापर, मूळ कंटेट बदलण्यासाठी नव्हे, तर चित्रपटांची गुणवत्ता, सौंदर्य वाढवण्यासाठी करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाकडे मानवी सर्जनशीलतेची जागा घेणारे तंत्रज्ञान म्हणून नव्हे, तर तिला पूरक आणि बळकटी देणारे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले पाहिजे, असे सर्व मान्यवरांनी एकमताने मान्य केले. एआयमुळे निर्मिती प्रक्रियेतील अनेक टप्पे अधिक सुलभ आणि वेगवान होऊ शकतात, कार्यक्षमता वाढू शकते तसेच सर्जनशीलतेच्या नव्या शक्यता खुल्या होऊ शकतात. मात्र, प्रभावी कथाकथनाचे खरे मर्म, आजही मानवी कल्पनाशक्ती, भावना, अनुभव आणि कलात्मक दृष्टीकोनातच दडलेले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या चर्चासत्रानंतर प्रेक्षकांसोबत प्रश्नोत्तरे झाली, यात सहभागी झालेल्या सर्वांनी एआयचा अंगीकार, नैतिकतेविषयीच्या चिंता, स्वामित्व संरक्षण आणि सर्जनशील व्यवसायांचे भवितव्य याविषयीची माहिती दिली. सर्व चित्रपट निर्मात्यांनी, तंत्रज्ञानातील बदलांचा अंगीकार तर करावा, मात्र, मानवी सर्जनशीलता हीच कथाकथनाच्या केंद्रस्थानी असावी, या मुद्द्यावर चर्चासत्राच्या शेवटी सहमती झाली.
* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/राधिका अघोर/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2273703
| Visitor Counter:
26