अति लघु नाट्य (मायक्रो ड्रामा) कथाकथनाचा उन्नत प्रकार, सिनेमा क्षेत्रातील फास्ट फॅशन नव्हे: 19 व्या मिफ्फ मध्ये, सिनेउद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे मत
मोबाईल स्क्रीन्स पासून ते मुख्य प्रवाहातील कथाकथनापर्यंत : मिफ्फ मध्ये अति लघु नाट्य प्रकाराचे अवलोकन
मुंबई, 16 जून 2026
कथाकथन शैलीत, प्रेक्षकांच्या बदलत्या सवयीनुसार आणि बदलत्या डिजिटल प्लॅटफॉर्मनुसार बदल होत असतात, हाच धागा धरून, “फास्ट फिल्म: अति लघु नाट्य प्रकार सिनेमातील फास्ट फॅशन आहे का?’ या विषयावर एक विचारप्रवर्तक चर्चासत्र आज 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्फ मध्ये आयोजित करण्यात आले होते. अभिनेत्री शीना चौहान यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले, या चर्चासत्रात चित्रपट निर्माते समीर मोदी, अभिनेत्री अर्चना कवी, अभिनेता उज्ज्वल कुमार आणि चित्रपट निर्माते राफेल स्टेमप्लेव्हस्की यांनी सहभाग घेत, मायक्रो ड्रामा म्हणजे अतिलघु नाट्य आणि आजच्या कथाकथनावर त्याचा पडलेला प्रभाव, यावर आपली मते मांडली.
यावेळी सहभागी वक्ते आणि प्रेक्षकांचे स्वागत करत, मिफ्फचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सर्व वक्त्यांचा सत्कार केला आणि आणि सातत्याने आणि वेगाने बदलत असणाऱ्या माध्यम क्षेत्रातील, नव्याने उदय होत असलेल्या कथाकथन शैलीचे महत्त्व अधोरेखित केले.

पॅनेलमधील मान्यवरांनी एकमताने नमूद केले की, अतिलघु नाट्य म्हणजेच, मायक्रो ड्रामा हा प्रेक्षकांच्या बदलत्या सवयी आणि मोबाईल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे घडलेला कथाकथनाच्या कलेचा नैसर्गिक उत्क्रांत टप्पा आहे, यावर सर्व वक्त्यांचे एकमत झाले. हा कलाप्रकार, कालावधीने लहान असला तरी पारंपरिक चित्रपटांप्रमाणेच त्यासाठी तेवढेच सर्जनशील कौशल्य, प्रभावी कथानक मांडणी आणि भावनिक समज आवश्यक असते. त्यामुळे या नाट्य प्रकाराकडे केवळ संक्षिप्त मनोरंजन म्हणून न पाहता, आधुनिक प्रेक्षकांच्या गरजांनुसार विकसित झालेल्या कथाकथनाच्या एका प्रभावी माध्यमाच्या रूपात पाहिले पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
मायक्रो ड्रामाच्या वाढत्या लोकप्रियतेविषयी बोलताना समीर मोदी यांनी सांगितले की, कोविड-19 काळात मोबाईल स्क्रीनवर आशय/कार्यक्रम पाहण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे निर्मात्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर या प्रकाराला मोठी गती मिळाली. अति लघु नाट्य हे असे कथाकथनाचे माध्यम आहे ज्यामध्ये नेमकेपणा आणि सर्जनशीलता अत्यंत महत्त्वाची असते, असे मत त्यांनी मांडले. मर्यादित कालावधीत प्रभावी कथा नेमकेपणाने सादर करण्यासाठी दर्जेदार लेखन, दमदार अभिनय आणि अचूक संपादन यांचा उत्कृष्ट मेळ साधावा लागतो, असेही ते म्हणाले.

मायक्रो ड्रामाकडे सिनेमाच्या दुय्यम किंवा कमी दर्जाच्या स्वरूपाप्रमाणे अथवा केवळ क्षणिक मनोरंजन म्हणून पाहू नये. उलट, ते स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे आणि सातत्याने विकसित होत असलेले एक वैशिष्ट्यपूर्ण कथाकथन माध्यम आहे, असे मात मोदी यांनी व्यक्त केले.
तंत्रज्ञानातील प्रत्येक बदलासोबतच, आशय-निर्मितीच्या नव्या स्वरूपांना जन्म मिळाला आहे, असे अर्चना कवी यांनी नमूद केले. टीव्हीपासून डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंतच्या प्रवासात माध्यमे बदलली, तसेच कथाकथनाच्या पद्धतीही विकसित होत गेल्या, असे त्यांनी सांगितले. मायक्रो ड्रामासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्रेक्षकांचे लक्ष पहिल्याच काही सेकंदांत वेधून घेणे, असे निरीक्षण त्यांनी मांडले. या फॉरमॅटमुळे अभिनेते, लेखक आणि संपादक यांच्यासाठी नव्या संधी निर्माण होत असल्या, तरी त्याचबरोबर कथाकथन आणि अभिनयामध्ये अधिक नेमकेपणा, परिणामकारकता आणि कसब असण्याचीही आवश्यकता असते. त्यामुळे मर्यादित वेळेत प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक दृश्य, संवाद आणि सादरीकरण अत्यंत विचारपूर्वक आणि प्रभावी असणे गरजेचे ठरते.
कथाकथनाचा कालावधी कितीही कमी किंवा जास्त असला तरी प्रेक्षकांना भावनिक रित्या जोडून घेणे, हा प्रत्येक कथाकथनाचा मूलभूत पाया असतो, असे उज्ज्वल कुमार यावेळी म्हणाले. प्रेक्षकांच्या मनाशी नाते निर्माण करण्याची क्षमता हीच कोणत्याही प्रभावी कथानकाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. कलाकारांनी नव्या माध्यमांशी आणि बदलत्या फॉरमॅट्सशी जुळवून घेत आपली अभिनयकला सातत्याने विकसित करणे आवश्यक आहे, जेणेकरून कमी वेळेतही ते प्रेक्षकांशी प्रभावी संवाद साधू शकतील, असे मत त्यांनी मांडले. आज स्मार्टफोनच्या व्यापक वापरामुळे मायक्रो ड्रामासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

'मायक्रो ड्रामा', हे चित्रपट निर्मात्यांसाठी एक आव्हानही आहे, आणि एक संधीही, असे राफेल स्टेंपलेव्स्की म्हणाले. पडद्याचा आकार कोणताही असो, सशक्त कथाकथन आणि अस्सल मानवी भावना सिनेमाच्या केंद्रस्थानी राहतात, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, मायक्रो ड्रामा हा सिनेमॅटिक भाषेच्या सातत्याने होत असलेल्या उत्क्रांतीमधील एक वेगळा टप्पा आहे. मायक्रो ड्रामा हा सिनेमाचा ‘फास्ट फॅशन’ नसून, तो एक उदयोन्मुख कथाकथन प्रकार आहे, जो पारंपरिक चित्रपट निर्मितीला पूरक ठरतो आणि त्याच वेळी प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी व पाहण्याच्या सवयींना प्रतिसाद देतो, या मुद्द्यावरील एकमताने चर्चेचा समारोप झाला.
चर्चेनंतर उपस्थितांबरोबर प्रश्नोत्तरांचे एक रंजक सत्र झाले. यात पॅनेल सदस्यांनी 'मायक्रो ड्रामा'मुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांबाबत अधिक विस्ताराने माहिती दिली. चित्रपटांमधील मूलभूत घटकांचे जतन करताना, प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा बदलता कल, कथाकथनाच्या नवनवीन शक्यता निर्माण करत आहे, यावर सर्वसहमतीने सत्राची सांगता झाली.
19व्या मिफ विषयी
19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.
- या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या.
- महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते.
- जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
- चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.
प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026! कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राधिका अघोर/राजश्री आगाशे/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2273648
| Visitor Counter:
14