पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींबाबत आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद
पर्शियन आखाती प्रदेशात व्यापारी जहाजांशी संबंधित अलीकडील घटनांबद्दल सरकारकडून चिंता व्यक्त
गिनी-बिसाऊचा ध्वज असलेल्या 'एमटी जलवीर' या व्यापारी जहाजावरील सर्व 20 भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याचे वृत्त आहे; ओमानमधील भारतीय दूतावासाने या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधला
'एमटी सेटेबेलो' या व्यापारी जहाजावरील हल्ल्यात मृत्यू झालेल्या 3 भारतीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्याचे निर्देश 'सीमेन वेल्फेअर फंड सोसायटी'ला देण्यात आले
संकटकालीन परिस्थितीनंतर, आयात आणि देशांतर्गत उत्पादनाद्वारे खतांच्या साठ्यात सुमारे 153.79 लाख मेट्रिक टन खतांची भर
भारताची खत सुरक्षा मजबूत, स्थिर आणि सुव्यवस्थित असून, सर्व प्रमुख खतांची उपलब्धता सातत्याने गरजेपेक्षा अधिक राहिली आहे
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2026 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2026
पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार देशातील नागरिकांना नियमित माहिती देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवत आहे. यासंदर्भात आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
खतांचा साठा आणि उपलब्धता
- देशात खतांचा एकूण साठा समाधानकारक स्थितीत आहे.
- खरीप 2026 हंगामासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने खतांच्या गरजेचे पुनर्मूल्यांकन केले असून ती 383.9लाख मेट्रिक टन इतकी निश्चित केली आहे. या तुलनेत, आजचा साठा सुमारे 195.79 लाख मेट्रिक टन (51% पेक्षा जास्त) इतका आहे; हे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा 33% अधिक आहे. सरकारचे उत्तम नियोजन, आगाऊ साठवणूक आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्स व्यवस्थापन यामुळे हे शक्य झाले आहे.
- चालू खरीप हंगाम 2026 मध्ये 07.06.2026 पर्यंत भारतीय शेतकऱ्यांनी एकूण 94.60 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची खरेदी केली आहे. हे प्रमाण एकूण गरजेच्या सुमारे 25% इतके आहे.
- संकटसदृश परिस्थितीनंतर, आयात आणि देशांतर्गत उत्पादनाद्वारे एकूण सुमारे 153.79 लाख मेट्रिक टन खतांची उपलब्धता वाढवण्यात आली आहे.
किरकोळ इंधन उपलब्धता आणि मूल्यविषयक उपाययोजना
- काही भागांमधील किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर विक्रीचे प्रमाण असामान्यपणे जास्त असल्याचे आणि तिथे मोठी गर्दी असल्याचे दिसून आले आहे; मात्र देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
सागरी सुरक्षा आणि जहाजवाहतूक
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने पर्शियन आखातातील सध्याच्या सागरी परिस्थितीबाबत माहिती दिली आणि त्या भागात भारतीय जहाजे व कर्मचारी यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा तपशील सादर केला. यात असे नमूद करण्यात आले की:
- पर्शिया आखातात व्यापारी जहाजांशी संबंधित अलीकडील घटनांबाबत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. अलीकडे घडलेल्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- 08 जून 2026 रोजी ओमान किनाऱ्याजवळ पलाऊ ध्वजधारक एमटी मारिवेक्स या जहाजावर आग लागल्याची घटना घडली. या जहाजावर 24 भारतीय खलाशी कार्यरत होते. ओमान हवाई दलाने सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका केली.
- 10 जून 2026 रोजी पलाऊ ध्वजधारक तेलवाहू जहाज एमटी सेट्टेबेलोवर हल्ला झाला आणि जहाजावरील आपत्कालीन कार्यपद्धती तात्काळ सुरू करण्यात आली. या जहाजावर एकूण 28 खलाशी होते. त्यामध्ये 24 भारतीय, 2 पाकिस्तानी, 1 रशियन आणि 1 युक्रेनियन नागरिकाचा समावेश होता. दुर्दैवाने, या घटनेत 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून, सरकारने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
- उर्वरित 25 खलाशांची, ज्यात 21 भारतीयांचा समावेश होता,त्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
- नौवहन महासंचालनालय मृत भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरविण्यात येत आहे.
- सीमॅन वेल्फेअर फंड सोसायटी (एसडब्ल्यूएफएस) मार्फत प्रत्येक मृत खलाशाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- आज, म्हणजेच 11 जून 2026 रोजी, गिनी-बिसाऊ ध्वजधारक डांबर/बिटुमेन वाहतूक करणारे एमटी जलवीर (आयएमओ : 9486283) हे जहाज ओमानमधील शिनास बंदर परिसरात सागरी सुरक्षेशी संबंधित एका घटनेत अडकल्याचे वृत्त आले. या जहाजावर 20 भारतीय खलाशी असून ते सर्व सुरक्षित आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
- नौवहन महासंचालनालय या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परदेशातील भारतीय दूतावास तसेच संबंधित सर्व भागधारकांशी सातत्याने समन्वय साधत आहे.
- नौवहन महासंचालनालय नियंत्रण कक्ष : कार्यान्वित झाल्यापासून नियंत्रण कक्षाने 12,331 कॉल्स आणि 27,515 पेक्षा जास्त ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या 72 तासांत खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि सागरी संबंधितांकडून एकूण 311 कॉल्स आणि 683 ईमेल्स प्राप्त झाल्या आहेत.
- मायदेशी परतण्याविषयी : मंत्रालयाने नौवहन महासंचालनालयाच्या माध्यमातून आतापर्यंत 3,537 हून अधिक भारतीय खलाशांच्या सुरक्षित मायदेशी परतण्याची सोय केली आहे, ज्यामध्ये गेल्या 72 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून परत आलेल्या 31 खलाशांचा समावेश आहे.
या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया प्रदेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून या प्रदेशातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे.
ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजांवर अलीकडे झालेल्या हल्ल्यांविषयी अद्ययावत माहिती
एमटी मारिव्हेक्सची सद्यस्थिती
- एमटी मारिव्हेक्सवरील सर्व 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
- ओमानमधील भारतीय दूतावास त्यांना सर्वतोपरी मदत करत असून त्यांच्या लवकरात लवकर भारतात परत येण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. ते उद्या भारतात परतण्याची शक्यता आहे.
एमटी सेट्टेबेलो सद्यस्थिती
- भारताने ओमानच्या किनाऱ्याजवळ पलाऊचा ध्वज असलेल्या एमटी सेट्टेबेलो या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
- प्राण गमावलेल्या 3 भारतीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडे मंत्रालयाने तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी ओमानमधील भारतीय दूतावास संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.
- भारतीय दूतावास बचावलेल्या भारतीय खलाशांना सर्वतोपरी साहाय्य करत असून, त्यांच्या लवकरात लवकर भारतात परतण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
एमटी जलवीरवरील सद्यस्थिती
- ओमानमधील शिनास बंदराजवळ हल्ला झालेल्या गिनी बिसाऊचा ध्वज असलेल्या 'एमटी जलवीर' या व्यापारी जहाजावरील सर्व 20 भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.
- ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.
- या प्रदेशात व्यापारी जहाज वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या घडणाऱ्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून मुक्त व निर्बंधमुक्त नौवहन आणि व्यापार कायम राखणे, याचे महत्त्व मंत्रालय वारंवार सांगत आहे.
- भारताने नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाकडे व्यापारी जहाजावरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या उद्देशाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काल अमेरिकी दूतावासातील सीडीएला बोलावले होते. भारतीय खलाशी असलेल्या तीन व्यापारी जहाजांवरील हल्ले अमेरिकी नौदलाने केले होते.
* * *
निलिमा चितळे/सोनाली काकडे/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2271913)
आगंतुक पटल : 8