राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशात राष्ट्रीय इस्पात निगमच्या विशाखापट्टणम येथील पोलाद प्रकल्पात झालेल्या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू आणि इतर सहा कामगारांना झालेल्या दुखापतींच्या वृत्ताची भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली


व्यवस्थापनाने सुरक्षाविषयक नियमावलीकडे दुर्लक्ष केल्याचा कामगार संघटनेचा आरोप

आयोगाने आंध्र प्रदेशाच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून दोन आठवड्यांच्या आत सदर घटनेचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले

या अहवालात जखमी कामगारांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीची आणि त्यांना तसेच मृत कामगारांच्या जवळच्या नातेवाईकाला देण्यात येणाऱ्या सानुग्रह मदतीबद्दलची माहिती समाविष्ट करण्याचे निर्देश

प्रविष्टि तिथि: 11 JUN 2026 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2026

 

आंध्र प्रदेशात राष्ट्रीय इस्पात निगमच्या विशाखापट्टणम येथील पोलाद प्रकल्पात दिनांक 8 जून 2026 रोजी झालेल्या स्फोटानंतर आठ कामगारांचा मृत्यू आणि इतर सहा कामगारांना गंभीररीत्या भाजल्यामुळे दुखापत झाल्याबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) स्वतःहून दखल घेतली आहे. सदर दुर्घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षाविषयक नियमावलीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगार संघटनेने केला असे समजते.

प्रसिद्ध झालेल्या बातमीतील मजकूर जर खरा असेल तर त्यातून मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित होतो असे निरीक्षण नोंदवत आयोगाने आंध्र प्रदेशाच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून दोन आठवड्यांच्या आत सदर घटनेचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर अहवालात जखमी कामगारांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीची आणि त्यांना तसेच मृत कामगारांच्या जवळच्या नातेवाईकाला देण्यात येणाऱ्या सानुग्रह मदतीबद्दलची माहिती समाविष्ट असावी असे आयोगाने बजावले आहे.

दिनांक 9 जून 2026 रोजी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा, प्रकल्पामधील ‘पोलाद वितळवण्याच्या कक्षात’ सुमारे 1600 अंश सेल्सियस तापमान असलेले 150 टन द्रवरूप पोलाद वाहून नेणाऱ्या मोठ्या भांड्याचा अचानक स्फोट झाला आणि वितळलेले पोलाद कक्षाच्या जमिनीवर सांडल्यामुळे तेथे असलेले कामगार गंभीररित्या भाजले.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271764) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu