रेल्वे मंत्रालय
प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी भारतीय रेल्वेचे मोठे पाऊल; रेल्वे स्थानकांवर राबवणार देशव्यापी अग्निसुरक्षा लेखापरीक्षण
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2026 10:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2026
भारतीय रेल्वे, आपल्या सेवांअंतर्गत प्रवाशांची सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्थेला अधिक बळकट देण्याच्या उद्देशाने देशभरातील रेल्वे स्थानकांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सद्यस्थितीतील अग्निसुरक्षा यंत्रणेचे मूल्यमापन केले जाईल. यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा निश्चित केल्या जाणार आहेत.
या लेखापरीक्षणांतर्गत रेल्वे स्थानकाच्या इमारती, विद्युत उपकरणे, वातानुकूलन व्यवस्था आणि वायुविजन यंत्रणा, आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निशामक उपकरणे, पाण्याची उपलब्धता, पाणी उपशाची व्यवस्था आणि तुषार सिंचनप्रणाली यांसह सर्व महत्त्वाच्या सुरक्षा विषयक पायाभूत सुविधांचा अंतर्भाव असणार आहे. आग लागण्यासारख्या घटनांसह इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितींचा प्रभावी सामना करण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानके पूर्णपणे सज्ज असावीत, या उद्देशाने हे लेखापरीक्षण केले जात आहे.
या लेखापरीक्षणाअंतर्गत अग्निसुरक्षा तसेच सुरक्षा मानकांच्या विहित अनुपालनाचे पालन होत असल्याबद्दलही मूल्यमापान केले जाणार आहे. तपासणी प्रक्रियेदरम्यान आढळलेली प्रत्येक त्रुटी तातडीने योग्य त्या सुधारणात्मक उपाययोजना करून दूर केली जाणार आहे.
रेल्वेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त तपासणी पथके हे लेखापरीक्षण करतील. गरज भासल्यास यासाठीच्या विशेष संस्था तसेच राज्यांच्या अग्निशामक विभागांचे सहकार्य देखील घेतले जाणार आहे. रेल्वेच्या सुरक्षा विषयक सज्जतेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने, या लेखापरीक्षणादरम्यान सुधारणांना वाव असल्याचे आढळलेल्या बाबी प्राधान्यक्रमावर हाती घेतल्या जाणार आहे.
भारतीय रेल्वे आपल्या संपूर्ण व्यवस्थेतील सुरक्षा आणि संरक्षण विषयक व्यवस्थेत सातत्यपूर्णतेने विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याअनुषंगानेच हा अग्निसुरक्षा लेखापरीक्षण उपक्रम राबवला जात आहे. याअंतर्गत रेल्वे सेवेची सुरक्षा मानके बळकट करण्याच्या आणि रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन सज्जतेत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2271417)
आगंतुक पटल : 36