वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते बीएचएव्हीवायए (‘भव्य’) पोर्टलचा प्रारंभ
राज्यांमध्ये औद्योगिक पार्क्सच्या स्पर्धात्मक विकासाला चालना देण्यासाठी ‘भव्य’योजनेची सुरुवात: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
पायाभूत सुविधा,सुधारणा आणि डिजिटल संपर्क सुविधा यांवर सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे विकासासाठी मजबूत पाया निर्माण झाला : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
08 JUN 2026 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2026
भारत औद्योगिक विकास योजनेच्या (भव्य)परिचालनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आज नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ‘भव्य’ पोर्टलची सुरुवात केली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, ‘भव्य’ ही योजना एका अशा स्पर्धात्मक प्रारूपाचा स्वीकार करेल ज्याअंतर्गत राज्यांना त्यांची औद्योगिक क्षमता, जमिनीची उपलब्धता, गुंतवणूकदारांचे स्वारस्य आणि क्षेत्रीय क्षमता हे घटक अधोरेखित करणारा तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, गुंतवणूकदारांना डिजिटल मंचाच्या माध्यमातून जमिनीची उपलब्धता, संपर्क सुविधा तसेच परिसरातील पायाभूत सुविधा यांच्यासह औद्योगिक पार्क्सविषयी तपशीलवार माहिती मिळवता येईल आणि त्यामुळे त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेणे शक्य होईल. सदर योजना विविध क्षेत्रांच्या तसेच गुंतवणूकदारांच्या विशिष्ट गरजांनुसार औद्योगिक पार्क्सची रचना केली जाईल आणि त्यांना देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणूकीसाठी अधिक आकर्षक ठिकाणाचे रूप दिले जाईल याची सुनिश्चिती करेल.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, गेल्या दशकभरात सरकारने रस्ते, महामार्ग, रेल्वे, मेट्रोसेवा, विमानतळे, बंदरे, वीजविषयक पायाभूत सुविधा, पाण्याची उपलब्धता आणि डिजिटल संपर्क व्यवस्था यांच्यातील गुंतवणुकींच्या माध्यमातून आर्थिक विकास आणि समाज कल्याणासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
पीयूष गोयल म्हणाले की भारताचा आवाका, वाढती मागणी, युवा प्रतिभा तसेच तरुणाईच्या ऊर्जेमुळे भारताकडे अधिकाधिक प्रमाणात एक विश्वासार्ह भागीदार आणि एक आकर्षक गुंतवणूक स्थळ म्हणून पाहिले जात आहे. ते पुढे म्हणाले की सरकार नेहमीच व्यवसाय, उद्योग, शेतकरी, मच्छिमार, स्टार्ट अप उद्योग आणि महिला उद्योजकांसाठी संधी निर्माण करण्याप्रती कटिबद्ध राहिले आहे.
‘भव्य’ योजनेची घोषणा करताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की, अधिकाधिक गुंतवणुकींच्या माध्यमातून मोठ्या-प्रमाणात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात 100 औद्योगिक पार्क्स विकसित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या पार्क्स साठी राज्य सरकारतर्फे जमीन उपलब्ध करून दिली जाईल तर केंद्र सरकार राज्यांशी 51:49 मॉडेलनुसार भागीदारी करून राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास महामंडळाच्या (एनआयसीडीसी) माध्यमातून पायाभूत सुविधा निर्मितीला पाठबळ पुरवेल. उद्योगांवर अधिक लक्ष केंद्रित करून प्लग-अँड-प्ले प्रकारचे औद्योगिक पार्क्स उभारणे हा या योजनेचा उद्देश आहे अशी माहिती गोयल यांनी दिली.
ते म्हणाले की भूसंपादन आणि परवानग्या यांच्यावर खर्च होणारा वेळ कमी करून अधिक तत्परतेने परिचालन सुरु करण्यासाठी गुंतवणूकदारांना मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की भारतभरात गुंतवणुकीला चालना देणे आणि विकसित भारत 2047 च्या संकल्पनेला पाठबळ पुरवणे ही ‘भव्य’ योजनेची सुरुवात करण्यामागील संकल्पना आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 33,660 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजूर केलेली ‘भव्य’ योजना म्हणजे येत्या सहा वर्षांच्या कालावधीत देशभरात गुंतवणूक-सज्ज, जागतिक दर्जाच्या 100 औद्योगिक पार्क्सचा विकास करण्यासाठीचा केंद्र सरकारचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे.
सदर योजना लक्षणीय प्रमाणात देशांतर्गत तसेच परदेशी गुंतवणूक आकर्षित करेल, मोठ्या प्रमाणात औद्योगिक रोजगार निर्मिती करेल आणि जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक उत्पादन स्थळ म्हणून भारताचा उदय होण्यात महत्त्वाचे योगदान देईल.

सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270450)
आगंतुक पटल : 13