कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
नवी दिल्ली इथे 2-3 जून 2026 रोजी पहिली ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी कार्य गट बैठक भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने संपन्न
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2026
भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली, पहिली ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी कार्यगट बैठक 2-3 जून 2026 रोजी, भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली, आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीचे उद्घाटन डीओपीटीच्या सचिव रचना शाह यांनी केले. त्यांनी बदलत्या भ्रष्टाचाराच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत आंतरराष्ट्रीय सहकार्य, मजबूत संस्था आणि तंत्रज्ञान-आधारित प्रशासनाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी भारताच्या अध्यक्षीय कार्यकाळातील 'लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी' या संकल्पनेवर प्रकाश टाकला आणि मालमत्ता पुनर्प्राप्ती सहकार्य मजबूत करणे, सीमापार भ्रष्टाचाराचा सामना करणे तसेच नैतिक आणि पारदर्शक प्रशासनाला प्रोत्साहन देणे या प्राधान्यक्रमांवर जोर दिला.
कार्यकारी गटाने दोन प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा पुढे नेली, ती म्हणजे: मालमत्ता पुनर्प्राप्ती आणि सीमापार भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढवणे.
प्रतिनिधींनी सक्रियपणे सहभाग घेतला आणि व्यावसायिक स्तरावरील सहकार्य मजबूत करणे, अवैध मालमत्तेचा शोध घेणे व ती परत मिळवणे, फरार गुन्हेगारांचा वेध घेणे आणि उत्तरदायित्व सुधारण्यासाठी तसेच भ्रष्टाचाराचे धोके कमी करण्यासाठी नवोन्मेष आणि डिजिटल साधनांचा उपयोग करणे यावर विचारांची देवाणघेवाण केली.
2 जून 2026 रोजी झालेल्या पहिल्या ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी कार्यगट बैठकीच्या निमित्ताने, मालमत्ता पुनर्प्राप्तीवरील ब्रिक्स तज्ञांच्या केंद्रबिंदूंविषयक पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नेटवर्कचा दृष्टिकोन आणि भविष्यातील कार्य यावर विचारमंथन करण्यात आले, ज्यामध्ये केंद्रबिंदूंच्या निर्देशिकेद्वारे अनौपचारिक सहकार्य मजबूत करणे, माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सुलभ आणि प्रमाणित नमुने आणि व्यावसायिक स्तरावरील नियमित सहभाग यांसारख्या उपायांचा समावेश होता.
बैठकीत चर्चा केलेले उपक्रम 4-5 ऑगस्ट 2026 रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी कार्यगट बैठकीत पुढे नेले जातील.
राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268692)
आगंतुक पटल : 9