इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल इंडिया भाषिणी विभाग, करंट एआय आणि कल्प इम्पॅक्ट यांच्याकडून बहुभाषिक अत्याधुनिक एआय नवोन्मेष तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी 'व्योम इनोव्हेशन चॅलेंज' सुरू

Posted On: 02 JUN 2026 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जून 2026

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनअंतर्गत कार्यरत डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने, करंट एआय आणि कल्प इम्पॅक्ट यांच्या सहकार्याने ‘व्योम इनोव्हेशन चॅलेंज’ सुरू केले आहे. इंटरनेटची मर्यादित किंवा सुविधा नसतानाही कार्य करू शकणारे, विविध भारतीय भाषांना सक्षमपणे हाताळणारे आणि आवाजावर आधारित (व्हॉइस फर्स्ट) कृत्रिम बुद्धिमत्ता  उपाय विकसित करण्यासाठी संशोधक, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

व्योम इनोव्हेशन चॅलेंज' हे 'सुनो सूत्र' या उपकरणावर आधारित आहे. भाषिणी आणि करंट एआय यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या या बहुभाषिक, व्हॉइस फर्स्ट आणि मुक्त स्रोत  हाताळण्यायोग्य एआय संदर्भ उपकरणाचे अनावरण ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये करण्यात आले होते. 'सुनो  सूत्र' हे एक संदर्भ व्यासपीठ  म्हणून तयार करण्यात आले असून, ते भारतीय भाषांतील भाषा-तंत्रज्ञान आणि उपकरणावरच कार्य करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता,यांची सांगड घालते. यामुळे क्लाउड पायाभूत सुविधा अथवा अखंड इंटरनेट जोडणीशिवाय भारतीय भाषांमध्ये संवादात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनुभव घेणे शक्य होते

डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग म्हणाले:

“बहुभाषिक एआय हा केवळ तांत्रिक बदल नसून जनहिताची पायाभूत सुविधा आहे. यामुळे विविध भाषांमधून अधिकाधिक नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवणे शक्य होते. भारतीय भाषा-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेला बळकटी देत, 'भाषिणी' या परिवर्तनाला गती देत आहे. 'सुनो  सूत्र'सारखे उपाय कमी साधनसंपत्ती, ऑफलाइन  आणि हाताळण्यायोग्य उपकरणांवरही कार्य करू शकतात. त्यामुळे विविध क्षेत्रांतील आणि विविध भाषिक नागरिकांपर्यंत आवाजाधारित, बुद्धिमान सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे शक्य होत आहे."

व्योम इनोव्हेशन चॅलेंज'मुळे भाषिणीची बहुभाषिक एआय पायाभूत सुविधा आणि करंट एआयचे मुक्त-स्रोत तंत्रज्ञानातील कौशल्य यांचा संगम साधला जात आहे. याच्या माध्यमातून भाषा सुलभता, डिजिटल साक्षरता आणि इंटरनेट जोडणीशी संबंधित आव्हानांवर मात करणारे उपयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित उपाय विकसित करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

या चॅलेंजद्वारे स्टार्ट-अप्स, संशोधक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), उद्योग क्षेत्रातील भागीदार तसेच स्वतंत्र नवसंशोधकांना 'सुनो सूत्र' मंच अधिक विकसित आणि सक्षम करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. नवीन उपयोगक्षेत्रे, हार्डवेअरमधील सुधारणा, एआय मॉडेलचे अनुकूलन आणि प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज ॲप्लिकेशन्स विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या उपकरणाला अधिक लहान, अधिक कार्यक्षम आणि विविध प्रत्यक्ष कार्यपरिस्थितींमध्ये वापरण्यास अधिक उपयुक्त बनवण्यासाठी नवे उपाय आणि कल्पना मांडण्यासही सहभागींना प्रोत्साहन दिले जात आहे.

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2268189) अभ्यागत कक्ष : 9