राष्ट्रपती कार्यालय
दक्षिण आफ्रिकेच्या उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2026 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2026
दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती शिपोकोसा पॉलस माशातिले यांनी आज (2 जून 2026) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
भारत भेटीवर प्रथमच आलेले उपराष्ट्रपती माशातिले यांचे राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वागत केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऐतिहासिक आणि आधुनिक काळाला जोडणारा एक विशेष ऋणानुबंध आहे. आपली ही बहुआयामी भागीदारी समान मूल्ये आणि परस्परांबद्दलच्या आदरावर आधारलेली आहे. दक्षिण आफ्रिका हा पहिला देश होता ज्याच्यासोबत भारताने 1997 मध्ये 'धोरणात्मक भागीदारी' स्थापित केली होती, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे नेहमीच ग्लोबल साऊथ देशांचा बुलंद आवाज असल्याचेही राष्ट्रपती म्हणाल्या. वसाहतवादाविरुद्धच्या लढ्याचा दोन्ही देशांचा इतिहास समान आहे. संयुक्त राष्ट्र, अलिप्ततावादी चळवळ आणि G-20 सारख्या बहुराष्ट्रीय मंचांवरील घनिष्ठ सहकार्याद्वारे, उभय देश केवळ आपल्या नागरिकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण 'ग्लोबल साऊथ'च्या प्रगतीसाठी, शांतता आणि समृद्धीला चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सुमारे 15.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. दोन्ही देशांमधील व्यापाराची क्षमता याहूनही अधिक आहे आणि आपले व्यापारी संबंध अधिक उंचावर नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. दोन्ही देशांतील कंपन्यांना एकमेकांच्या बाजारपेठांमध्ये आपली गुंतवणूक आणि व्यावसायिक उपक्रम वाढवणे शक्य होईल, असे अनुकूल धोरणात्मक वातावरण आपण सातत्याने निर्माण करत राहिले पाहिजे, असे त्यांनी पुढे सांगितले.

भारत आफ्रिकेसोबतच्या आपल्या भागीदारीसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि 'भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद' लवकरात लवकर पुन्हा आयोजित करण्यासाठी आफ्रिकन महासंघ आयोगासोबत काम करेल, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अधिक घनिष्ठ सहकार्य दोन्ही देशांतील जनतेसाठी फायदेशीर ठरू शकते, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
* * *
निलिमा चितळे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268148)
आगंतुक पटल : 15