राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले म्यानमारच्या राष्ट्रपतींचे स्वागत
म्यानमार हे भारतासाठी आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
01 JUN 2026 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (१ जून २०२६) राष्ट्रपती भवन येथे म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग यांचे स्वागत केले.
भारत आणि म्यानमार यांच्यात शतकानुशतके जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक, सुसंस्कृत आणि आध्यात्मिक संबंध आहेत. आपले संबंध हे परस्पर समंजसपणा आणि मैत्रीच्या मजबूत पायावर आधारलेले असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या. म्यानमार हे भारताचे आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार आहे, कारण भारताशी भू-सीमा सामायिक करणारा तो एकमेव आशियाई (ASEAN) देश आहे. भारताच्या "नेबरहूड फर्स्ट"(शेजारी प्रथम), "ॲक्ट ईस्ट" आणि "महासागर" (MAHASAGAR) या धोरणांमध्ये म्यानमार हा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

म्यानमारच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्याबद्दल, राष्ट्रपतींनी अध्यक्ष ह्लाइंग यांचे अभिनंदन केले. उभय देशांमधील द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत म्यानमारच्या नव्या सरकारसोबत जवळून काम करण्यास उत्सुक असल्याचे त्या म्हणाल्या. म्यानमार सरकारच्या प्राधान्यक्रमांना अनुसरून त्यांच्या प्रयत्नांना सर्वतोपरी मदत करण्यास भारत सदैव तत्पर आहे, तसेच, म्यानमारमधील शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच ठाम पाठिंबा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी हा भारत-म्यानमार भागीदारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगून राष्ट्रपतींनी, म्यानमार सरकारच्या सहकार्याने सध्या सुरू असलेले कनेक्टिव्हिटी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त केली.

भारत आणि म्यानमारमधील व्यापार संबंध औषध निर्माण, यंत्रसामग्री आणि कृषी उत्पादने यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तारत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. तथापि, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार अजूनही त्याच्या मूळ क्षमतेपेक्षा कमी असून, तो आणखी वाढवण्यासाठी आपण एकत्र मिळून काम करू शकतो, यावर त्यांनी विशेष भर दिला.
आगामी वर्षांमध्ये भारत आणि म्यानमारमधील मैत्रीचे संबंध अधिकाधिक दृढ होत राहतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
* * *
राधिका अघोर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2267669)
अभ्यागत कक्ष : 8