कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील रायसेन इथून देशव्यापी ‘खेत बचाओ अभियान’चा केला प्रारंभ
रायसेनपासून राष्ट्रापर्यंत: समृद्ध भारतासाठी सुपीक जमीन आणि सक्षम शेतकरी - शिवराज सिंह चौहान यांचे आवाहन
संतुलित खतांचा वापर, मृदा आरोग्य कार्ड आणि शास्त्रीय शेती हे शाश्वत शेतीचे मुख्य सूत्र: शिवराज सिंह चौहान
“शास्त्रज्ञ प्रत्येक गावात पोहोचणार, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार”- कृषीमंत्री
Posted On:
01 JUN 2026 5:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2026
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील रामासिया गावातून देशव्यापी 'खेत बचाओ अभियानाचा' प्रारंभ केला. मातीचे संरक्षण केल्यास शेती अधिक समृद्ध होईल, शेतकरी अधिक सक्षम होतील आणि राष्ट्र समृद्ध होईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिला. खतांचा संतुलित वापर, मृदा परीक्षण, मृदा आरोग्य कार्ड, नैसर्गिक शेती, जलसंधारण आणि शास्त्रीय कृषी पद्धती यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले.

एक जून ते 30 जून या कालावधीत देशभरात चालणाऱ्या महिनाभराच्या मोहिमेचा प्रारंभ करताना चौहान म्हणाले की, भूमी ही आपली माता आहे आणि तिच्या आरोग्याचे रक्षण करणे ही एक सामूहिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर टाळावा आणि त्याऐवजी शास्त्रीय परीक्षणावर आधारित जमिनीच्या प्रत्यक्ष गरजेनुसारच खते वापरावीत असे आवाहन त्यांनी केले. रसायनांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि जमिनीतील लाभदायक सूक्ष्मजीव नष्ट होतात, ज्यामुळे कृषी उत्पादकतेवर थेट परिणाम होतो आणि लागवडीचा खर्च वाढतो, हे देखील त्यांनी अधोरेखित केले.
'खेत बचाओ अभियान' हा पृथ्वी मातेचे रक्षण करण्याचा एक राष्ट्रीय संकल्प आहे, असेही ते म्हणाले. या मोहिमेअंतर्गत, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ञ, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, कृषी विभागाची पथके आणि लोकप्रतिनिधी देशभरातील गावांना भेट देऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करतील. यासोबतच, शेतकऱ्यांना मृदा परीक्षण, संतुलित पोषक व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, आधुनिक पेरणी तंत्र, जलसंधारण आणि प्रगत कृषी पद्धतींबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रत्येक शेतकऱ्याकडे 'मृदा आरोग्य पत्रिका' असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीच्या प्रत्यक्ष गरजेनुसारच खतांचा वापर केला जाऊ शकेल, यावर त्यांनी विशेष भर दिला. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल, उत्पादकता वाढेल आणि दीर्घकाळापर्यंत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांना अनुदानित दरात खते उपलब्ध करून देत असले, तरी यामुळे खतांच्या अतिवापराला प्रोत्साहन मिळता कामा नये, असेही चौहान यांनी स्पष्ट केले. शाश्वत शेती ही खतांच्या वाजवी आणि संतुलित वापरावरच अवलंबून असते, यावर त्यांनी आवर्जून भर दिला.

केंद्रीय मंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाची सांगडही या मोहिमेशी घातली. ते म्हणाले की, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमांशी आणि स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडले जाईल. पात्र महिलांना प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि लघुउद्योग सुरू करण्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्या स्वावलंबी बनू शकतील आणि त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यास मोलाचे योगदान देऊ शकतील.
या मोहिमेअंतर्गत बनावट खते आणि कीटकनाशकांविरोधात जनजागृती निर्माण करण्यावरही लक्ष केंद्रित केले जाईल, स्थानिक कृषी-हवामान परिस्थितीला सर्वात योग्य असणारी पिकांची निवड आणि बियाण्यांचे वाण, योग्य शेती पद्धती, बीजप्रक्रिया पद्धती आणि इतर वैज्ञानिक कृषी पद्धतींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापराबाबतच्या माहितीचाही प्रसार केला जाईल. याशिवाय, या मोहिमेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळवून दिले जातील, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रांचे तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी कुपोषित बालकांना पोषण किट्सचे वाटपही करण्यात आले.
* * *
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2267574)
अभ्यागत कक्ष : 13