संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री यांच्या सहअध्यक्षतेखाली दुसरा भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्री संवाद


सुधारित संरक्षण औद्योगिक सहकार्य आणि भविष्यातील तंत्रज्ञान संशोधनातील सहकार्यावर भर

मुक्त, शांततापूर्ण आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी अधिक बळकट प्रादेशिक सहकार्याचा उभय देशांकडून पुनरुच्चार

Posted On: 01 JUN 2026 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जून 2026

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांनी 1 जून, 2026 रोजी, नवी दिल्लीतील माणेकशा सेंटर येथे 'भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्री पातळीवरील दुसऱ्या संवादाचे सह अध्यक्षपद भूषवले. या दोन्ही मंत्र्यांनी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे स्वागत केले, तसेच 09 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या या संवादाच्या उद्घाटनाच्या पहिल्या आवृत्तीपासून दोन्ही देशांमधील वाढलेला संवाद आणि सहकार्यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

दोन्ही देशांची सामूहिक ताकद वाढवणे, उभय देशांच्या सुरक्षेत मोलाची भर घालणे आणि प्रादेशिक शांतता व सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणे, या उद्देशाने दोन्ही मंत्र्यांनी आपापल्या पंतप्रधानांच्या दूरगामी दृष्टिकोनाला अधिक गती दिली. संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावरील संयुक्त घोषणापत्राचे नूतनीकरण तसेच ते अधिक बळकट करण्याबाबत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी दिलेल्या वचनबद्धतेच्या दिशेने झालेल्या प्रगतीचे या दोन्ही मंत्र्यांनी स्वागत केले.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सागरी सुरक्षा सहकार्यातील प्रगती आणि 'संयुक्त सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याला' अंतिम रूप देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. सागरी गस्ती विमानांच्या माध्यमातून सागरी क्षेत्रातील जागरूकतेविषयीच्या सहकार्यात्मक उपक्रमांना गती देण्यावर आणि पाण्याखालील क्षेत्राविषयी जागरूकतेचा विस्तार करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. याशिवाय, त्यांनी भारतीय तटरक्षक दल आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅरीटाईम बॉर्डर कमांड दरम्यान सहकार्य अधिक वाढवण्यास प्रोत्साहन दिले.

हिंद-प्रशांत क्षेत्र, मुक्त, खुले, शांत, स्थिर आणि समृध्द राखण्यात मदत करण्यासाठी क्षेत्रीय भागीदारांशी सहकार्य वाढवण्याचे महत्त्व दोन्ही मंत्र्यांनी मान्य केले. दोन्ही देशांनी नौवहन आणि हवाई उड्डाणाचे स्वातंत्र्य तसेच त्या क्षेत्रातील कोणताही अडथळा नसलेला व्यापार तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याशी सुसंगत असलेल्या, विशेषतः 1982 चा संयुक्त राष्ट्र सागरी कायदा अधिवेशनाला (युएनसीएलओएस) अनुसरून असलेल्या समुद्राच्या इतर कायदेशीर वापराला त्यांचे जोरदार पाठबळ अधोरेखित केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे हिंदी महासागर रिम संघटनेच्या सागरी सुरक्षा आणि संरक्षण संबंधी कार्य गटाचे सहअध्यक्ष असलेले देश, जून 2026 मध्ये चेन्नई येथील सागरी बचाव समन्वय केंद्र येथे आयोजित शोध आणि बचाव तसेच टेबलटॉप सरावाचे संयुक्तपणे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहेत. दोन्ही देशांनी वर्ष 2020 च्या परस्पर लॉजिस्टिक्स पाठबळ व्यवस्थांच्या आधारावर बेतलेल्या, सराव तसेच मोहिमांसाठी कार्यपद्धतीमधील आंतरपरिचालनात्मकता सुधारण्यासाठी इतर व्यवस्थांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेतले. एकमेकांच्या क्षेत्रांतून विमानांच्या तैनाती सुरु ठेवण्यावर देखील दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

संरक्षण औद्योगिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया, संरक्षण सामग्री आणि संरक्षण सेवांच्या तरतुदीसंदर्भात सामंजस्य करार विकसित करण्यास सुरुवात करतील, अशी घोषणा दोन्ही मंत्र्यांनी केली. त्यांनी संरक्षण औद्योगिक सहकार्य आणि सहभागाच्या धोरणात्मक महत्त्वावर भर दिला, तसेच द्विपक्षीय संरक्षण उद्योग संबंधांमधील प्रगतीचे प्रतीक म्हणून ऑक्टोबर 2025 मध्ये भारतात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या संरक्षण व्यापार शिष्टमंडळाचे आणि ऑस्ट्रेलिया-भारत संरक्षण उद्योग गोलमेज परिषदेचे स्वागत केले. दोन्ही बाजूंनी संरक्षण उद्योग, संशोधन आणि सामग्रीवरील संयुक्त कार्यगटाच्या माध्यमातून देवाणघेवाणीच्या संधी शोधण्यास सहमती दर्शवली.

  

दोन्ही मंत्र्यांनी सेन्सर तंत्रज्ञानासारख्या नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन सहकार्याच्या भविष्यातील संधी शोधण्याबाबत उत्सुकता दर्शवली. यावेळी, ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांनी भारताला ऑस्ट्रेलियन संरक्षण विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन शिखर परिषद -2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.

 

* * *

राधिका अघोर/वैभवी जोशी/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2267542) अभ्यागत कक्ष : 19