ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालांबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोचिंग क्लासेसना ठोठावला 7 लाख रुपयांचा दंड


यशस्वी उमेदवारांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमांच्या स्वरूपाविषयीची महत्त्वाची माहिती खाजगी शिकवणी संस्थेने लपवल्याचे निष्पन्न

Posted On: 30 MAY 2026 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2026

 

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) वजीराम आणि रवी आयएएस स्टडी सेंटर एलएलपी या खाजगी शिकवणी संस्थेविरोधात अंतिम आदेश जारी केला आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे उल्लंघन करत, महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याबद्दल तसेच दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल या संस्थेला 7,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करत त्याला प्रोत्साहन देणे तसेच ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या संदर्भात कोणतीही खोटी अथवा दिशाभूल करणारी जाहिरात केली जाणार नाही,  या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने वजीराम आणि रवी आयएएस स्टडी सेंटर एलएलपी विरुद्ध हा आदेश दिला. या खाजगी शिकवणी संस्थेने केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2023 मधील यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमांबद्दलची महत्त्वाची माहिती लपवली होती आणि यशाचे बनावट खोटे दावे केले होते. यासोबतच या उमेदवारांची नावे, छायाचित्रे आणि यशाचाही वापर करून घेतल्याचे आढळले होते. त्यानंतर प्राधिकरणाने ही कारवाई केली.

मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रम (IGP - Interview Guidance Programme) हा अभ्यासक्रम, संबंधीत उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील पूर्व आणि मुख्य या दोन्ही कठीण टप्प्यांवर स्वतःच्या बळावर यश मिळवल्यानंतरच सुरू होतो ही बाबही केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नमूद केली आहे. मात्र या दोन अत्यंत कठीण स्पर्धात्मक टप्प्यांमध्ये संबंधीत खाजगी शिकवणी संस्थेचे कोणतेही शैक्षणिक योगदान नव्हते. तरीदेखील उमेदवारांनी निवडलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमाचा कोणताही खुलासा न करता, पूर्ण शुल्काच्या व्यापक शिकवणी कार्यक्रमाच्या जाहिरातींमध्ये अशा उमेदवारांचे यश अधोरेखित केले होते. आणि त्याद्वारे हे उमेदवार संस्थेच्या पूर्ण कालावधीच्या शिकवणीमुळे घडले असल्याचा दिशाभूल करणारा आभास संस्थेने निर्माण केला होता असेही प्राधिकरणाने नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि खाजगी शिकवणी क्षेत्रात पारदर्शकता असेल याची खातरजमा करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आत्तापर्यंत, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापारी पद्धतींबद्दल खाजगी शिकवणी संस्थांना 60 पेक्षा जास्त नोटिसाही बजावल्या आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा, आयआयटी-जेईई, नीट, भारतीय रिझर्व्ह बँक आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खाजगी शिकवणीची सेवा देणाऱ्या संस्थांना आतापर्यंत 1.46 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे.

 

* * *

राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2266986) अभ्यागत कक्ष : 29