उपराष्ट्रपती कार्यालय
गोव्याच्या 40 व्या राज्य स्थापना दिनानिमीत्त पणजी इथे झालेल्या सोहळ्यात भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन झाले सहभागी
आपली ओळख आणि प्रगती एकत्र नांदू शकतात याचे गोवा हे उत्तम उदाहरण: उपराष्ट्रपती
गोव्याच्या विकासातील मनोहर पर्रीकर यांच्या चिरंतन योगदानाचे उपराष्ट्रपतींनी केले स्मरण
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे नेतृत्व गोव्याला प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने घेऊन जात आहे : उपराष्ट्रपती
नील अर्थव्यवस्था भारताच्या प्रगतीचा निर्णायक स्तंभ ठरेल आणि यात गोवा आघाडीवर असेल : उपराष्ट्रपती
निवडणुकीनंतर राजकीय मतभेद विसरून सर्वांनी सामूहिक विकासासाठी एकत्र आले पाहिजे : उपराष्ट्रपती
मारिओ मिरांडा यांचे जीवन आणि कार्यावर आधारित प्रदर्शनाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
30 MAY 2026 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2026
गोव्यात पणजी इथे आज गोव्याच्या 40 व्या राज्य स्थापना दिनाचा सोहळा झाला. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे या सोहळ्याला उपस्थिती होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळून चार दशके पूर्ण झाल्याच्या या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या प्रसंगी गोव्यातील जनतेसोबत सहभागी होता येणं हे आपण स्वतःचे भाग्य समजतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. उपराष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरचा हा गोव्याचा आपला पहिलाच अधिकृत दौरा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
30 मे 1987 रोजी गोव्याला भारताचे 25 वे राज्य म्हणून मान्यता देत संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्याच्या घटना ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची होती असे उपराष्ट्रपती म्हणाले. ते क्षण आणि घडामोडी गोव्यातील जनतेची विशिष्ट ओळख, त्यांच्या आकांक्षा आणि लोकशाही भावनेला अधिक बळ देणाऱ्या ठरल्या असे त्यांनी नमूद केले. गोवा हा वारसा आणि प्रगती, परंपरा आणि आधुनिकता तसेच स्थानिकतेचा अभिमान आणि जागतिक दृष्टिकोन अशा त्रिवेणी संगमाच्या आधारावर उभा असल्याचे ते म्हणाले.
शिक्षणाप्रती गोव्यातल्या जनतेची वचनबद्धता, नागरी व्यवस्थेप्रती असलेली जागरूकता आणि सामाजिक सर्वसमावेशकता याची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. इथल्या लोकांमधला उत्साह आणि आदरातिथ्याची भावना गोव्याला खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण बनवते असे ते म्हणाले. साक्षरता, आरोग्य सेवा, पर्यावरणीय जागरूकता आणि मानवी विकास या क्षेत्रांमधील गोव्याची कामगिरी देशासाठी आदर्शवत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी उपराष्ट्रपतींनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहिली. पर्रीकर हे एक द्रष्टे नेते होते असे गौरवोद्गार त्यांनी काढले. पर्रीकर यांचा साधेपणा, त्यांच्यातली नैतिकता आणि निष्ठेने गोव्याच्या प्रगतीवर स्वतःचा अमिट ठसा उमटवला असल्याचे ते म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची प्रशंसाही त्यांनी केली. सावंत यांचे नेतृत्व गोव्याला प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने पुढे नेत असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याने आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अस्मिता जपत पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, पर्यटन आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साध्य केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताच्या लोकशाही परंपरांवरांचा उल्लेखही उपराष्ट्रपतींनी आपल्या संबोधनात केला. लोकशाहीत, विशेषतः निवडणुकांच्या काळात मतभेद आणि राजकीय स्पर्धा असणे स्वाभाविक आहे, मात्र त्याचवेळी निवडणुका संपल्यानंतर देशाच्या विकासासाठी सर्व घटकांनी सहकार्य आणि सामूहिक जबाबदारीच्या भावनेने एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. गोव्यातली बहुआयामी लोकशाही आणि भक्कम सामाजिक संस्थात्मक स्वरुप यातून, लोकसहभाग, संवाद आणि सन्मानाला महत्त्व देणाऱ्या इथल्या समाजाचेच प्रतिबिंब दिसते असे ते म्हणाले.
विकसित भारत 2047 या उद्दीष्टाचा संदर्भ देऊन उपराष्ट्रपती म्हणाले की, भारताच्या भविष्यातील विकासगाथेत गोव्याची भूमिका महत्त्वाची असेल. नील अर्थव्यवस्था भारताच्या प्रगतीचा निर्णायक पाया ठरेल असे निरीक्षण नोंदवून या क्षेत्रात गोवा आघाडीवर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सुशिक्षित लोकसंख्या, उद्योजकता, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची किनारपट्टी आणि जगाशी असलेला संपर्क यामुळे देशाच्या विकासाच्या नव्या टप्प्यावर आणि नवोन्मेष क्षेत्रातील योगदानात गोव्याचे स्थान अनोखे राहिले आहे असे ते म्हणाले.
आपली सांस्कृतिक मूल्ये जपत आधुनिकतेची कास धरण्याचे आणि स्थानिक परंपरांचे जतन करुन जगाला आकर्षित करण्याचे उदाहरण गोव्याने दाखवून दिले आहे. शाश्वत विकासावर भर देताना उपराष्ट्रपती म्हणाले की गोवा राज्य शाश्वत किनारपट्टी विकासाचे राष्ट्रीय स्तरावरील आदर्श उदाहरण ठरू शकते.
गोव्यातील युवा पिढीविषयी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, राज्याचे सर्वात मोठे सामर्थ्य इथल्या युवा पिढीची सर्जनशीलता, मोकळेपणा आणि आत्मविश्वास यामध्ये आहे. उद्योजकता, विज्ञान, कला, क्रीडा, नवोन्मेष आणि नील अर्थव्यवस्था यासारख्या क्षेत्रात युवकांनी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
एकता, समृद्धी, शाश्वतता व सामाजिक सलोखा याप्रती नव्याने वचनबद्ध होऊन नागरिकांनी एकत्र यावे आणि गोवा भविष्यातही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध, आर्थिकदृष्ट्या भक्कम व सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
पणजी येथील कला अकादमीमधील विख्यात व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्या जीवनकार्याला समर्पित प्रदर्शनाचे उद्घाटन या समारंभात उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. मिरांडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काढलेल्या टपाल तिकीटाचे व विशेष पाकिटाचे प्रकाशन त्यांनी केले तसेच “गोवा इंजिनिअरिंग द नेक्स्ट एरा” या कॉफीटेबल पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांनी केले.
यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते गोव्यातील प्रतिष्ठित उत्पादनांचा व सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला, नियुक्तीपत्रे देण्यात आली, गोपाल रत्न पुरस्कार, स्वयंपूर्ण मित्र व स्वयंपूर्ण गावे योजनेच्या पुरस्कारार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच दीन दयाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत सुधारित विमा योजनेचे उद्घाटनही करण्यात आले.
गोव्याचे राज्यपाल पुसपती अशोक गजपथी राजू, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय उर्जा व अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाइक, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गांवकर, राज्यसभेचे खासदार सदानंद तानवडे, गोव्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
* * *
राधिका अघोर/तुषार पवार/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266961)
अभ्यागत कक्ष : 35