कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तैपेई कॅपिटल कप 2026 मध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी, उदयोन्मुख आणि उद्योग-आधारित कौशल्यांमध्ये दोन रौप्य पदके आणि तीन गुणवत्ता पुरस्कार पटकावले


15 देशांतील स्पर्धकांविरुद्ध युवा भारतीय कौशल्य विजेत्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन

Posted On: 29 MAY 2026 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2026

26 ते 28 मे 2026 दरम्यान तैवानमधील तैपेई येथे आयोजित प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा, तैपेई कॅपिटल कप 2026 मध्ये भारतीय संघाने विविध कौशल्य श्रेणींमध्ये दोन रौप्य पदके आणि तीन गुणवत्ता पुरस्कार मिळवून देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. युरोप, आशिया, अमेरिका आणि ओशनियामधील 15 देशांतील जगातील काही सर्वोत्कृष्ट युवा कुशल व्यावसायिकांचा मुकाबला करताना भारतीय संघाने असामान्य  तांत्रिक उत्कृष्टता दाखवून दिली, ज्यामुळे जागतिक कौशल्य महासत्ता म्हणून भारताची वाढती प्रतिष्ठा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

पाच अत्यंत स्पर्धात्मक अशा कौशल्य श्रेणींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना स्पर्धकांनी उदयोन्मुख आणि उद्योग-संबंधित क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखवले, जे भारताच्या कौशल्य विकास परिसंस्थेची ताकद आणि भविष्यासाठी सज्ज प्रतिभा जोपासण्याची वचनबद्धता दर्शवते.

या तुकडीला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एम एस डी ई) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन एस डी सी) यांचे सहाय्य लाभले जे भारतातील तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, औद्योगिक अनुभव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलनात्मक मूल्यमापनाची  संधी सातत्याने देत आहेत.

तैपेई कॅपिटल कप 2026 मधील भारतीय संघाच्या कामगिरीमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

· मुस्कान – चित्रकला आणि सजावट प्रकारात रौप्य पदक

· अर्जुन सुमती विजयभास्कर – मोबाईल ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट प्रकारात रौप्य पदक

· मोहम्मद मफाझ पूनाईकन्नन राबी अहमद – सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंटमधील गुणवत्ता पुरस्कार

·सुरेश कुमार गणेशन मीणा – डिजिटल कन्स्ट्रक्शनमधील गुणवत्ता पुरस्कार

·एमडी सेराज – ऑटोमोबाईल तंत्रज्ञानामधील गुणवत्ता पुरस्कार

रौप्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 8,000 तैवान डॉलर्सचे रोख पारितोषिक मिळाले, तर गुणवत्ता पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी 5,000 तैवान डॉलर्स प्रदान करण्यात आले.

विजेत्यांचे अभिनंदन करताना भारत सरकारचे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी म्हणाले: "तैपेई कॅपिटल कप 2026 मधील टीम इंडियाची कामगिरी ही भारताच्या युवा पिढीचा आत्मविश्वास, क्षमता आणि दृढनिश्चय यांचे अभिमानास्पद प्रतिबिंब आहे. जगभरातील काही सर्वोत्तम प्रतिभावंतांशी स्पर्धा करून, आमच्या विजेत्यांनी हे दाखवून दिले आहे की भारतीय कौशल्ये जागतिक मानकांच्या बरोबरीने उभी राहू शकतात. पदकांपलीकडे जाऊन, अशा स्पर्धा अमूल्य प्रशिक्षण मैदान म्हणून काम करतात, ज्यामुळे आपल्या स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय मानकांचा अनुभव मिळतो आणि वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 सह भविष्यातील मोठ्या आव्हानांसाठी ते तयार होतात. असे प्रत्येक यश जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्याचा आमचा निर्धार अधिक दृढ करते आणि कुशल व सक्षम युवा पिढीद्वारे समर्थित 'विकसित भारत' या आमच्या संकल्पनेला पुढे नेते.”

तैपेई कॅपिटल कप 2026 मधील भारतीय संघाचे यश हे, कुशल प्रतिभेचे जागतिक केंद्र बनण्याच्या भारताच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266875) अभ्यागत कक्ष : 9