शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली सीबीएसईच्या मुख्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक


विद्यार्थ्यांच्या हिताला केंद्र सरकारचे प्राधान्य, सर्व समस्या सोडवल्या जातील - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 28 MAY 2026 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2026

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथील सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्यालयात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षांचे मूल्यमापन आणि निकालानंतरच्या प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांसंबंधी उच्चस्तरीय आढावा बैठक झाली.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग, भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या मद्रास संकुलाचे संचालक प्राध्यापक व्ही. कामाकोटी, भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कानपूर संकुलाचे संचालक, शिक्षण मंत्रालय तसेच केंद्रीय विद्यालय संघटनेचे वरिष्ठ अधिकारी, यासोबतच एसबीआय, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे वेळेत, पारदर्शक पद्धतीने आणि विद्यार्थ्यांना अनुकूल स्वरुपात निवारण केले जाईल याची सुनिश्चिती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. परीक्षांशी संबंधित यंत्रणा पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थी केंद्रित असेल याची सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. यासोबतच योग्य असलेल्या सर्व तक्रारींचे प्रभावीपणे आणि जलद गतीने निवारण केले जाईल असे आश्वासनही त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिले.

विद्यार्थ्यांना सहाय्य आणि मदत पुरवणाऱ्या व्यवस्थेला बळकटी देणे, मूल्यमापन आणि देखरेख विषयक आराखड्यात सुधारणा करणे, सीबीएसईचे डिजिटल व्यासपीठ अधिक सक्षम करणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक सेवा अधिक सक्षम स्वरुपात तसेच सुलभरितीने उपलब्ध असाव्यात यावर त्यांनी भर दिला.
या वर्षी इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुमारे 18 लाख विद्यार्थी बसले होते. तर परीक्षा प्रक्रियेत सुमारे 98 लाख उत्तरपत्रिका आणि जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचा अंतर्भाव होता, अशी माहिती प्रधान यांना या बैठकी दरम्यान दिली गेली. आतापर्यंत अंदाजे चार लाख विद्यार्थ्यांनी पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 11 लाख स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका पाहिल्या असल्याचेही त्यांना सांगितले  गेले.

विद्यार्थ्यांचे हित हेच केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रधान यांनी अधोरेखित केले.  कोणत्याही त्रुटींबाबत कठोर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यासोबतच व्यवस्थेच्या आतील किंवा बाहेरील कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली.

निकालानंतरच्या सेवां संबंधित पोर्टलवरील लॉगिन विषयक समस्या, सर्व्हरवर येणारा ताण  आणि पेमेंटशी संबंधित अडचणींबाबतच्या तक्रारींच्या मुद्यावरही प्रधान यांनी चर्चा केली.

विद्यार्थ्यांना अविरत आणि सुरळीतपणे सेवा मिळत राहतील याची सुनिश्चिती करण्यासाठी पोर्टलचे स्थैर्य, सर्व्हरची क्षमता, लॉगिन विषयक व्यवस्थापन आणि पेमेंट गेटवेच्या एकात्मिकरणाचा आढावा घेण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या मद्रास संकुलाकडे सोपण्यात आली आहे. याअंतर्गत संस्थेतील प्राध्यापक आणि डिजिटल प्रणाली व्यवस्थेच्या तज्ञांचा समावेश असलेली तज्ञांची तांत्रिक समिती या आढाव्याची जबाबदारी पार पाडणार आहे.

शिक्षण मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2266437) अभ्यागत कक्ष : 9