कृषी मंत्रालय
केंद्रातर्फे खरीप हंगामाच्या तयारीला वेग; केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भातील पत्रकार परिषदेला संबोधित केले
भारताने 376 दशलक्ष टन इतक्या अन्नधान्याचे ऐतिहासिक उत्पादन केले: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला : केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
Posted On:
28 MAY 2026 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज खरीप परिषद-2026 च्या संदर्भात नवी दिल्ली येथे पुसा परिसरात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले. परिषदेदरम्यान माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की देशाच्या अन्न सुरक्षेची सुनिश्चिती करून घेणे, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि नागरिकांना पोषक अन्नधान्य पुरवणे याला केंद्र सरकार नेहमीच प्राधान्य देत आले आहे.
केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कृषी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. नवी दिल्ली येथील पुसा परिसरात एनएएससी संकुलात 28 आणि 29 मे 2026 या कालावधीत राष्ट्रीय खरीप अभियान-2026 वर आधारलेल्या दोन दिवसीय कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या दोन दिवसांच्या कालावधीत आगामी खरीप हंगामासाठी सुरु असलेल्या तयारीबाबत तपशीलवार चर्चा आणि आढावे घेण्यात येतील.

केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले की, भारताला लाभलेली विशाल भौगोलिक आणि हवामानविषयक विविधता लक्षात घेऊन सरकारने सल्ला प्रक्रिया राष्ट्रीय कृषी परिषदेच्या कक्षेबाहेर विस्तारली आहे आणि आता प्रादेशिक परिषदांचे आयोजन करायला देखील सुरुवात केली आहे.
कृषी क्षेत्राची कामगिरी अधोरेखित करत केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की भारताने या वर्षी अन्नधान्य उत्पादनाचे आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. केंद्रीय मंत्री म्हणाले की वर्ष 2025-26 मध्ये भारताचे एकूण अंदाजित अन्नधान्य उत्पादन 376.563 दशलक्ष टन आहे आणि हे प्रमाण गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा सुमारे 18.8 दशलक्ष टनांनी जास्त आहे. भारताने तांदूळ उत्पादनात देखील एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. “देशातील तांदूळ उत्पादन 154.024 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे आणि आपला देश आता चीनला मागे टाकत तांदूळ उत्पादन करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश झाला आहे,” ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील गहू उत्पादन 120.657 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले असून, मका उत्पादनाने 55.092 दशलक्ष टनांची पातळी गाठली आहे आणि या दोन्ही उत्पादनांनी विक्रमी पातळी गाठली आहे.

शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले की, देशाने तेलबियांच्या उत्पादनात देखील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.यावर्षी देशात तेलबियांचे उत्पादन 43.059 दशलक्ष टन राहील असा अंदाज आहे. भुईमुग उत्पादन 13.074 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की डाळींच्या उत्पादनाने देखील वाढ नोंदवली असून येत्या काही वर्षांत डाळींच्या उत्पादनात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
चौहान म्हणाले की देशातील फलोत्पादन क्षेत्राची जलदगतीने वाढ होत आहे आणि या क्षेत्रात अमर्याद क्षमता आहे.
याप्रसंगी बोलताना, शेतकऱ्यांना केवळ पीक उत्पादनासाठीच नव्हे तर कापणी-पश्चात व्यवस्थापन आणि जोखमीपासून संरक्षण यांसाठी देखील पाठबळ गरजेचे आहे असे सांगत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रासाठी पुरेसा वित्तपुरवठा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266395)
अभ्यागत कक्ष : 12