कृषी मंत्रालय
तिसऱ्या अग्रिम अंदाजांमधून देशाच्या कृषी क्षेत्राचे सामर्थ्य दिसून येते, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विक्रमी पीक अंदाजाला दिली मंजुरी
देशात आतापर्यंतच्या सर्वोच्च अन्नधान्य उत्पादनाची नोंद, शिवराज सिंह चौहान यांनी केले शेतकऱ्यांचे अभिनंदन
देशातील 376.56 दशलक्ष टन इतके विक्रमी अन्नधान्य उत्पादन होण्याचा अंदाज असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली माहिती
Posted On:
27 MAY 2026 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2026
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज 2025-26 या वर्षासाठी प्रमुख कृषी पिकांच्या उत्पादनाचे तिसरे अग्रिम अंदाज जारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांची समृद्धी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, त्याचाच सकारात्मक परिणाम आज विक्रमी कृषी उत्पादनाच्या स्वरूपात दिसून येत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

तिसऱ्या अग्रिम अंदाजांनुसार, देशातले एकूण अन्नधान्य उत्पादन 376.563 दशलक्ष टन इतके असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या 357.732 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत सुमारे 18.8 दशलक्ष टन म्हणजेच 5.3% ने जास्त आहे. देशाच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वोच्च अन्नधान्य उत्पादन ठरले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल चौहान यांनी देशभरातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
हे तिसरे अग्रिम अंदाज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. या अंदाजातून देशाच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीचे एक भक्कम आणि उत्साहवर्धक चित्र दिसून येते. यानिमित्ताने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पिकांनुसार संक्षिप्त माहिती सामायिक केली. तांदळाचे 154.024 दशलक्ष टन इतके विक्रमी उत्पादन, गव्हाचे 120.657 दशलक्ष टन इतके उत्पादन आणि मक्याचे 55.093 दशलक्ष टन इतके विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज त्यांनी मांडला. श्री अन्न वर्गवारीतील पिकांचे उत्पादन 17.584 दशलक्ष टन, तुरीचे उत्पादन 3.592 दशलक्ष टन, हरभऱ्याचे उत्पादन 12.514 दशलक्ष टन आणि मसुरचे उत्पादन 1.762 दशलक्ष टन होईल असा अंदाजही त्यांनी मांडला.
त्याचप्रमाणे तेलबियांचे एकूण उत्पादन 43.059 दशलक्ष टन होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी पिकांनुसार सविस्तर आकडेवारीही मांडली. तांदळाच्या बाबतीत 3.84 दशलक्ष टनांची वाढ नोंदवली गेली असून, 2024-25 मध्ये झालेल्या 150.184 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा 154.024 दशलक्ष टन इतके उत्पादन अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. गव्हाचे उत्पादनही 120.657 दशलक्ष टन होण्याचा अंदाज असून, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या 117.945 दशलक्ष टनांच्या तुलनेत 2.712 दशलक्ष टनाने जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
डाळ पिकांअंतर्गत तुरीचे उत्पादन 3.592 दशलक्ष टन होण्याचा अंदाज असून, हे प्रमाण जवळपास गेल्या वर्षीच्या 3.624 दशलक्ष टन इतक्या उत्पादनाएवढे असेल.
नगदी पिकांअंतर्गत ऊसाचे उत्पादन 500.063 दशलक्ष टन इतके राहण्याचा अंदाज असून, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या 454.611 दशलक्ष टनांच्या उत्पादनापेक्षा 45.452 दशलक्ष टनाने जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली. तर कापसाचे उत्पादन 29.024 दशलक्ष गाठी ( प्रति गाठीचे वजन 170 किलो) असेल असा अंदाज त्यांनी मांडला. यासोबतच तागाचे उत्पादन 9.176 दशलक्ष गाठी (प्रति गाठ 180 किलो वजन) असण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
या तिसऱ्या अग्रिम अंदाजांमधून, देशातील अन्नधान्य, प्रमुख तृणधान्ये, तेलबिया आणि नगदी पिकांची उत्पादन स्थिती अत्यंत मजबूत असल्याचे ठळकपणे दिसून येत असल्याची बाब शिवराज सिंह चौहान यांनी अधोरेखित केली. यांपैकी अनेक पिके उत्पादनाची विक्रमी पातळी गाठतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि त्यांच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कृषी संशोधनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याची बाबही चौहान यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2266092)
अभ्यागत कक्ष : 14