वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीयूष गोयल यांच्यासोबत ओटावा येथे झालेल्या उच्चस्तरीय चर्चेत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारत-कॅनडा सीईपीएचे 'गेम चेंजर'असे वर्णन केले


सीईपीएविषयक चर्चेला चालना देण्यासाठी तसेच द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाने कॅनडाला दिली भेट

अन्न सुरक्षा आणि कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी पीयूष गोयल यांनी कॅनडाचे कृषी मंत्री हीथ मॅकडोनाल्ड यांच्याशी केली चर्चा

Posted On: 26 MAY 2026 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2026

भारत-कॅनडा आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल कॅनडाला भेट देणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचे नेतृत्व करत कॅनडातील ओटावा येथे दाखल झाले. 100 हून अधिक कंपन्यांमधील उद्योगपतींचा यात समावेश आहे. 25 मे रोजी ओटावा आणि 26-27 मे रोजी टोरंटो भेट समाविष्ट असलेल्या  या तीन दिवसीय कॅनडा दौऱ्याचा उद्देश भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांना अधिक चालना देणे हा आहे, ज्यामध्ये भारत-कॅनडा सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारासाठी (सीईपीए) सुरू असलेल्या वाटाघाटींना गती देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

ओटावा येथे दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गोयल यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, कृषी आणि धोरणात्मक  क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी कॅनडाचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांसोबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या.

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भेटीदरम्यान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आणि भारत-कॅनडा सीईपीए लवकरच पूर्ण होण्याबाबत आशावाद व्यक्त केला.

भारतासोबतचा प्रस्तावित मुक्त व्यापार करार हा एक क्रांतिकारक  बदल घडवणारा करार ठरणार असून त्याद्वारे एक नवी मोठी बाजारपेठ खुली होईल यावर पंतप्रधान कार्नी यांनी भर दिला. दोन्ही बाजूंनी यावेळी एका संतुलित, व्यावसायिक दृष्टीकोनातून अर्थपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. आर्थिक भागीदारी मजबूत करणाऱ्या व दोन्ही देशांतील व्यवसायांना आणि नागरिकांना वास्तव लाभ मिळवून देणाऱ्या कराराच्या दिशेने काम करण्याचे निर्देश दोन्ही बाजूंनी आपापल्या संबंधित चमूंना दिले.

गोयल यांनी भारत-कॅनडा सीईपीए वाटाघाटींना पुढे नेण्याबाबत कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मणिंदर सिद्धू यांच्याबरोबरही धोरणात्मक द्विपक्षीय चर्चा केली.  

प्रस्तावित सीईपीए कराराद्वारे आर्थिक भागीदारी मजबूत होऊन दोन्ही देशांतील व्यवसाय व नागरिकांना वास्तव लाभ मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे द्विपक्षीय आर्थिक संबंध त्यांच्या पूर्ण क्षमतेने  दृढ होतील.

कॅनडाचे कृषी आणि अन्न मंत्री हीथ मॅकडोनाल्ड यांच्यासोबत झालेल्या यशस्वी बैठकीत, अन्न सुरक्षा, शाश्वतता  आणि कृषी-तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आणि कृषी क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी अन्न प्रक्रिया क्षेत्रात सहकार्याच्या महत्त्वपूर्ण संधींचा उहापोह केला. हे सहकार्य भारतीय शेतकरी आणि शेती उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असून दोन्ही देशांमधील व्यापक कृषी एकात्मतेला हातभार लावेल, यावर भर देण्यात आला.

गोयल यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्यासोबतही सविस्तर चर्चा केली आणि भारत-कॅनडा धोरणात्मक  भागीदारीसाठी व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान विषयांच्या महत्त्वावर यावेळी भर दिला गेला. मंत्र्यांनी यावेळी भारतातील पायाभूत सुविधांचा विकास, नवीकरणीय ऊर्जा, मालवाहतूक, डिजिटल पायाभूत सुविधा आणि ग्राहक क्षेत्रे ही दीर्घकालीन कॅनेडियन गुंतवणुकीसाठी अधिक सहकार्य आणि महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देतात हे अधोरेखित केले. दोन्ही बाजूंनी आर्थिक आणि धोरणात्मक  परिप्रेक्षामध्ये द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

मंत्रीस्तरावरील वचनबद्धता, प्राधान्य क्षेत्रात  ठोस व्यावसायिक भागीदारीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी 26-27 मे पासून, गोयल टोरोंटोमध्ये औद्योगिक चर्चासत्रे आणि बीटूबी चर्चेच्या विविध कार्यक्रमामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2265556) अभ्यागत कक्ष : 7