सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
जीवन ऍप आणि शतायू ज्येष्ठ नागरिक सेवा परिचर डॅशबोर्डचे अनावरण
Posted On:
22 MAY 2026 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2026
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन (संयुक्त ज्येष्ठ सक्षमीकरण आणि आभासी सहाय्य नेटवर्क) हे मोबाईल ऍप तसेच शतायू (ज्येष्ठांसाठी सर्वसमावेशक सेवा सहाय्य आणि प्रशिक्षण) ज्येष्ठ नागरिक सेवा डॅशबोर्ड सुरू केला आहे.
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, काळजी, सन्मान आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्याबरोबरच तंत्रज्ञानाधारित सेवा सहाय्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक सेवा परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी आज जीवन (संयुक्त ज्येष्ठ सक्षमीकरण आणि आभासी सहाय्य नेटवर्क) या मोबाईल ऍपचे लोकार्पण केले. भारतातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, कल्याण, आरोग्यसेवा उपलब्धता आणि सामाजिक समावेशन वाढविण्यासाठी हे विशेष डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे.
या ऍपमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि समस्यांचा विचार करून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये शासकीय योजना आणि कल्याणकारी कार्यक्रमांची माहिती, आपत्कालीन मदत व सहाय्य सेवा तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या सहाय्याने चालविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक निवारागृहांची माहिती देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे व्यासपीठ वापरण्यास सुलभ स्वरूपात विकसित करण्यात आले असून, त्यामध्ये सोपी दिशादर्शन प्रणाली आणि सुलभता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सक्षम काळजी अर्थव्यवस्थेची निर्मिती या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेदरम्यान देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा सहाय्य व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या शतायू या डॅशबोर्डचेही लोकार्पण करण्यात आले. या डॅशबोर्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांना संबंधित जिल्हा आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा परिचर उपलब्धते विषयी माहिती मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. सुलभ वापर आणि प्रभावी सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी हे व्यासपीठ सोप्या कार्यप्रणालीसह आणि वापरकर्त्यास अनुकूल अशा स्वरूपात विकसित करण्यात आले आहे.
* * *
शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2264201)
अभ्यागत कक्ष : 18