पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची घेतली भेट

Posted On: 20 MAY 2026 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची आज म्हणजे -20 मे 2026 रोजी रोम इथे भेट घेतली. उभय  पंतप्रधानांनी यावेळी द्विपक्षीय सहकार्यामध्ये उच्चस्तरीय आदान प्रदान तसेच उत्तम वृद्धी आणि वैविध्य याला मिळालेल्या गतीचे स्वागत केले. 

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भारत - इटली यांच्यातील धोरणात्मक भागीदारी ही आता विशेष धोरणात्मक भागीदारी पर्यंत उंचाविण्‍याविषयी निर्णय झाला. तसेच यावेळी , नेत्यांच्या वार्षिक बैठका घेण्यावरही सहमती झाली. यामध्‍ये  नियमित बहुपक्षीय कार्यक्रमांच्या दरम्यान होणाऱ्या बैठका तसेच संस्थात्मक पातळीवरील बैठकांचा समावेश आहे. 

दोन्ही नेत्यांनी भारत -इटली भागीदारीच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारी सर्वसमावेशक चर्चा यावेळी केली. तेच संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025 - 2029 अनुसार सर्व क्षेत्रामधील द्विपक्षीय संबंधाचा आढावाही घेण्यात आला. 

उभय नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष, अवकाश, ऊर्जा, कृत्रिम प्रज्ञा आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती तसेच लोकांमधील संबंध या क्षेत्रांतील सहकार्य अधिक विस्तारण्यावर सहमती दर्शवली.

संयुक्त धोरणात्मक कृती आराखड्याचा नियमित आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री स्तरावरील यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आर्थिक आणि  व्यापारी संबंधांना मिळालेल्या नव्या गतीची, वाढत्या गुंतवणुकीची आणि दीर्घकालीन सहकार्य उभारण्याच्या प्रयत्नांची दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षी तीन व्यावसायिक मंचांच्या देवाणघेवाणीचे त्यांनी स्वागत केले. संरक्षण, डिजिटल, ऊर्जा संक्रमण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निवडक इटालियन आणि भारतीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. 2029 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज युरोपर्यंत वाढवण्याच्या सामायिक उद्दिष्टाची नोंद घेत, दोन्ही नेत्यांनी भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारातील  संधींचा लाभ घेण्यावर सहमती दर्शवली आणि त्याची लवकर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

मंत्रीस्तरीय तसंच अधिकृत स्तरावरील संवाद, बंदर भेटींची देवाणघेवाण आणि संरक्षण दलांमधील नियमित सहभाग यांद्वारे संरक्षण सहकार्य अधिक दृढ होत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. संरक्षण उत्पादनांच्या संयुक्त संकल्पना, संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी सहकार्य वाढविणाऱ्या औद्योगिक पथदर्शी प्रकल्पासंदर्भातील संयुक्त हेतू घोषणापत्रावर स्वाक्षरी झाल्याचे त्यांनी स्वागत केले.

उभय नेत्यांनी दोन्ही देशांतील संशोधक आणि वैज्ञानिक संस्थांमधील वाढत्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी इटालियन स्पेस एजन्सी (इटलीची अंतराळ संस्था) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याचे, तसेच व्यावसायिक अंतराळ सहकार्य मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांचे स्वागत केले. भारताचे प्रतिभावान मनुष्यबळ  आणि इटलीचे तांत्रिक कौशल्य यांचा मेळ घालत, कृत्रिम प्रज्ञा (एआय), अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर्स), महत्त्वपूर्ण खनिजे आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याचे, त्यांनी आवाहन केले.

दहशतवादाच्या समस्येचा मुकाबला करण्याच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्तरावर सहकार्य सुरू ठेवण्याचे मान्य केले. नोव्हेंबर 2025 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या 'दहशतवादाला होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याचे आव्हान पेलण्‍यासाठी  घेण्‍यात आलेल्या  संयुक्त पुढाकाराच्या' अंमलबजावणीवर त्यांनी समाधान व्यक्त केले.

दोन्ही नेत्यांनी इटलीतील भारतीय समुदायाच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला आणि विद्यार्थी, संशोधक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींच्या गतिशीलतेला (परस्परांच्या देशात येणेजाणे) चालना देण्याचे मान्य केले. त्यांनी 2027 हे वर्ष "भारत आणि इटली दरम्यानचे संस्कृती आणि पर्यटन वर्ष" म्हणून साजरे करण्याचे मान्य केले. गुजरात मध्ये लोथल येथे 'राष्ट्रीय सागरी वारसा संकुल'  विकसित करण्याच्या सहकार्याबाबत आणि भारतातून परिचारिकांच्या भर्तीबाबत भारत आणि इटली दरम्यान झालेल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

दोन्ही नेत्यांनी ठोस प्रकल्पांच्या माध्यमातून दळणवळण-संपर्क विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आणि आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील घडामोडी, भारत-युरोपिय संघ (ई यू) संबंध आणि पश्चिम आशिया तसेच युरोपमधील संघर्ष यासह परस्पर हितसंबंधांच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही विचार विनिमय केला. विद्यमान संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या महत्त्वावर भर दिला.

इटालियन प्रजासत्ताकचे सरकार आणि तेथील जनतेने केलेल्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी पंतप्रधान मेलोनी यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्परांना सोयीच्या ठरणा-या तारखा लक्षात घेवून भारत भेटीवर येण्याचे आमंत्रण पंतप्रधान मेलोनी यांना, यावेळी  दिले.

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2263458) अभ्यागत कक्ष : 23