पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींविषयी आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद
देशातील खतांची एकंदर साठवण स्थिती समाधानकारक आहे; प्रमुख खतांच्या कमाल किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल नाही
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मे तसेच जून महिन्यात भारतीय बंदरांवर सुमारे 13.5 लाख टन डीएपी आणि 7 लाख टन एनपीके पोहोचेल याची सुनिश्चिती करण्यात आली आहे
Posted On:
18 MAY 2026 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2026
पश्चिम आशियामध्ये सतत बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना नियमितपणे अद्ययावत माहिती देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
खतांच्या साठ्याची स्थिती आणि उपलब्धता
- देशातील खतांच्या साठ्याची स्थिती समाधानकारक आहे.
- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने खरीप हंगाम 2026 साठी 390.54 लाख टन खतांची गरज आहे असे मूल्यांकन केले आहे. सध्या देशात सुमारे 200.98 लाख मेट्रिक टन (51% पेक्षा जास्त) खतांचा साठा असून तो नेहमीच्या 33% च्या पातळीपेक्षा लक्षणीयरित्या अधिक आहे. यातून सरकारने केलेले सुधारित नियोजन, आगाऊ स्वरुपाची साठवण आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्स व्यवस्थापन यांचे दर्शन घडते.
- प्रमुख खतांच्या एमआरपीमध्ये कोणताही बदल नाही.
- संकटानंतर खतांचे देशांतर्गत उत्पादन आणि आयात;- (लाख टनांमध्ये)
|
उत्पादन
|
संकटानंतर देशांतर्गत उत्पादन |
संकटानंतर भारतीय बंदरांमध्ये पोहोचलेली आयात खते |
| युरिया |
52.1
|
13.29
|
| डीएपी |
7.03
|
0.88
|
| एनपीके |
17.33
|
4.09
|
| एसएसपी |
9.76
|
0
|
| एमओपी |
0
|
3.49
|
| एकूण |
86.2
|
21.8
|
- गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या 93 लाख टन खतांच्या देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत आता संकटानंतर 86.2 लाख टन खतांचे उत्पादन झाले आहे. संकटाच्या स्थितीनंतर उपलब्धतेमध्ये सुमारे 108 लाख टन खतांची भर पडली आहे.
- भारताने मे आणि जून महिन्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय बंदरांवर येऊ घातलेल्या जहाजांतून 13.5 लाख टन डीएपी आणि 7 लाख टन एनपीके पोहोचेल याची सुनिश्चिती केली आहे.
- टीएसपी आणि अमोनियम सल्फेट साठी जागतिक निविदा - भारतीय खत उत्पादक कंपन्यांनी 4 लाख टन टीएसपी आणि 3 लाख टन अमोनियम सल्फेटच्या खरेदीसाठी एकत्रित जागतिक निविदा जारी केली आहे आणि सध्या ती प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. यामुळे ऐन हंगामात या खतांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होण्यासाठी मदत होईल.
- अमोनिया आणि सल्फरसाठी जागतिक निविदा - भारतीय खत उत्पादक कंपन्यांनी 5.36 लाख टन अमोनिया आणि 5.94 लाख टन सल्फरच्या खरेदीसाठी एकत्रित जागतिक निविदा जारी केली आहे. यामुळे ऐन हंगामात या खतांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होण्यासाठी मदत होईल.
- खत विभागाच्या वतीने युरिया आणि पी अँड के (P&K - Phosphorus and Potassium) सारख्या खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठांच्या उपलब्धतेचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे.
- कंपन्यांनी सादर केलेल्या अनुदानाच्या सर्व बिलांची देयके रक्कम खत विभागाकडून साप्ताहिक तत्त्वावर नियमितपणे अदा केली जात आहे.
- देशात सर्व प्रमुख खतांची उपलब्धता सातत्याने गरजेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे देशाची खत सुरक्षा विषयक स्थिती मजबूत, स्थिर आणि सुव्यवस्थित आहे.
ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता
अंमलबजावणी आणि देखरेखविषयक कार्यवाही
- एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणीत्मक स्वरुपाच्या कारवाया सुरूच आहेत. याअंतर्गत मागील 4 दिवसांत देशभरात 6950 पेक्षा जास्त छापे टाकण्यात आले आहेत.
- सुरळीत पुरवठा होत राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी तसेच साठेबाजी अथवा काळ्याबाजाराशी संबंधित प्रकरणे उघडकीला आणण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मागील 4 दिवसांत देशभरातील सुमारे 2800 किरकोळ विक्री केंद्रे आणि एलपीजी वितरकांच्या ठिकाणी विना सूचना तपासण्या केल्या आहेत.
एलपीजी पुरवठा
घरगुती वापराच्या एलपीजी पुरवठ्याची सद्यस्थिती:
- संपूर्ण उद्योग क्षेत्राच्या पातळीवर एलपीजी सिलिंडरसाठी ऑनलाईन पद्धतीने मागणीपर नोंदणी करण्याचे प्रमाण वाढून सुमारे 99% वर पोहोचले आहे.
- मागील 4 दिवसांत एलपीजी सिलिंडरसाठी झालेल्या 1.69 कोटी इतक्या मागणीपर नोंदणीच्या तुलनेत सुमारे 1.72 कोटी इतके एलपीजी सिलिंडर प्रत्यक्षात वितरीत केले गेले आहेत.
व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीचा पुरवठा आणि वाटप विषयक उपाययोजना:
- मे 2026 पासून आतापर्यंत एकूण 1,08,753 मेट्रिक टन इतक्या व्यावसायिक वापराच्या एलपीजीची विक्री झाली आहे.
- गेल्या 4 दिवसांत एकूण 25,204 मेट्रिक टन इतक्या व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली आहे.
सागरी सुरक्षा आणि सागरी मालवाहतूक विषयक कार्यवाही
या संदर्भात खाली नमूद माहिती दिली गेली आहे :
- जहाजांबाबतची सद्यस्थिती: मार्शल आयलंडचा ध्वज असलेल्या सायमी (SYMI) या एलपीजी वाहक जहाजाने 13 मे 2026 रोजी हॉरमुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली होती. हे जहाज भारतासाठीचा 19,965 मेट्रिक टन इतका एलपीजीचा साठा आणि 21 परदेशी कर्मचारी घेऊन 16 मे 2026 रोजी उशिरा रात्री कांडला बंदरात पोहोचले. या जहाजावरील संपूर्ण साठा उतरवण्याचे काम आता पूर्ण झाले आहे.
- संघर्षग्रस्त क्षेत्रातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असून, गेल्या 96 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी किंवा भारतीय कर्मचारी असलेल्या परदेशी जहाजांशी संबंधित कोणत्याही अनूचित घटनेची नोंद झालेली नाही.
- जहाजबांधणी महासंचालनालयाच्या वतीने नियंत्रण कक्ष सुरू केल्यापासून, या कक्षाने आतापर्यंत 9,702 दूरध्वनी कॉल आणि 21,312 पेक्षा जास्त ईमेल हाताळले आहेत. गेल्या 96 तासांत खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि सागरी क्षेत्राशी संबंधित भागधारकांकडून एकूण 436 दूरध्वनी कॉल आणि 996 ईमेल प्राप्त झाले आहेत.
- मंत्रालयाने, नौवहन महासंचालनालयाच्या (डीजी शिपिंग) माध्यमातून, आतापर्यंत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून 3,217 हून अधिक भारतीय खलाशांच्या सुरक्षितपणे मायदेशी परतण्यासाठी सहाय्य केले असून, त्यामध्ये गेल्या 96 तासांत माघारी परतलेल्या 61 खलाशांचा समावेश आहे.
पश्चिम आशियातील भारतीय नागरिकांची सुरक्षा
यासंदर्भात देण्यात आलेली माहिती:
- भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून विचारण्यात येणारे प्रश्न, चौकशी यांचे निराकरण करण्यासाठी मंत्रालयाचा विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.
- स्थानिक शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना, विमान आणि प्रवासाची परिस्थिती, कायदेविषयक सल्ला सेवा आणि समुदायासाठी हाती घेण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजना यांसंबंधीच्या माहितीसह खबरदारीचे उपाय जारी करण्यात येत आहेत.
- सरकारकडून त्या भागातील भारतीय खलाशांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.
- या भागातून भारतात विविध ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिरिक्त विमान उड्डाणे सुरू असल्याने, विमान वाहतुकीची एकंदर स्थिती सातत्याने सुधारत आहे.
- संयुक्त अरब अमिरातींची हवाई हद्द खुली आहे. भारतीय आणि युएईच्या विमान कंपन्या युएईमधून भारतात विविध ठिकाणी विमान उड्डाणांचे परिचालन करत आहेत.
- सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणी जाणाऱ्या विमानांची उड्डाणे सुरळितपणे सुरू आहेत.
- कतारची हवाई हद्द अंशतः खुली आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि कतार एअरवेज कतारहून भारतात विविध ठिकाणी विमाने चालवत आहेत.
- कुवेतची हवाई हद्द खुली आहे. जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेजद्वारे कुवेतमधून भारतात येण्यासाठी विमान उड्डाणे सुरू आहेत.
- बहरीनचे हवाई क्षेत्र खुले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि गल्फ एअर बहरीनहून भारतातील विविध ठिकाणांपर्यंतची विमान उड्डाणे संचलित करत आहेत.
- इराकी हवाई क्षेत्र मर्यादित विमानसेवांसह या भागातील गंतव्यस्थानांसाठी खुले आहे, त्याचा भारतात पोहोचण्याकरिता पुढील प्रवासासाठी उपयोग करून घेता येऊ शकेल.
- इराणची हवाई हद्द अंशतः खुली आहे. मंत्रालयाने भारतीय नागरिकांना इराणला न जाण्याचा सल्ला दिला आहे, मात्र आधीपासून तेथे असलेल्यांना भारतीय दूतावासाची मदत घेऊन तेथून बाहेर निघून जाण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत, तेहरानमधील भारतीय दूतावासाने 2,551 भारतीय नागरिकांना सीमावर्ती भागातील रस्त्यांच्या मार्गाने इराणमधून बाहेर पडण्यास मदत केली आहे.
- इस्रायली हवाई क्षेत्र खुले झाले असून, तेथील इप्सित स्थळांपर्यंत मर्यादित विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे, त्याचा भारतात पुढील प्रवास करण्यासाठी फायदा करून घेता येईल.
* * *
सुषमा काणे/निलिमा चितळे/संजना चिटणीस/तुषार पवार/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2262554)
अभ्यागत कक्ष : 13