गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिलियन माइंड्स टेक पार्क’ आणि ‘जीआरइएमआय सिटी कॅम्पस’चे उद्घाटन केले
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिलियन माइंड्स टेक पार्क’ आणि ‘ जीआरइएमआय सिटी कॅम्पस’चे उद्घाटन केले.
Posted On:
17 MAY 2026 4:43PM by PIB Mumbai
उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भविष्यातील भारताविषयीच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ते म्हणाले की, तंत्रज्ञान, नवोन्मेष, ज्ञान, उद्योजकता आणि उच्च कौशल्याधारित उद्योग गुजरातमध्येही यावेत, ही पंतप्रधान मोदी यांची संकल्पना आहे.

अमित शाह म्हणाले की, उत्पादन, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती, बंदरे, रसद व्यवस्था, हरित ऊर्जा, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या क्षेत्रांत गुजरातने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते म्हणाले की, पुढील उद्दिष्ट म्हणजे सेवा क्षेत्रातही गुजरातला देशातील अव्वल तीन राज्यांमध्ये स्थान मिळवून देणे. यासाठी नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या या सुविधांसारखे तंत्रज्ञान उद्यान अहमदाबादला बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि गुरुग्राम यांच्या बरोबरीने उभे करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित शाह यांनी गणेश रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (जीआरइएमआय ) कॅम्पसचेही उद्घाटन केले. ते म्हणाले की, स्थावर मालमत्ता क्षेत्राकडे सर्वसमावेशक दृष्टिकोनातून क्वचितच पाहिले गेले आहे, त्यामुळे ही संस्था देशासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. पर्यावरण, नियोजन आणि नगररचना यांचा स्थावर मालमत्ता विकासाशी घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांनी सांगितले आणि योग्य नियोजनाशिवाय चांगली शहरे विकसित होऊ शकत नाहीत, यावर भर दिला. मोदी सरकारच्या शहरी नियोजन सुधारणांमुळे नगररचनेच्या क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. ते म्हणाले की, 30,000 चौरस फूट परिसरात उभारण्यात आलेल्या या परिसरामध्ये पहिल्या तुकडीत 300 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, तर थोल सरोवराजवळील मुख्य परिसर 100 एकर क्षेत्रात सुमारे रु. 500 कोटी खर्चून विकसित करण्यात येणार आहे. ही संस्था देशभरातील स्थावर मालमत्ता क्षेत्राला आधुनिक विचारसरणी आणि सक्षम नेतृत्व प्रदान करेल, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सखोल तंत्रज्ञान हे भविष्यातील अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर अनेक उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये अग्रणी म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी सांगितले. रोबोटिक्स, क्वांटम संगणन, सेमीकंडक्टर, एआय , स्वयंचलन प्रणाली, सायबर सुरक्षा, संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत युवकांना योग्य परिसंस्था, पायाभूत सुविधा आणि संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे शाह यांनी नमूद केले. हे दोन्ही उपक्रम गुजरातला प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पावले पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील, असे त्यांनी सांगितले.
***
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2262079)
अभ्यागत कक्ष : 10