वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या अध्यक्षतेखाली किंबरली प्रक्रिया परिषद 2026 मुंबईत संपन्न
नैसर्गिक हिरे क्षेत्राच्या भविष्यावर विशेष लक्ष केंद्रित
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नैसर्गिक हिरे क्षेत्रात विश्वासार्हता, नियमांचे पालन आणि ग्राहकांचा विश्वास बळकट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी केला.
नैसर्गिक हिरे व्यापारातील पारदर्शकता, सुप्रशासन आणि कार्यपद्धतीतील सुधारणांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
Posted On:
15 MAY 2026 11:53AM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त हिऱ्यांच्या संदर्भातील किंबरली प्रक्रिया (KP) ची 2026 ची आंतरसत्रीय परिषद मुंबईत भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चार दिवस सुरु असलेल्या या परिषदेत नैसर्गिक हिरे क्षेत्राच्या भविष्यावर विचारविनिमय करण्यात आला. या मध्ये केपीचे सदस्य देश, निरीक्षक, उद्योगक्षेत्रातील भागधारक आणि नागरी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
केपी परिषदेचा समारोप करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत हे हिऱ्यांचे कटिंग आणि पैलू पाडण्याचे तसेच पॉलिशिंगचे जगातील आघाडीचे केंद्र आहे. नैसर्गिक हिरे हे विश्वास, जबाबदारी आणि सामायिक समृद्धीचे प्रतीक असून त्यामध्ये किंबरली प्रक्रिया अर्थात केपी बजावत असलेल्या भूमिकेबद्दल भारताला आदर आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक हिऱ्यांच्या क्षेत्रात तीन सी क्रेडिबिलीटी, कॉम्प्लायन्स आणि कन्झुमर कॉन्फिडन्स यांना चालना देण्यात येत आहे. हे तीन सी म्हणजे विश्वासार्हता, नियमांचे पालन आणि ग्राहकांचा विश्वास हे आहेत. यांना चालना देण्यासाठी आणि वेगाने बदलत चाललेल्या जागतिक बाजारपेठेत केपीचे स्थान बळकट करुन त्यांच्या सदस्य देशांबरोबर काम करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.
ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक हिरे क्षेत्र हे हिरे उत्पादक, प्रक्रिया करणारे आणि उपभोक्ता देशांमधल्या लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. हिरे उद्योग आणि ग्राहक या दोघांच्याही अपेक्षांची पूर्तता करणारी मजबूत आणि पारदर्शक किंबरली प्रक्रिया कायम राखण्यासाठी भारत सतत प्रयत्नशील राहील. भारताच्या अध्यक्षतेखाली 3 सी, अर्थात विश्वासार्हता, नियमांचे पालन आणि ग्राहक विश्वास या संकल्पनेवर आधारित ही परिषद होती. त्यामध्ये किंबरली प्रक्रियेच्या चौकटीत राहून विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्य बळकट करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या परिषदे दरम्यान विविध कार्यगट आणि समित्यांचे निरिक्षण, तांत्रिक प्रक्रिया, सुप्रशासन, आकडेवारी आणि हाताने तयार करण्यात येणारी उत्पादने, यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान नैसर्गिक हिऱ्यांच्या मूल्यसाखळीमध्ये पारदर्शकता वाढवणे, कार्यपद्धती सुधारणे आणि परस्पर विश्वास दृढ करणे या बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले.
केपी 2026 चे अध्यक्ष सुचिंद्र मिश्रा यावेळी म्हणाले की, मुंबईतील परिषदेमधील ही प्रगती ही सहभागी देश आणि निरीक्षकांची एकत्रित कटिबद्धता दाखवते. हीच बाब किंबरली प्रक्रियेला विश्वासार्ह, प्रासंगिक ठरवते. त्याचप्रमाणे जागतिक हिरे व्यापारातील बदल आणि ग्राहकांच्या अपेक्षांना सकारात्मक प्रतिसाद देणारी ठरते. नैसर्गिक हिऱ्यांच्या व्यापाराचा पाया विश्वास आहे आणि हिऱ्यांच्या मूल्य साखळीमध्ये जबाबदार स्रोत, पारदर्शकता आणि विश्वासाचा आधारस्तंभ म्हणून किंबरली प्रक्रियेला बळकट करण्यावरही त्यांनी जोर दिला.
या आंतरसत्रीय बैठकीत, उत्पादक राष्ट्रे आणि समाजात जबाबदार स्रोत पद्धती, विकासात्मक परिणाम आणि व्यवसायिक सहाय्य या किंबरली प्रक्रियेचा सकारात्मक प्रभाव ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद आणि संपर्क साधण्यावर अधिक भर देण्यात आला.
या परिसंवादात झालेली चर्चा या वर्षाच्या शेवटी नवी दिल्लीत होणाऱ्या केपीच्या सत्रात पुढे नेण्यात येणार आहे. 2026 या भारताच्या अध्यक्षतेखालील काळात विश्वासार्हता, नियमांचे पालन आणि ग्राहक विश्वासाह सातत्याने लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
या बैठकीत केपीचे सदस्य , जागतिक हिरे परिषद, नागरिक प्रतिनिधी, औद्योगिक संस्था आणि इतर संबंधितांनी भाग घेतला. अध्यक्षांनी अधोरेखित केले की किंबरली प्रक्रियेची अद्वितिय त्रिपक्षीय रचना, सहमती - आधारित दृष्टिकोन, सरकार, उद्योग आणि समाजाला एकत्र आणत असून हिच त्याची प्रमुख शक्ती आहे. 2000 सालच्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठराव 55/56 अन्वये किंबरली प्रक्रिया प्रमाणन योजना स्थापन झाली होती. हा एक जागतिक उपक्रम असून त्याद्वारे बेकायदेशीर किंवा अवैध हिऱ्यांना कायदेशीर व्यापारात प्रवेश करण्यापासून रोखले जाते. त्याचप्रमाणे नैसर्गिक हिऱ्यांच्या पुरवठा साखळीत योग्य स्त्रोतांना प्रोत्साहन दिले जाते.
हिऱ्यांच्या कटिंग आणि पॉलिशिंगचे एक प्रमुख जागतिक केंद्र म्हणून, भारताने किंबरली प्रक्रियेची उद्दिष्ट आणि नैसर्गिक हिऱ्यांच्या क्षेत्रात पारदर्शकता, शाश्वतता व जबाबदार पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
***
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2261353)
अभ्यागत कक्ष : 6