संरक्षण मंत्रालय
व्हाइस ऍडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2026 7:22AM by PIB Mumbai
QXP2.jpeg)
सरकारने व्हाइस ऍडमिरल कृष्ण स्वामिनाथन (PVSM, AVSM,VSM) यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी (PVSM, AVSM, NSM) 31 मे 2026 रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत.
व्हाइस ऍडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांनी 31 जुलै 2025 रोजी वेस्टर्न नेव्हल कमांडचे 34 वे प्रमुख फ्लॅग ऑफिसर म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची 01 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झाली असून ते कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमधील तज्ज्ञ आहेत. ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला; जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, श्रीवेनहॅम (युनायटेड किंगडम); कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, कारंजा आणि युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट (रोड आयलंड) चे माजी विद्यार्थी आहेत.
परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) आणि विशिष्ट सेवा पदक (VSM) यांनी सन्मानित झालेल्या ऍडमिरलनी त्यांच्या नौदल कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या मोहिमा, कर्मचारी आणि प्रशिक्षण नियुक्त्या सांभाळल्या आहेत. यामध्ये आयएनएस विद्युत आणि विनाश या क्षेपणास्त्र नौका; आयएनएस कुलिश ही क्षेपणास्त्र कॉर्व्हेट; आयएनएस म्हैसूर ही विनाशिका आणि आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका या युद्धनौकांच्या मुख्य जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.
रिअर ऍडमिरल पदावर पदोन्नती झाल्यानंतर, त्यांनी कोची येथील दक्षिण नौदल कमांडच्या मुख्यालयात मुख्य कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण) म्हणून काम पाहिले आणि भारतीय नौदलातील प्रशिक्षणाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण नौदलातील परिचालनात्मक सुरक्षिततेवर देखरेख ठेवणाऱ्या 'भारतीय नौदल सुरक्षा पथका'च्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी नौदलाच्या 'वर्क अप' संस्थेचे प्रमुख म्हणून 'सागरी प्रशिक्षण ध्वजाधिकारी' म्हणून धुरा सांभाळली, ज्यानंतर त्यांना 'वेस्टर्न फ्लीटचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर' म्हणून नियुक्त होण्याचा बहुमान मिळाला. नौदलाच्या या महत्त्वाच्या शाखेचे नेतृत्व केल्यानंतर, त्यांची नियुक्ती 'फ्लॅग ऑफिसर ऑफशोर डिफेन्स ऍडव्हायझरी ग्रुप' आणि भारत सरकारचे ऑफशोर सुरक्षा आणि संरक्षण सल्लागार म्हणून करण्यात आली.
व्हाइस ऍडमिरल पदावर पदोन्नती झाल्यानंतर, या फ्लॅग ऑफिसरनी वेस्टर्न नेव्हल कमांडचे 'चीफ ऑफ स्टाफ', नौदल मुख्यालयात 'कंट्रोलर ऑफ पर्सोनेल सर्व्हिसेस' आणि 'चीफ ऑफ पर्सोनेल' म्हणून काम पाहिले. त्यांच्या सध्याच्या नियुक्तीपूर्वी, त्यांनी नौदल मुख्यालयात 'व्हाइस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ' (नौदल उपप्रमुख) म्हणून सेवा बजावली.
व्हाइस ऍडमिरल स्वामिनाथन यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून बीएससी पदवी; कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कोची येथून टेलिकम्युनिकेशन्समध्ये एमएससी; किंग्स कॉलेज, लंडन येथून संरक्षण शास्त्रामध्ये (Defence Studies) एमए; मुंबई विद्यापीठातून स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये एम फिल आणि मुंबई विद्यापीठातूनच इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पीएचडी पदवीचा समावेश आहे.
***
माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2259449)
आगंतुक पटल : 58