संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ नवी दिल्ली येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषदेचे उद्घाटन करणार
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2026 3:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2026
नवी दिल्ली येथील 'आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल)' चा नेत्ररोग विभाग, 'ऑल-इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी'च्या सहयोगाने, 9 आणि 10 मे 2026 रोजी दिल्ली कँटोन्मेंट येथील 'माणेकशॉ सेंटर' मध्ये भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद आयोजित करणार आहे. ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी - आर्म्ड फोर्सेस ऑप्थॅल्मोलॉजी अपडेट (एआयओएस-एएफओयू 2026) नावाच्या या दोन दिवसीय शैक्षणिक कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते होईल. संरक्षण दलप्रमुख, तिन्ही सेना दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, यामधून या कार्यक्रमाचे राष्ट्रीय महत्त्व आणि त्रि-सेवा स्वरूप अधोरेखित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील सुमारे 200 नामवंत नेत्ररोग तज्ज्ञ, तसेच लष्करातील सर्वोत्तम नेत्ररोग तज्ज्ञ एकत्र येतील. यावेळी नेत्ररोग शास्त्राचा सर्वसमावेशक आढावा घेतला जाईल. सर्व प्रमुख उप-शाखांमध्ये केलेल्या प्रगतीचा यात समावेश असेल. या परिषदेला एम्स (एआयआयएमएस), नवी दिल्ली, पीजीआय, चंदीगड, एल.व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट, हैदराबाद, संकरा नेत्रालय, चेन्नई आणि अरविंद आय केअर सिस्टम, यासह देशभरातली इतर नेत्र रोग क्षेत्रातील संस्थांमधील 100 हून अधिक नामवंत प्राध्यापक उपस्थित राहतील.
युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम, यूके येथील नेत्ररोग विभागाचे प्रमुख, प्राध्यापक हरमिंदर सिंह दुआ आणि टॅन टॉक सेंग हॉस्पिटल, सिंगापूर येथील वरिष्ठ सल्लागार, नेत्ररोग तज्ज्ञ, क्लिनिकल संशोधक डॉ. कॉलिन सियांग हुई टॅन, हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दोन नेत्ररोग तज्ज्ञ देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. प्राध्यापक हरमिंदर सिंह दुआ, हे डोळ्यांच्या रासायनिक जखमांवरील त्यांच्या प्रगत संशोधनासाठी आणि 'दुआ लेअर'च्या (Dua's Layer) ऐतिहासिक संशोधनासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या संशोधनाने बुबुळाच्या रचनेवरील अभ्यासात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. डॉ. कोलिन सियांग हुई टॅन हे 'नॅशनल हेल्थकेअर ग्रुप आय इन्स्टिट्यूट' मधील 'फंडस इमेज रीडिंग सेंटर'चे प्रमुख आहेत. ते रेटिनल इमेजिंग, डायबेटिक रेटिनोपॅथी आणि एआय-आधारित नेत्ररोग निदानामधील त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात.
ही परिषद देशभरातील युवा नेत्ररोग तज्ज्ञांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरेल. या ठिकाणी त्यांना स्वतःचे कौशल्य प्रदर्शित करण्याची आणि त्याच वेळी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याची संधी मिळेल. नेत्ररोग शास्त्रामध्ये नागरी आणि लष्करी क्षेत्रात अर्थपूर्ण सहकार्य वृद्धिंगत करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2259041)
आगंतुक पटल : 46