आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
माता आणि बाल आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वोत्तम पद्धतींवरील राष्ट्रीय परिषदेत केला 'जननी' (JANANI) प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
'जननी' हा एक सेवा-केंद्रित डिजिटल प्लॅटफॉर्म, महिलांच्या प्रजननक्षम काळातील आरोग्य विषयक डिजिटल नोंदींचे सर्वसमावेशक निरीक्षण आणि जतन करणार
‘जननी’ प्लॅटफॉर्मने आतापर्यंत 1.34 कोटी लाभार्थींची नोंदणी, 30 लाखांहून अधिक गर्भवती महिलांची नोंदणी, 30 लाखांहून अधिक एमसीएच कार्ड्सची निर्मिती आणि 1 लाखाहून अधिक बायोमेट्रिक पडताळणीचे उद्दिष्ट साध्य केले
Posted On:
07 MAY 2026 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2026
देशातील माता आणि बाल आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच पार पडलेल्या, ‘नवोन्मेष आणि समावेशकता – भारताच्या आरोग्य भविष्याला आकार देणाऱ्या सर्वोत्तम पद्धती' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत, जननी (JANANI- जर्नी ऑफ अॅंटीनेट, नेटल अँड निओनेटल इंटिग्रेटेड केअर) या उपक्रमाचा शुभारंभ केला.
'जननी' हे एक सेवा-केंद्रित डिजिटल व्यासपीठ असून, ते महिलांच्या प्रजननक्षम वयादरम्यान त्यांच्या डिजिटल आरोग्य विषयक नोंदींचे सर्वसमावेशक निरीक्षण आणि जतन करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सध्या कार्यरत असलेल्या आरसीएच, या पोर्टलची सुधारित आवृत्ती म्हणून विकसित करण्यात आलेले हे व्यासपीठ, उपचारांच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या सेवा वितरणाशी संबंधित महत्त्वाच्या घटनांची नोंद घेऊन, आरोग्याचा एक दीर्घकालीन आलेख तयार करते.
हे व्यासपीठ माता आणि बाल आरोग्य सेवांचा अखंड मागोवा घेत राहण्याचे उद्दिष्ट सुनिश्चित करते. यात प्रसूतीपूर्व काळजी, प्रसूतीची तयारी, प्रसूती, प्रसुतीनंतरची काळजी, नवजात शिशुंची काळजी, घरातील नवजात शिशु आणि बालकांची काळजी आणि कुटुंब नियोजन, या गोष्टींचा समावेश आहे. सातत्यपूर्ण देखरेख आणि वेळेवर केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपांद्वारे, 'जननी', सेवा वितरणाला बळकटी देते आणि प्रत्येक टप्प्यावर उपचारांमधील सातत्य सुनिश्चित करते.
'जननी'चे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे क्यूआर-सुविधेसह सुसज्ज असलेल्या डिजिटल 'माता आणि बाल आरोग्य' (एमसीएच) कार्ड्सची सुरुवात, यामुळे आरोग्यविषयक नोंदी कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवर उच्च-जोखमीच्या गर्भधारणेसाठी स्वयंचलित अलर्ट, पर्यवेक्षकीय पुनरावलोकनासाठी रिअल-टाइम डॅशबोर्ड आणि ड्यू-लिस्ट तयार करण्याची सुविधा देखील समाविष्ट आहे, यामुळे वेळेवर ट्रॅकिंग, देखरेख आणि नेमका हस्तक्षेप करणे शक्य होते.

जननी हा प्लॅटफॉर्म प्रभावी अंतर्गत कार्यक्षमता वैशिष्ट्यांसह डिझाइन केला आहे, जे U-WIN आणि POSHAN यांसारख्या राष्ट्रीय प्लॅटफॉर्मसोबत एकत्रितपणे काम करते. यामुळे डेटाची देवाणघेवाण, कार्यक्रमांमध्ये समन्वय आणि विविध क्षेत्रांतील लाभार्थ्यांचे सर्वसमावेशक निरीक्षण सुलभ झाले आहे.
हा मंच आभा, आधार (ओटीपी आणि बायोमेट्रिक) आणि मोबाईल नंबर यांसारख्या युनिक ओळख क्रमांकांचा वापर करून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यास वाव देते, सोबतच संपूर्ण भारतात शोध कार्यक्षमताही प्रदान करते. यामुळे स्थलांतरित लोकांसाठी सेवा सुनिश्चित होते आणि नोंदींची पुनरावृत्ती टाळली जाते. जननी, वेब आणि मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे स्वत:च नोंदणी करण्याची सुविधादेखील प्रदान करते, ज्यामुळे लाभार्थी सक्रियपणे सहभागी होण्यास पुढे होतात.

जननी, प्रसूतिपूर्व तपासणी भेटी आणि लसीकरणाचे वेळेवर नियोजन व देखरेख सुलभ करून कोणत्याही महत्त्वाच्या आरोग्य टप्प्यावर सेवा मिळेल याची खात्री करण्यासाठी सूचना आणि स्मरणपत्रे देऊन नागरिकांना मदत करते. त्याचप्रमाणे डिजिटल माता व बाल आरोग्य कार्ड, जवळच्या आरोग्य सुविधांची माहिती, प्रसूतीचे अपेक्षित ठिकाण ही माहिती उपलब्ध करते. आरोग्य शिक्षण व पोषणविषयक मार्गदर्शनाद्वारे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास लोकांना मदत करते. जननी डिजिटल प्रमाणीकरण, रिअल-टाइम देखरेख आणि आंतर-क्षेत्रीय एकत्रीकरण करून माता व बाल आरोग्य प्रशासनात संरचनात्मक सुधारणा घडवून आणते, परिणामी सेवेची व्याप्ती, उत्तरदायित्व सुधारण्यास आणि माता व बालमृत्यूच्या निर्देशकांमध्ये घट होण्यास निश्चित हातभार लागतो.
आजवर, 'जननी' (JANANI) अंतर्गत 1.34 कोटी लाभार्थीं आणि 30 लाखांहून अधिक गर्भवती महिलांची नोंदणी, 30 लाखांहून अधिक MCH कार्ड्सची निर्मिती आणि 1 लाखांहून अधिक बायोमेट्रिक पडताळण्या करण्यात आल्या आहेत.
'जननी'चा शुभारंभ हा सुलभ, न्याय्य आणि दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याकरिता सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. यात डिजिटल सक्षमीकरण, सातत्यपूर्ण उपचार आणि माता व बाल आरोग्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2258908)
अभ्यागत कक्ष : 31